Gharkul Scam : मूळ लाभार्थी ऐवजी बनावट लाभार्थ्याला लाभ

संगनमताने घरकुलाची रक्कम केली वळती; बाळापूर पंचायत समितीतील प्रकार
balapur panchayat samiti housing gharkul scam fake documents crime
balapur panchayat samiti housing gharkul scam fake documents crime eSakal

बाळापूर : पात्र लाभार्थ्यांला घरकुल न देता त्याचे मंजूर झालेले पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा करून परस्पर काढून घेतल्याची बाब उघडकीस आली असून, या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील नागद येथे हा प्रकार घडला आहे.

त्यामुळे बाळापूर पंचायत समितीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणाची तक्रार मूळ लाभार्थीच्या मुलाने मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांना विचारणा केली असता, दोन्ही नावे एकच असल्याने हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले.

बाळापूर तालुक्यातील नागद येथे २०२१-२०२२ मध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बेघर असलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना व इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुले बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आले.

त्यात त्याच गावातील शिवशंकर बाबन वाकळे या लाभार्थ्यांच्या नावानेही प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या घरकुलसाठी एक लाख २० हजार रुपये मंजूर झाले. ज्यामधून त्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळणार होते. त्यासाठी त्यांचा नावाने प्रस्तावही ग्रामपंचायतीमार्फत पाठविण्यात आला होता.

ग्रामसभेत लाभार्थी निवड झाली होती, असे असताना घरकुलाचा निधी मंजूर झाल्यानंतर शिवशंकर वाकळे यांचा मृत्यू झाला. मात्र, शिवशंकर वाकडे यांच्या नावाने असलेले घरकुल त्यांच्या वारसांना म्हणजे पत्नीला द्यायला हवे होते.

परंतु, काहींनी संगनमत करून शिवशंकर वाकळे यांचा नावावर मंजूर घरकुलाचा लाभ गावातीलच एका लाभार्थीला देऊन टाकला, असा आरोप मूळ लाभार्थीचा मुलगा अजय वाकळे यांनी केला असून, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात आली आहे.

बनावट लाभार्थी उभा करून रक्कम वळती

मूळ लाभार्थींच्या नावावर आलेले घरकुलाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात संगममताने वळती करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिले आहेत. घरकुलाचा पहिला हफ्ता १५ हजार रुपये व दुसरा ४५ हजार रुपयांचा हप्ता ता. ११ डिसेंबर २०२३ रोजी मूळ लाभार्थीच्या नावावर मंजूर झाला. असे ६० हजार रुपये बनावट लाभार्थीच्या खात्यात वळले करण्यात आले असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

संगनमताने कुठलाही प्रकार घडलेला नसून, नागद येथील घरकुल प्रकरणात लाभार्थ्यांची नावे एकच असल्याने पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पैसे मूळ लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

- मिलिंद मोरे, गटविकास अधिकारी, बाळापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com