esakal | ‘ते’ देतात एका दिवसाच्या जीवनाची किंमत ‘एक झाड’
sakal

बोलून बातमी शोधा

Plantation.jpg

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग, प्रत्येकाला वृक्ष संपदेचे, वनसंपदेचे महत्त्व पटवून देतो आणि वृक्ष संपदेचे, निसर्ग संपदेचे हेच महत्त्व हेरून कोणीतरी निसर्गप्रेमी त्याचे जीवन वृक्षसंवंर्धनासाठीच खर्ची घालणार असल्याचे ध्येय निश्चित करतो, तेव्हा ती निश्चितच कौतुकास्पद बाब ठरते. अकोला जिल्ह्यातील अशाच एका निसर्गप्रेमीने या पुढील त्याच्या प्रत्येक एका दिवसाच्या जीवनाची किमत एक वृक्ष लावून व त्याचे संवंर्धन करून निसर्गाला देण्याचे निश्चित केले आहे.

‘ते’ देतात एका दिवसाच्या जीवनाची किंमत ‘एक झाड’

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला : पोलिस प्रशासनात नोकरी करताना कार्यालयीन तसेच कौटुबिक जबाबदारी पूर्ण करण्यातच आयुष्य खर्ची गेले. आता मात्र मला निसर्गाचे देणे लागत असून, यापुढचे आयुष्य कौटुंबिक जबाबदारीसोबतच वृक्षसंवंर्धनासाठी खर्ची घालणार असल्याचे, खडकी परिसरात वास्तव्याला असलेल्या गोपालसिंह डाबेराव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यांनी गेल्या तीन ते चार वर्षामध्ये परिसरात तसेच मुख्य रस्त्याच्या लगत शेकडो नीम, वड, पिंपळ, उंबराची झाडे लावली असून, स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांना ते जपत आहेत.

गोपालसिंह मोतिरामजी डाबेराव हे गुप्तचर पोलिस विभागातून जवळपास २० वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांनी अतिशय प्रमाणिकपणे नोकरी करत परिवाराची जबाबदारीसुद्धा चोख पार पाडली. त्यांची पत्नी गृहिणी असून, त्यांना मुलगा व एक मुलगी आहे. दोन्ही मुले विवाहित असून, नोकरीवर आहेत. संपूर्ण वर्ष नोकरी करताना कष्टात घालविल्यानंतर आता त्यांना विश्रांतीसाठी भरपूर वेळ मिळू शकतो. मात्र आताही आयुष्य विश्रांती घेण्यासाठी नव्हे तर, निसर्गाचे देणे पूर्ण करण्यासाठी असल्याचे ते सांगतात. याच भावनेतून ते गेल्या तीन ते चार वर्षापासून खडकी ते कान्हेरी पर्यंतच्या भागात रस्त्यालगत तसेच वन्य भागात ते रोज नीम, वड, पिंपळ, उंबर इत्यादी मोठ्या वृक्षांची लागवड करीत आहेत. त्यासाठी रोज सकाळी ५ वाजताच एक फावडे, कुऱ्हाड, टिकास, फावडे व पाण्याची मोठी कॅन घेऊन ते घराबाहेर पडतात. कधी स्वतः विकत आणून तर कधी परिसरात शोध घेऊन मोठी छाया देणारी व ऑक्सिजन सोडणारी झाडे आणून त्यांची ते भल्या पहाटे मुख्य तसेच विविध कॉलणींच्या रस्त्यांच्या कडेला लागवड करतात. त्यानंतर त्या झाडाला संरक्षण व्हावे म्हणून, जंगलातून काट्या तोडून आणून त्या झाडाभोवती त्याचे कडे उभारतात. एवढेच नव्हे तर नित्याने लावलेला झाडाला सकाळ संध्याकाळ ते पाणी देताना पाहायला मिळतात. ७० वर्षाच्या या तरूण मनाच्या व्यक्तीने घेतलेल्या निसर्ग संवंर्धनच्या ध्यासातून निश्‍चितच इतर सर्व तरूणांना निसर्ग संवंर्धनाचे महत्त्व उमजणार हे नक्की.

हे ही वाचा : आले हो आले ‘किडींचे’ दिवस आले! शेतकऱ्यांनो सावधान

निसर्गाचा ऱ्हास मणुष्य करू शकतो तर, निसर्ग संवंर्धनाची गरजही फक्त मणुष्यच पूर्ण करू शकतो. निसर्गाचे माझ्यावर काही तरी देणे लागते आणि त्या परताव्यासाठी मी रोज किमान एक तरी, झाड लावून त्याचे संवंर्धन करण्याचा प्रयत्न करतो आहे.
- गोपालसिंह मोतिरामजी डाबेराव, खडकी, तालुका अकोला

हे ही वाचा : मूग, उडीद गेला अन् मसाला पिकाचा पर्याय खुला; ओवा, सोप, धन्याचे पीक देऊ शकते भरघोस उत्पन्न