मूग, उडीद गेला अन् मसाला पिकाचा पर्याय खुला; ओवा, सोप, धन्याचे पीक देऊ शकते भरघोस उत्पन्न

owa - Copy.jpg
owa - Copy.jpg

अकोला : विषाणूजन्य रोगाने मूग उद्‍ध्वस्त केला अन् ऐन काढणीवेळी संततधार पावसाने झोडपून काढल्याने खरिपातील मूग व उडीद ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या हातून गेल्यातच जमा आहेत. बहुतांश भागात सोयाबीनची अवस्था सुद्धा बिकट आहे. एवढेच नव्हे तर, जवळपास २५ टक्के मूग, उडीद, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी अनियमीत पावसामुळे शेतं पेरलीच नाहीत. मात्र, या सर्व शेतकऱ्यांना अजूनही संधी असून, ओवा, सोप, धने या मसालावर्गीय व उशिरा आणि कमी दिवसाच्या पिकाकातून आताही भरघोस उत्पन्न मिळविता येऊ शकते.



ओवा, सोप व धने ही मसाला बियाणे पिके त्यांच्या दैनंदिन आहारातील तसेच मसाला पदार्थातील उपयोगामुळे सर्व परिचित आहेत. भारतातील या पिकाखालील क्षेत्र उत्पन्न व उत्पादकता याचा विचार करता हे क्षेत्र उत्पादन वाढीसाठी बराच वाव आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यात मसाला बियाणे पिकांची लागवड होऊ शकते. खारपाणपट्टा प्रामुख्याने असणारे अमरावती, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यात मसाला बियाण्यांच्या पीक लागवडीसाठी विशेष बाब म्हणून लागवडीची वेळ ऑगस्ट-सप्टेंबर ठरवावी, असा संकेत आहे. उर्वरित जिल्ह्यांकरिता ज्या शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामात थोडीफार ओलिताची सोय आहे, अशा शेतकऱ्यांसाठी मसाला बियाणे पिके ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पेरणी करावी, अशी शिफारस डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे करण्यात आली आहे.

खारपान पट्ट्यातही मिळते भरघोस उत्पादन
खारपान पट्याची जमीन पाणी धरून ठेवते व अशा जमिनीत मसालावर्गीय पिकाचे चांगले उत्पादन मिळत असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ.एस.एम. घावडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

घ्या दमदार उत्पादन अन् मिळवा जोमदार उत्पन्न
ओवा, सोप, धणे या व इतरही मसालावर्गीय पिकांचे उत्पादन अकोला जिल्ह्यात तसेच विदर्भात मोजक्याच भागात व अत्यल्प क्षेत्रावर पेरणी केली जाते. त्यामुळे उत्पादनही कमी राहाते मात्र त्यातुलनेत मागणी भरपूर आहे. त्यामुळे अजूनही या पिकांना अकोल्यासह विदर्भाच इतर पिकांच्या तुलनेत चांगले भाव मिळतात. सध्याही अकोल्यात ओव्याला १० ते १४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

असे मिळेल उत्पादन
शिफारसीप्रमाणे खत, पाणी व्यवस्थापन करून शास्त्रीय पद्धतीने ओव्याची शेती केल्यास ओलित व्यवस्थापनांतर्गत हेक्टरी १० ते १५ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. परंतु, कोरडवाहू पीक पद्धतीमध्ये चार ते सहा क्विंटल उत्पादन विदर्भाच्या हवामानात अपेक्षित आहे. सोपीची शेतात हेक्टरी १५ ते १७ क्विंटल उत्पादन मिळते. परंतु, लखनवी सोपीचे म्हणजे स्वादिष्ट आणि गोड चवीच्या सोपीचे उत्पादन हेक्टरी पाच ते ७.५ क्विंटल एवढे अपेक्षित आहे. लावगवडीपासून धने काढणीपर्यंत जातपरत्वे १०० ते १५० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. कोरडवाहू पीक परिस्थितीमध्ये सहा ते सात क्विंटल प्रतिहेक्टर तर, ओलित व्यवस्थापनांतर्गत दहा ते १२ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पन्न अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com