डॉ. मीनाक्षी गजभिये अकोल्याच्या नव्या ‘डीन’

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

नोडल ऑफिसर डॉ. तात्याराव लहाने यांनी केली नियुक्ती ः कोरोना वाढीला आता कसा लागणार ब्रेक

अकोला  ः  राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गझभिये यांची अकोला महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावर बदली झाली आहे. तसे आदेश राज्याचे कोरोना नोडल ऑफिसर डॉ. तात्याराव लहाने यांच्या सहीचे पत्र यांना मंगळवारी (ता.9) प्राप्त झाले.

गेल्या दहा दिवसांपूर्वीच डॉ. गजभिये यांची जळगाव येथे बदली झाली होती. तर धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची कोल्हापूर येथे बदली झाली होती. मात्र दोघेही आपापल्या बदलीच्या ठिकाणी हजर होत असतानाच काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. डॉ. रामानंद यांना कोल्हापुरात येण्यास राजकीय विरोध झाला तर डॉ. गझभिये या जळगावला जात असतानाच नाशिक येथूनच पुन्हा कोल्हापूरला जावे असे सांगण्यात आले होते. त्यानंतर कोल्हापुरात त्या आल्या याचवेळी कोल्हापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. आरती घोरपडे यांच्याकडे प्रभारी अधिष्ठाता पदभार होता. अशा स्थितीत डॉ. गजभिये यांना येथे पुन्हा पदभार घेता आला नाही. त्यानुसार गेली दहा दिवस त्या कोल्हापुरात थांबून होत्या. अखेर मंगळवारी  डॉ. मीनाक्षी गजभिये यांची अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली झाल्याचे आदेश राज्य कोरोना नियंत्रणचे नोडल ऑफिसर डॉ. लहाने यांचे लेखी पत्र आले. त्यानुसार डॉ. गझभिये अकोला येथे रवाना झाल्या आहेत.  

आता अकोल्यात बदल दिसणार?
अकोला येथे कोरोनाची स्थिती गंभीर बनत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय योजना राबवाव्या लागणार आहेत.  त्यासाठी कोरोना कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या डॉ. मीनाक्षी गजभिये या कशा उपाययोजना राबवितात याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. 

असा आहे डॉ. गजभिये यांचा परिचय
मुळच्या नागपूरकर असलेल्या डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातूनच वैद्यकीय शिक्षण झाले आहे. अंबेजोगाईत अधिव्याख्याता पदावर रुजू झाल्यानंतर त्यांची 25 वर्षाच्या शासकीय सेवेत नऊ वेळा बदली झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या निवडीनंतर 25 जुलै 2017 रोजी त्यांची नागपूर येथे अधिष्ठाता पदावर नियुक्ती झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Meenakshi Gajbhiye Akola's new 'Dean'