esakal | कोरोनाच्या संकटातही येथे उपसला 2 लाख 31 हजार 375 घनमीटर गाळ
sakal

बोलून बातमी शोधा

bjs

सुजलाम् सुफलाम् अकोला प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विविध जल संधारणाची कामे करण्याकरिता ग्रामपंचायत जलसंधारण मॉडेल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. 

कोरोनाच्या संकटातही येथे उपसला 2 लाख 31 हजार 375 घनमीटर गाळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : भारतीय जैन संघटनेच्या वतीने लाॅकडाउन काळातही सर्व नियमांचे पालन करून अकोला जिल्ह्यात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. सुजलाम् सुफलाम् अकोला प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विविध जल संधारणाची कामे करण्याकरिता ग्रामपंचायत जलसंधारण मॉडेल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. 


आतापर्यंत या कामासाठी 37 जेसीबी मशीन गावकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास 30 ग्रामपंचायत अंतर्गत शेततळे, नाला खोलीकरण, जल शोषक कम पाणंद रस्ते, तलावातील गाळ काढणे, अशी विविध जल संधारणाची कामे सुरू असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख प्रा.सुभाष गादिया यांनी दिली. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 31 हजार 375 घनमीटर गाळ आणि मातीचा उपसा करण्यात आला असून 23 कोटी 13 लाख लिटर अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. 


येथे सुरू आहेत काम
अकोला तालुक्यातील टाकळी पोटे, निपाना, उगवा, कापशी, वनी रंभापूर, ढगा, मासासिसा, कापशी, कौलखेड गोमाशे, कौलखेड जहागीर या गावांमध्ये काम सुरू आहेत. बार्शीटाकळी तालुक्यात गोरव्हा, धाकली, मोझरी, सराव येथे कामे सुरू आहेत. तेल्हारा तालुक्यात वरुड वाडणेर, कोठा वडगाव रोठे, माळेगाव, राणेगाव, वाकोडी येथे कामे सुरू आहेत. मूर्तिजापूर तालुक्यात खापरावाडा, माना, मधापुरी, जितापूर (खेडकर), कंझरा येथे कामे सुरू आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी आणि नोडल अधिकारी बाळासाहेब गाढवे, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पं.स. बीडीओ, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांचे सहकार्य या कामात मिळत आहे. जलसंधारणाच्या कामासाठी शेतकऱ्यांची मशिनला मोठी मागणी आहे. या प्रकल्पाचे यशस्वीतेसाठी जिल्हा व्यवस्थापक नितीन राजवैद्य यांचे सह तालुका समन्वयक पंकज वाडेवाले, अंकुश परांजळे, आकाश गायगोले तसेच मशिन ऑपरेटर अथक परिश्रम घेत आहेत. 

loading image