अकोला : कृषी कायद्याच्या विरोधात किसान विकास मंच दिल्लीला जाणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

किसान विकास मंच व शेतकरी जागर मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ‘चलो दिल्ली’ आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

अकोला : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नववर्षाच्या सुरुवातीला (ता. ०१) जानेवारी २०२१ रोजी किसान विकास मंच व शेतकरी जागर मंचच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीत धडक देणार आहे.

हे ही वाचा : उमेदवारांना द्यावे लागेल हमीपत्र ; आरक्षित जागेवरून निवडणूक लढणाऱ्यांसाठी सूचना

किसान विकास मंच व शेतकरी जागर मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ‘चलो दिल्ली’ आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला किसान विकास मंचचे संयोजक विवेक पारसकर, अविनाश देशमुख यांच्यासह शेतकरी जागर मंचचे जगदीश मुरुमकार, कृष्णा गावंडे, मनोज तायडे, दीपक गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे, आनंद वानखडे, काँग्रेसचे प्रदीप वखरिया, सागर कावरे, गणेश कळसकर, विलास गोतमारे आदी उपस्थित होते. केंद्र सरकारने भांडवलदार वर्गाचे हित जोपासण्यासाठी व त्यांना लाभ पोहचविण्यासाठी नवा कृषी कायदा अमलात आणला आहे. भांडवलदारांच्या हितासाठी तमाम शेतकऱ्यांना वेठीस धरून शेतकऱ्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप किसान विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

हे ही वाचा : आता ऑफलाईन होणार जिल्हा परिषदेच्या सभा ; ऑनलाईनला ब्रेक, सभा प्रत्यक्ष घेण्याचे सीईओंना आदेश

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीला नेण्याचा किसान विकास मंचचा निर्धार आहे. या दौऱ्यात किसान विकास मंच जिल्हावासियांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. चलो दिल्ली किसान आंदोलनात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रारंभ करण्यात आली आहे. किसान विकास मंचच्या या किसान बचाओ दौऱ्या सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे किसान विकास मंच, परफेक्ट स्टडी सेंटर, पारसकर टॉवर, निशु नर्सरी समोर, गोरक्षण रोड, अकोला येथे सकाळी ९ ते रात्री ७ वा पर्यंत नोंदविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers from Akola district led by Shetkari Jagar Manch will strike in Delhi