बळीराजा जरा धीरानं ...जमीन भिजली की होऊ दे पेरणी जोमानं

perni kharip soyabean (4).JPG
perni kharip soyabean (4).JPG

अकोला : ढगांकडे टक लावून बसलेल्या शेतकऱ्याने मोसमातील पावसाची पहिली सर कोसळताच पेरणीसाठीची लगबग सुरू केली आहे. खते, बी-बियाणे इत्यादी शेतीपयोगी वस्तू खरेदीला जोर आला आहे. मात्र, सरासरी 100 मिमी पाऊस पडेपर्यंत तसेच जमिनीमध्ये दोन ते तीन फूट खोल ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करण्याची शेतकऱ्यांनी घाई करू नये, असा सल्ला कृषी व हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

साधारणपणे 1 जून ते 30 सप्टेंबर हा मॉन्सूनचा कालावधी समजला जातो. यंदा मॉन्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचे भाकीत हवामान वेधशाळेने वर्तविले होते. सध्या मॉन्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकत असून, येत्या दोन दिवसात गोवा आणि सिंधुदुर्ग तसेच दक्षिण पुणे विभागात म्हणजे कोल्हापूर आणि लगतच्या परिसरात तर, अकोल्यासह वऱ्हाडात 12 ते 15 जूनपर्यंत त्याचे आगमन निश्चित मानले जात आहे. त्याची पूर्वसूचना म्हणून, आठवडाभरात कोसळलेल्या पावसाच्या सरी व आर्द्रतेमध्ये होत असलेली वाढ हे परिमान मानले जावू शकते. परंतु, काही शेतकऱ्यांनी एवढ्या पावसावरच पेरणीला सुरुवात केली असून, काहींची पेरणी तयारी सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये व सरासरी 100 मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

बियाणे निवड करा जपून
मॉन्सून तोंडवर असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे. मात्र, बियाणे खरेदी करताना, प्रमाणित, शिफारसीत वाणांची निवड करून नोंदणीकृत केंद्रावरूनच खरेदी करावी. बियाणे पिशवीवर मुदत, किंमत व कंपनीची खात्री करावी. बियाणे खरेदी पश्चात विक्रेत्यांकडून पक्के बिल घेणे आवश्यक असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे.

अजून आठवडाभर प्रतीक्षा
कोकण विभाग वगळून इतर विभागात आद्रतेचे प्रमाण 30 ते 50 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. बऱ्याच ठिकाणी गोभीच्या फुलासारखे, पांढरे ढग जमलेले दिसतात, सोबतच ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. अशा परिस्थितीत पावसाची शक्यता कमी आणि स्थानिक स्वरुपात राहते. मॉन्सूनचा नियमित प्रवास उत्तर कर्नाटकच्या सागरी प्रदेशापर्यंत झालेला दिसून येत आहे. चार ते पाच दिवसात विदर्भ, मराठवाड्यापर्यंत तो प्रवास पूर्ण करू शकतो.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com