अकोल्यात रात्रीची संचारबंदी : उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोल्यात रात्रीची संचारबंदी : उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश
अकोल्यात रात्रीची संचारबंदी

अकोल्यात रात्रीची संचारबंदी : उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश

अकोला : त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उटलल्यानंतर काही समाजकंटकांनी तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीतील घटनेनंतर अकोला जिल्ह्यात अकोट येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता अकोला शहरातही बुधवारी दुपारी १२ वाजतापासून जमावबंदी आदेश लागू केला असून, संध्याकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी नीलेश अपार यांनी बुधवारी सकाळी तातडीने काढलेत.

अकोला शहरातील काही भागात तणाव निर्माण करण्याचा घटना व अफवा पसरविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी अकोला यांनी बुधवार, ता.१७ नोव्हेंबर रोजी तातडीने जिल्हा प्रशासनाकडे संचारबंदी लागू करण्याची शिफार केली होती. त्यानुसार अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय उपविभागीय दंडाधिकारी यांनी घेतला. बुधवार, ता. १७ नोव्हेंबरचे दुपारी १२ वाजतापासून ते शुक्रवार, ता. १९ नोव्हेंबरचे सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण अकोला शहरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जमावबंदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी चार किंवा चारपेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावास प्रतिबंध करण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात नामनिदर्शेनपत्र दाखल करण्यासाठी मात्र सुट राहील. याशिवाय संध्याकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा: चोपडा : साडेचार हजार लिटर बायोडिझेल चोपड्यात जप्त

आरोग्य व अत्यावश्यक सेवांना सुट अकोला शहरातील तणावपूर्ण स्थिती लक्षात घेता जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्य विषयक सेवा सुरू राहणार आहेत. याशिवाय शासकीय कार्यलय अत्यावश्यक कामासाठी सुरू राहतील, असे उपविभागीय दंडाधिकारी नीलेश अपार यांनी दिलेल्या आदेशात नमुद आहे.

तर कायदेशीर कारवाई जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे काटकोरपणे पालन करून कायदेशीर कार्यवाही करण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शहरात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकालावधित आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिला आहे.

हेही वाचा: अकोला : उपसभापतीपदाच्या निवडणुकीत ‘वंचित’ची सरशी

शहरातील दोन घटनांमुळे उचलले पाऊल त्रिपुरातील घटनेनंतर अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारानंतर अकोला शहरात गत दोन दिवसात तणावपूर्ण वातावरण आहे. याच काळात तपे हनुमान परिसरात गाड्या फोडण्याची अफवा पसरली होती तर अकोट फैल पोलिस स्टेशनच्या हद्दीतही तणाव निर्माण करणारी घटना घडली होती. या दोन घटनांमुळे पोलिसांनी कठोर उपाययोजना करीत शहरात जमावंबदी व संचारबंदी लागू करण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे केली होती.

गस्ती वाहनांकडून सूचना शहरात लागू करण्यात आलेल्या जमावबंदी व संचारबंदी आदेशाबाबत पोलिसांच्या गस्ती वाहनांमधून नागरिकांना सूचना देण्यात आल्यात. शहरातील सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत व मुख्य बाजारपेठेत गस्ती वाहनातून गर्दी न करण्याचे व चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र न येण्याची व सायंकाळी सात वाजतापासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीबाबत सूचना देण्यात आली.

लोकप्रतिनिधी, पोलिसांचे शांतता राखण्याचे आवाहन शहरातील तणावपूर्ण स्थिती बघता नागरिकांना शातंता राखण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा व इतर लोकप्रतिनिधींनी केले आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.

पोलिस महानिरीक्षकांकडून पाहणी अमरावती विभागाचे पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी बुधवारी तातडीने अकोला गाठून पोलिस अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी अकोट फैल परिसरातील घटना स्थळाला भेट देवून पाहणी केली. नागरिकांना शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. शेजारी जिल्ह्यातील पोलिस अकोल्यात अकोला शहरात मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. रात्रीची संचारबंदीदरम्यान पोलिस बंदोबस्तासाठी शेजारी जिल्ह्यातील पोलिसांच्या तुकड्या अकोल्यात बोलाविण्यात आल्या आहेत. यात वाशीम, यवतमाळ, हिंगोली येथील पोलिस तुकड्यांसोबतच अमरावती व हिंगोली येथील एसआरपीच्या तुकड्याही अकोल्यात दाखल झाल्या आहेत.

प्रशासनावर मनमानी कारभाराचा आरोप अकोला शहर शातं असताना आणि संचारबंदी लागू करण्यासारखी कोणतीही घटना घडली नसताना प्रशासनाने कुणालाही विश्वासात न घेता संचारबंदी लागू करून मनमानी केली असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. कोरोना संकटातून सावरलेली आर्थिक घडी आता कुठे निट होत असताना पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प होणार आहेत. कुठेही तणाव नाही. सर्व लोकप्रतिनिधी शांततेचे आवाहन करीत आहे. त्यामुळे प्रशासनाने मनमानीपणा सोडून संचारबंदीच्या निर्णयावर फेरविचार करावा, असे आमदार सावरकर म्हणाले. मनपाचे विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे पदाधिकारी साजिद खान पठाण यांनीही संचारबंदीची गरज नसताना प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

loading image
go to top