
वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या अभयारण्यात असलेल्या गड किल्ले, धबधबे, मंदिरे या ठिकाणी दरवर्षी तरुणाई ३१ डिसेंबरच्या रात्री येऊन नवीन वर्ष साजरे करत असते.
अकोले (अहमदनगर) : हरीशचंद्रगड, रतनगड, पट्टा किल्ला, कळसुबाई, भैरोबा या गड, किल्ले, मंदिरे या ठिकाणी ३१ डिसेंबरची रात्र जागवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत स्थानिक वन कमिटी व वनविभाग, पोलिस प्रशासन यांनी एकत्र येत याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्र जागविण्याचा मनसुबा तरुणाईला यावर्षी पूर्ण करता येणार नाही.
हे ही वाचा : कर्जतच्या शासकीय कार्यालयांना रोहित पवारांमुळे झळाळी, पदरखर्चाने दिला रंग
वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या अभयारण्यात असलेल्या गड किल्ले, धबधबे, मंदिरे या ठिकाणी दरवर्षी तरुणाई ३१ डिसेंबरच्या रात्री येऊन नवीन वर्ष साजरे करत असते. त्यामुळे गडावर, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात मद्य, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक कचरा होऊन येथील शांतता भंग केली जाते. त्यामुळे ३१ डिसेंबरला सकाळी गेलेले पर्यटक सायंकाळी सहा वाजता गड किल्ल्यावरून खाली येतील तसेच जाताना कोणतेही मद्य, प्लास्टिक बाटल्या नेता येणार नाही. जाणारे पर्यटक नोंद करून जातील. पर्यटकांना मास्क लावण्यासह सुरक्षित अंतराचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असेल. सोबत स्वतःचे सॅनिटायजर बाटली आणावी लागेल. ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी असलेल्या पर्यटकांना पर्यटनासाठी प्रतिबंध करण्यात येईल.
हे ही वाचा : मुळा एज्युकेशनचे नऊ विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड
यासह खोकला, ताप असल्यास पर्यटनास येऊ नये. कोविड-१९ अंतर्गत शासकीय नियमांचे पालन न झाल्यास संबंधित पर्यटकांविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ अंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश वनक्षेत्रपालांना देण्यात आले आहेत. पायथ्याशी असलेल्या वनव्यवस्थापन समिती सदस्य अथवा वनरक्षक त्याची नोंद घेऊन दिवस गेलेले सहा वाजेनंतर कुणीही गड किल्ले अथवा मंदिरात थांबणार नाही. अन्यथा पाच हजार दंड व कारवाई केली जाणार आहे.
हे ही वाचा : अयोध्येतील राम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार
३१ डिसेंबर रोजी निसर्ग सहलीचे निम्मित करून गडावर, मंदिरात अथवा कोकणकड्यावर कुणालाही रात्र जागवत येणार नाही तसे आदेश देण्यात आले आहे. स्थानिक वन समिती व वनविभाग अधिकारी कर्मचारी पोलिस यांचेमार्फत देखरेख ठेवून काळजी घेतली जाईल व नियम बाह्य वागणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई होईल याची सर्वानी दक्षता घ्यावी.
- गणेश रणदिवे - सहायक वनसंरक्षक वन्य जीव