esakal | कोरोनामुळे पोहरादेवी येथे कडक बंदोबस्त, सर्व सीमा सील

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे पोहरादेवी येथे कडक बंदोबस्त, सर्व सीमा सील
कोरोनामुळे पोहरादेवी येथे कडक बंदोबस्त, सर्व सीमा सील
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मानोरा : गोर बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून ख्यात असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे चैत्र शुद्ध नवमी निमित्त देशभरातील भाविक लाखोंच्या संख्येने जगदंबादेवी, जगद्गुरू संत सेवालाल महाराज, राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज, दानशूर संत बाबनलाल महाराज समाधीस्थळी माता टेकण्यासाठी येतात.

मात्र, यावेळी कोरोना महामारीचा प्रकोप वाढल्यामुळे शासनाने यात्रेवर बंदी आणल्यामुळे २१ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध नवमी निमित्त श्री देवी सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबिरदास महाराज यांनी सेवालाल महाराज मंदिरात तर, गोर बंजारा धर्मगुरू बाबूसिंग महाराज व शेखर महाराज यांनी राष्ट्रीय संत डॉ. रामरावबापू महाराज आश्रमात धार्मिक विधी भाविकांविना संपन्न केला.

हेही वाचा: विनाकारण फिरत असाल तर वाहन होईल जप्त

कोरोना विषाणू आजाराचा जगभरात झपाट्याने फैलाव होत असून, वाशीम जिल्ह्यात २१ हजार रुग्णाचा टप्पा पार केला. त्यामुळे शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लाकडाउन घोषित केले असून, विविध ठिकाणचे यात्रा महोत्सव रद्द केले आहेत. श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे चैत्र शुद्ध नवमी निमित्त मोठी यात्रा भरते.

हेही वाचा: कापूस पिकासाठी जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट भारतात

यावेळी देशातील विविध प्रांतातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, कोरोना विषाणूपासून होणारा आजार हा एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे झपाट्याने फैलतो म्हणून, जिल्हाधिकारी षण्गुखराजन एस. व पोहरादेवी येथील महाराज यांच्या संमतीने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे २१ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध नवमीला देवी सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबिरदास महाराज यांनी राष्ट्रीय संत डॉ. रामरावबापू महाराज आश्रमाच्या वतीने, गोर बंजारा धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी लाऊडस्पीकरवरून गावातील नागरिकांनी घरूनच दर्शन घेण्याची विनंती केली. यावेळी सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करून देवी सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबिरदास महाराज यांनी जगद्गुरू संत सेवालाल महाराज मंदिरात व राष्ट्रीय संत डॉ. रामरावबापू महाराज आश्रमात गोर बंजारा समाज बांधवांचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज व शेखर महाराज यांनी धार्मिक पूजा अर्चा करून आरदास म्हणून भोगभांडरा अर्पण करण्यात आला.

हेही वाचा: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणखी चार रेल्वेगाड्या रद्द

यावेळी बाबूसिंग महाराज यांनी देशातील कोरोना महामारीचे संकट दूर करण्याची प्रार्थना जगदंबादेवी, जगद्गुरू संत सेवालाल महाराज, राष्ट्रीय संत डॉ. रामरावबापू महाराज यांच्याकडे केली.

अनेक वर्षांपासून लाखोंच्या साक्षीने पार पडणारी ही यात्रा व भाविकांच्या गर्दीने गजबजून जाणारा परिसर सलग दुसऱ्या वर्षी कोरोना आजारामुळे सामसूम होता. यात्रे निमित्त श्रीक्षेत्र पोहरादेवीच्या दहा किमी परिसरातील झाडाचा आसरा घेऊन राहणारे भाविक यावेळी आले नसल्यामुळे भाविकांच्या अनुपस्थित धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.

संपादन - विवेक मेतकर