'त्याचा' क्रोध झाला शांत अन् या जिल्ह्यातील लोकांना मिळाला दिलासा

अनुप ताले
शुक्रवार, 29 मे 2020

जगात उष्ण शहरांमध्ये गणती होणारे राज्यातील शहर म्हणजे अकोला. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील उष्णतेचा आलेख चढताच असून, दरवर्षी पारा 47 ते 48 अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारत आहे. त्यामुळे फणफणनारे शहर म्हणून अकोल्याची सर्वदूर ओळख बनली आहे. यावर्षी सुद्धा मे मध्ये सूर्याने आग ओकायला सुरूवात केली आणि 25 मे रोजी मोसमातील सर्वाधिक 47.4 अँश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे या आठवड्यात नक्तीच आतापर्यंतचे उचांकी 48 अंश सेल्सिअसच तापमानाचे रेकॉर्ड मोडित निघेल असे वाटत होते. परंतु....

अकोला : आठवडाभरापासून अकोलेकर फणफणत्या उन्हाचा सामना करत आहेत. मात्र गुरुवारी (ता.28) अचानक तापमानात घसरण होऊन पारा 44.2 अंशावर येऊन पोहोचला. त्यामुळे काही प्रमाणात का असेना, अकोलेकरांना दिलासा मिळाला. परंतु पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले असल्याने चिंता कायम आहे.

 

गेल्या काही वर्षात जगातील सर्वोष्ण शहरांमध्ये अकोलाचे नाव नोंदले गेले आहे. यापूर्वी सर्वाधिक 48 अंश सेल्सिअस व त्यानंतर 47 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद अकोल्यात झाली होती. यावर्षी सुद्धा सूर्य आग ओकत असून, चार दिवसांपासून अकोल्यात 46 अंशाहून अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. सोमवारी (ता.25) तर, सूर्याचा तीव्र प्रकोप अकोलेकरांना सोसावा लागला. सकाळी 9 वाजतापासूनच सूर्य आग ओकायला लागला आणि नवतपाच्या पहिल्याच दिवशी मोसमातील सर्वाधिक 47.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद सोमवारी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा 46.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहले. त्यामुळे आठवडाभर अकोल्यात सरासरी 46 अंश सेल्सिअस तापमान होते. परंतु, बुधवारी अचानक 1.5 अंशाने पारा घसरून 44.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली आणि गुरुवारी दिवसभरात सुद्धा 44.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.

 

हे ही वाचा : उत्पादकतेसोबतच सोयाबीनची गुणवत्ताही वाढवायची असेल तर करा हे...

मॉन्सूनसाठी 15 जूनपर्यंत प्रतीक्षा
उत्तर पूर्वी राज्य आणि हिमालयाच्या पायथ्या लगतचा प्रदेश सोडून सर्वत्र उष्णतेची लाट आलेली दिसत आहे. महाराष्ट्रात ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. अकोल्यासह विदर्भात 31 मे किंवा 1 जून रोजी पाऊस हजेरी लावू शकतो. परंतु, जोरदार मॉन्सूनसाठी राज्याला 15 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
- संजय अप्तूरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

हे ही वाचा : अभिनंदन! तुम्हाला गोंडस मुलगा झाला; मात्र थांबा, तुम्हाला बाळाला भेटता येणार नाही, काय झाले असे?...वाचा

 

रात्री उशिरापर्यंत उष्ण झळा
आठवडाभरापासून अकोला फणफणत असल्याने दिवसा तसेच रात्रीही तापमानाचा जोर अधिक जाणवत आहे. कमाल 46 हून अधिक व किमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहत असल्याने रात्री उशिरापर्यंत उष्ण झळा जाणवत आहेत. बुधवारी, गुरुवारी कमाल तापमान काही प्रमाणात घसरले असले तरी, रात्री उशिरापर्यंत उष्ण झळा व गर्मी जाणवत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temperature dropped in Akola