esakal | खासगी रुग्णालयातून रेमडेसिव्हिअरचा काळाबाजार

बोलून बातमी शोधा

खासगी रुग्णालयातून रेमडेसिव्हिअरचा काळाबाजार; १४ जणांवर गुन्हे
खासगी रुग्णालयातून रेमडेसिव्हिअरचा काळाबाजार; १४ जणांवर गुन्हे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः रेमडेसिव्हिअरच्या काळाबाजारप्रकरणी आतापर्यंत १४ लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यात मंगळवारी अटक करण्यात आलेल्या सात आरोपींचाही समावेश आहे. यातील सर्व आरोपी हे चार खासगी रुग्णालयातील नर्सिग स्टाफमधील कर्मचारी आहेत. शहरातील चार खासगी रुग्णालयातील हा नर्सिग स्टाफ असून,तेथून इंजेक्शनची चोरी करून तब्बल २५ हजाराला विक्री करायचे. मात्र, याबाबत रुग्णालयाकडून अद्याप एकही तक्रार दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे, या रुग्णालयांची चौकशीही नाही.

सध्या या चारही खासगी रुग्णालयातील नर्सिग स्टाफला ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, या प्रकरणात आतापर्यंत कुठल्याही संबंधित खासगी रुग्णालय अथवा डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली नसल्याने काळाबाजार करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे.

हेही वाचा: एक कोटी देतो रेमडीसिव्हर द्या, मी फुकट वाटतो

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपींमध्ये समावेश असलेल्या नर्सिग स्टाफनं हे रेमडेसिव्हिअर जेथे काम करतात तेथून चोरल्याचं समोर आल आहे. असे असताना येथील डॉक्टरांनी रेमडेसिव्हिअर चोरी अथवा गहाळ झाल्याची तक्रार सुद्धा दिली नाही.

कोविड सेंटरवरील सात जणांना ठोकल्या बेड्या

होटेल रीजन्सी कोविड केअर सेंटरसह शहरातील विविध रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन चोरून ते बाहेर अधिक दराने विकणाऱ्या सात जणांना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री बेड्या ठोकल्या. या सात जणांमध्ये होटेल रीजन्सी येथे काम करणाऱ्या युवतीसह मेडिकल व हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या युवकांचा समावेश आहे. या सात जणांनी तब्बल वीस इंजेक्शनची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. डाबकी रोडवरील रहिवासी निकिता नारायण वैरागडे (२५) ही रीजन्सी हॉटेल येथील कोविड सेंटरमध्ये कामाला होती तर कार्तिक मोहन पवार (२०) हा शिवनगर मोठी उमरी येथील रहिवाशी देशमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कामाला होता. या दोघांसह गौतम नरेश निदाने हा युनिक हॉस्पिटल कोविड केअर सेंटर येथे कामाला होता. अभिषेक जगदीश लोखंडे (मोठी उमरी), शुभम दिनेश वराडे (लाडीस फाईल), देवेंद्र संजय कपले (मोठी उमरी) व अंकित संतोष तिकांडे (मोठी उमरी) या सात जणांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची इंजेक्शन त्यांना न देता त्या इंजेक्शनची चोरी केली. त्यानंतर या इंजेक्शनची शहरातील विविध कोविड केअर सेंटर तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना काळ्या बाजारात चढ्या दराने मोठ्या प्रमाणात विक्री केली. या प्रकाराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या सातही आरोपींना ताब्यात घेतले. रेमडेसीवीर प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आलेल्या सात आरोपींना न्यायालयाने १ मेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

हेही वाचा: राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!

काळाबाजार रोखण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय

रेमडेसिव्हिअरचा काळाबाजार रोखण्यासाठी औषध विक्रेत्यांनी इंजेक्शनच्या बाटलीवर रुग्णाचे नाव व बिल क्रमांक नमुद करावा, असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) वि.द. सुलोचने यांनी केले आहे. उपचार करणारे डॉक्टरांनीही रुग्णास इंजेक्शन देण्यापूर्वी त्यावर रुग्णाचे नाव व बिल क्रमांक असल्याची खात्री करावी व रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार रोखण्यासाठी सहकार्य करावे. त्यामुळे काळाबाजार रोखला जाईल.

संपादन - विवेक मेतकर