
रेल्वेखाली येऊन मायलेकांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पारस येथील रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
बाळापूर, (जि.अकोला) : रेल्वेखाली येऊन मायलेकांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पारस येथील रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मायलेकांच्या मृतदेहांचा शवविच्छेदनासाठी सर्वोपचार मध्ये नेण्यात आले आहे.
बाळापूर येथील श्रद्धा नामक तीस वर्षीय महीला आपल्या आजारी मामाला पाहण्यासाठी आपल्या आठ वर्षीय मुलासह जोगलखेड येथे गेली होती.
हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
जोगलखेड येथून परत येत असताना पारस येथे रेल्वे रुळ ओलांडताना भुसावळ येथून येत असलेल्या गितांजली एक्स्प्रेस या रेल्वेखाली येवून दोघे मायलेकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. हि घटना आज शनिवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच बाळापूर व रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला.
मृत महीलेचा विवाह अकोला येथील रमाबाई आंबेडकर नगर येथे झाला होता. मात्र तीचा पती दारु पिऊन धिंगाणा घालत होता. व मारहाण देखील करत होता. त्यामुळे ती आपल्या तीन मुलांसह बाळापूर येथे आपल्या माहेरी राहत होती. आज शनिवारी ती जोगलखेड येथे गेली होती. परत येताना एका आठ वर्षांच्या मुलासह तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - कोरोनाची धास्ती, उडाली झोप, इंग्लंडवरून अकोल्यात पोहोचलेल्या आठ प्रवाशांमुळे वाढली डोकेदुखी
मरतानाही होता मायलेकांचा हातात हात
सदर महीला हि आपल्या नातेवाईकासह रेल्वे रुळ ओलांडत होती. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या नागरिक व प्रवाशांनी त्यांना थांबण्याचे सांगितले, मात्र त्या महीलेने न ऐकता रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. रुळ ओलांडताना नागरीकांनी आरडाओरडा करून मुलाचा हात पकडला मात्र त्या चिमुकल्याने त्याच्या आईचा हात घट्ट पकडला होता. त्यामुळे त्या मायलेकांना वाचवण्याचा प्रयत्न फसला.
(संपादन - विवेक मेतकर)