गोठ्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी अाणि थंडावा राहण्यासाठी पंख्यांचा वापर करावा.
गोठ्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी अाणि थंडावा राहण्यासाठी पंख्यांचा वापर करावा. 
अ‍ॅग्रो

वाढत्या तापमानात जनावरांची घ्या काळजी

डॉ. चेतन लाकडे,डॉ. अनिल पाटील,डॉ. सुनील सहातपुरे

वाढत्या तापमानात जनावरासाठी छत तयार करून सावलीची सोय करणे, जनावरांवर थंड पाण्याच्या फवारा करणे, गोठ्यामध्ये पंखे लावणे, जनावरांना खाद्य देण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे. अशा उपाययोजना करून जनावरांचे दुग्धोत्पादन अाणि गर्भ धारणेच्या प्रमाणात सुधारणा करणे अाणि सातत्य ठेवणे शक्य आहे.

वातावरणातील बदलानुसार अाणि अति उष्ण वातावरणात दूध उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून जनावरांच्या व्यवस्थापनात योग्य ते बदल करावे लागतात. वाढत्या तापमानामुळे जनावरांवर ताण येतो. शरीराचे तापमान वाढायला सुरवात होते. दुधाळ जनावरांमध्ये जास्त प्रमाणात दूध उत्पादनाचा ताण असतो. उष्ण वातावरणात खाद्य खाण्याचे प्रमाण व पचन क्रिया मंदावते. त्यामुळे दूध देण्याचे प्रमाण कमी होणे, गाभण न राहणे व शरीर वाढ खुंटणे असे परिणाम दिसून येतात. ४० अंश सेल्सिअस तापमानाच्या वर जनावरांची खाद्य खाण्याची क्षमता अर्ध्यापेक्षा कमी होते. जास्त दूध देणाऱ्या जनावरांवर याचा सर्वांत जास्त परिणाम दिसून येतो.  

जास्त तापमानाचा दुधाळ जनावरांवर होणारा परिणाम
जेव्हा तापमान २७ अंश सेल्सिअस तापमानाच्या वर जाते अाणि आर्द्रता कमी होते तेव्हा दुधाळ जनावरांच्या अारोग्यावर याचा सर्वांत जास्त परिणाम होतो.   

दुधाळ जनावरातील उष्णतेचा ताण दर्शविण्यासाठी आर्द्रतादर्शकाचा वापर केला जातो. तापमान आर्द्रतादर्शक ७२ च्या वर गेल्यास जास्त दूध देणाऱ्या जनावरांवर परिणाम दिसून येतो. तापमान आर्द्रता दर्शकाचा एक अंक वाढणे म्हणजे ०.३२ किलोने दुधाळ जनावाराचे दूध कमी होणे होय. दुधाळ जनावराच्या शरीरातील तापमानात ०.५५ अांश सेल्सिअसने वाढ होणे म्हणजे दुधात १.८ किलो व टीडीएन खाण्यात १.४ ने कमी होणे.

दुधाळ जनावरांसाठी तापमानाचे सुरक्षित क्षेत्र १० ते २४ अांश सेल्सिअस असते. वाढत्या तापमानाचा दुधाळ जनावराच्या रोजच्या वागणुकीवर परिणाम जाणवतो. 

शरिरामध्ये स्त्रवणाऱ्या विविध संप्रेरकामध्ये बदल दिसून येतो. वातावरणातील तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास संप्रेरकाच्या प्रमाणात बदल दिसून येतो. 

उष्णतेचा ताण असणाऱ्या गायीमध्ये ईस्ट्रोजेन व संलग्न संप्रेरकाचे प्रमाण कमी दिसून येते. गर्भ धारणेच्या वेळी किंवा ७ ते १० दिवस आधी जास्त तापमान असल्यास गाभण राहण्याचे प्रमाण कमी राहते.

उपाय योजना
   गोठ्यामध्ये भौतिक सुधारणा करून तापमान कमी करणे.
   चारा देण्याची वेळ आणि पद्धतीत बदल करणे.
   उष्णतेचा ताण सहज सहन करणाऱ्या जनावराची निवड करणे
   उष्णतेचा ताण सहन करणाऱ्या दुधाळ जनावरांचे वंशवाढ पद्धतीने प्रजनन केल्यास तयार होणारी जनावरे उष्ण व दमट हवामान सहजपणे सहन करू शकतात. 
   जनावरांच्या संकरित जाती जसे की, जर्सी, तपकिरी स्विस यामध्ये उष्णतेचा ताण सहन करण्याची शक्ती जास्त असते. होलस्टीन ही गायीची जात उष्णतेचा ताण सहन करण्यास कमी पडते, त्यामुळे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. 
   गोठ्यातील हवेचे तापमान कमी करणे जेणेकरून जनावराच्या शरीराचे तापमान ३८.५ ते ३९.३ अंश सेल्सिअस राहील. 
गोठ्यातील वातावरण थंड राहण्यासाठी गोठ्यामध्ये पंखे किंवा पाण्याच्या फॉगर्सचा वापर करावा.

भौतिक सुधारणा करून वातावरणाचे तापमान कमी करणे
कोणत्याही एक पद्धतीचा अवलंब करून वातावरणातील ताण कमी करणे शक्य नाही. खालील पर्यायाचा एकत्रितपणे अवलंब केल्यास फायदा होतो.

गोठ्याची रचना
गोठ्याची मुख्य बाजू उत्तर – दक्षिण दिशेला असावी. त्यामुळे गोठ्यामध्ये सरळ येणारी सूर्याची किरणे टाळता येतात.

गोठ्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी एका गायीसाठी साधारणपणे ८०० चौ. फूट हवेशीर जागेची व्यवस्था करावी.  

गोठ्याची उंची मध्य भागी १५ फूट व कडेला ८ फूट ठेवल्यास जनावरांना पुरेशी हवेशीर जागा मिळते.

गोठ्याच्या भोवती सावली देणारी झाडे लावावी. गोठ्याचे छत बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहे जसे सौर चिमणी पद्धत किंवा काही भाग उघडा पद्धत. गोठ्याच्या छताला पांढरा रंग लावल्याने उष्णतेची तीव्रता कमी करता येते. 

गोठ्यातील तापमान जनावरांच्या शरीराच्या तापमानापेक्षा कमी असावे, त्यामुळे उष्णता कमी करण्यास मदत होते.

थंड पाण्याचा फवारा  
थंड पाण्याचा फवारा मारून त्यानंतर पंख्याचा वापर करून अंगावरील ओलाव्याचे बाष्पीभवन केल्यास गायीच्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. यामुळे गायीचे ११ टक्के दुग्ध उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते असे दिसून अाले अाहे.

खाद्य देण्याच्या वेळेत बदल 
   सूर्य मावळल्यावरसुद्धा गोठ्यातील तापमान एकदम कमी होत नाही. त्यामुळे जनावरांना रात्रीच्या वेळी चारा खाऊ घातल्यास ते जास्त खातात व शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

   गायीला उन्हाळ्याच्या दिवसात जास्त ऊर्जेची गरज असते सोबतच चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. उष्णतेचा परिणाम गलग्रंथीवर (थायरॉईड ग्रंथी) पण दिसून येतो.  

   पोटातील अवयवाला विशेषतः आतड्याला रक्ताचा पुरवठा कमी होतो, त्यामुळे महत्त्वाचे मूलद्रव्य शोषून घेतली जात नाहीत.

   उष्ण वातावरणात गायीचे खाद्य खाण्याचे प्रमाण ८ ते १२ टक्क्यांनी कमी होते. पोटातील पचनासाठी अावश्‍यक असणाऱ्या आम्ल तयार होण्याचे प्रमाण कमी झाल्याने दुधाचे उत्पादन कमी होते. 

   खाद्यातील ऊर्जा वाढविण्यासाठी कोरडा चारा खाऊ घालण्यापेक्षा ऊर्जायुक्त खाद्य देणे आवश्यक आहे. यकृतातील ३० टक्के अ जीवनसत्व कमी होतात. त्यामुळे खाद्यात जीवनसत्व अ, ड, ई चा वापर करावा.  

   खाद्य खाण्याचे प्रमाण कमी असल्यास खाद्यामध्ये फॅटयुक्त खाद्याचा वापर करावा. बायपास प्रथिनांचा वापरही उपयुक्त अाहे. खाद्यातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी केल्यास खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते.

   पाण्यासोबत शरीरातील क्षाराचे प्रमाणसुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात कमी होते. त्यासाठी खाद्यामध्ये बफरचा पुरवठा करावा.  

   उष्णतेमुळे जनावरांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे गोठ्यामध्ये २४ तास स्वच्छ थंड पाण्याची व्यवस्था करावी. 

- डॉ. चेतन लाकडे, ८०८७१०९८७८ (नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT