शेतीमधील खर्च आणि उत्पन्नाची दरी कमी व्हावी म्हणून माणिकराव कदम यांनी भेंडी लागवडीचा प्रयोगही केला होता.
शेतीमधील खर्च आणि उत्पन्नाची दरी कमी व्हावी म्हणून माणिकराव कदम यांनी भेंडी लागवडीचा प्रयोगही केला होता.  
अ‍ॅग्रो

लाखाचा पुरस्कार अन्‌ लाखाचे कर्जही फेडता येईना

विनोद इंगोले

दोनोडा येथील शेतकरी माणिकराव कदम यांची व्यथा 

यवतमाळ - डोक्‍यावरील कर्जाचा बोजा कमी होईल म्हणून दोनोडा (ता. कळंब, जि. यवतमाळ) येथील माणिकराव कदम यांनी कृषी संशोधन संस्थांच्या संपर्कातून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. आधुनिक वाणांच्या लागवडीवरही भर दिला; मात्र कोरडवाहू पीक पद्धतीला निसर्गाची साथ न मिळाल्याने गेल्या अनेक वर्षांत त्यांना पीककर्जाचा भरणा करणेही शक्‍य झाले नाही. कर्जाचा बोजा कायम असणाऱ्या माणिकरावांसमोर यंदाच्या खरिपाकरिता लागणाऱ्या पैशाची सोय करण्याचे आव्हान कायम आहे. विशेष म्हणजे प्रयोगशील शेतकरी म्हणून शासनाने त्यांना एक लाखाचा पुरस्कार दिला; परंतु डोईवरील लाख रुपयाचे कर्ज आजही कायम आहे.

दोनोडा येथे माणिकराव कदम यांची नऊ एकर शेती. त्यातील तीन एकर क्षेत्र त्यांचे भाऊ वाल्मीक बाबाराव कदम वाहतात. माणिकरावांकडे त्यानुसार सहा एकरच शेती आहे. शेतीमध्ये सिंचनाच्या कोणत्याच सोयी नाहीत. त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच शेतीचे व्यवस्थापन करावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका त्यांना गेल्या अनेक वर्षांत बसल्याने २०१२ पासून एक लाख रुपयाच्या कर्जाची भरपाई करणेही शक्‍य झाले नाही, असे ते सांगतात. माणिकराव कदम हे यवतमाळ जिल्ह्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा चेहरा आहेत. त्यांच्यापेक्षाही भयानकस्थिती आणि काही हजार रुपये कर्ज थकीत असलेले अनेक शेतकरी एकट्या दोनोड्यात सापडतात. 

मुलांना केले इंजिनिअर

सायबाच्या पोरायसारख मायाबी पोरायन इंजिनिअर व्हावं, असं वाटत होत. म्हणून गाव सोडल अन्‌ वर्ध्यात रायला आलो. भाड्याचं घर, इकतचा दाय-दाना, अंगावर घालाले लागणारे कपडेलत्ते, घरात कोनी बीमार पडल त दवाखाना, पोट्ट्याच्या शाळेची फी असी हनुमानाच्या शेपटीसारखीच पैसे असणारी काम व्हती, असे माणिकराव सांगतात. सहा एकराच्या तुकड्यातून या खर्चाची भरपाई करताना तोंडातून फेस येत जाय. तरी बी गरजा संपतच नवत्या. नाइलाज झाल्याने इंजिनिअर होणाऱ्या पोराले बी कामावर पाठवाव लागलं, अस पाणावलेल्या कडा पुसत माणिकराव सांगत होते. 

बॅंक तं कोणाचबी ऐकत नाई

२००६ ते २०१२ या कालावधीत त्यांनी पीककर्जाचा भरणा नियमित केला आहे.  २०१२-१३ मध्ये १ लाख रुपयांचे कर्ज उचलले; पण त्याचा आजवर भरणा करणे माणिकरावांना शक्‍य झाले नाही. २०१३-१४ पासून कर्ज पुनर्गठणाची योजना सरकारने जाहीर केली. माल कर्ज त त्याच्या आदीच होत! तरी एक प्रयत्न म्हणून पुनर्गठणासाठी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यायले भेटलो. त्यायन बळिराजा चेतना अभियानाकडे पाठवलं. त्यायन तथून निबंधकाकडे मले पाठवलं; निबंधकान आमच्या कळंब येथील बॅंक मॅनेजरच्या नावे पत्र देले; पण बॅंकेने माय काईच ऐकल नाई; आम्ही फक्‍त रिझर्व बॅंकेचच ऐकतो, अस म्हणत बॅंकेच्या मॅनेजरन हुसकावून लावलं, असा बॅंकेच्या बाबतीतला आपला अनुभव माणिकरावांनी कथन केला. या अनुभवानंतर त्यांनी परत कधीच बॅंकेची पायरी चढली नाही. पुनर्गठणाच्या टाइमले ६७ हजार रुपये भरण्याची तयारी दाखवली; पण बॅंकेने त्यालाही प्रतिसाद दिला नाही. म्हणून मग कर्जाचा बोजा कायम रायला तो आजलोक तसाच हाये. आता सरकारन कर्ज माफ केल हाये म्हणतात. पण बॅंकेले त अजून आदेशच आले नाई म्हणतात. बॅंकेले आदेश कई येतील अन्‌ कर्ज माफ कई होईल अन्‌ होईल की नाई हे बी काई माईत नाई, असे खिन्न मनाने माणिकराव सांगत होते. 

शासनाचा पुरस्कार
सरकारी खात्याच्या सल्ल्यावरून इक्रीसॅट, पीकेव्हीच्या संपर्कातून तुरीचे नवे वाण लावले. त्यातून कशीबशी उत्पादकता वाढली असतानाच सरकारने भावात दणका देला, असे ते सांगतात. तुरीचे भाव तीन हजारांवर आले अन्‌ मागचेच दिवस पुढे आले. सरकारने वावरात नवे प्रयोग केले म्हणून माया गौरव केला. एक लाख रुपयांचा पुरस्कार बी देला. ते पैसे उधारी चुकवातच गेले. एका पोराची इंजिनिअरिंगची फी ६० हजार रुपये होती. म्हणून या हंगामात बी पेरासाठी दरसाला बादानुसार उसनवारीच करावी लागली, आता वावर पेरल अन्‌ काई भाग पडीक हाये. पेरलेल बी उगवल पायजे म्हणून वरच्या पाण्याची गरज हाय. म्हणून डोये अभायाकडेच लावून बसलो हाये. पडीक वावर पेरासाठी पैशाची गरज हाय त इथ सरकारच्या कर्जमाफी आदेशाकडे डोये लागून हायत ! असे माणिकराव सांगताना शून्यात हरवले होते.  
 

असे गेले हंगाम...
२०१३ - पेरणीनंतर जास्त पाऊस झाल्याने तूर पीक जळाले. 
२०१४ - या वर्षीदेखील पेरणीनंतरच्या जास्त पाण्याचा फटका तुरीला बसला. 
२०१५ - खंड दिलेला पाऊस धो-धो पडला अन्‌ तूर पुन्हा जळाली. 
२०१६ - तुरीला भावच भेटला नाही.
२०१७ - एक लाख रुपयाचा पुरस्कार भेटला. पन उसनवारी, घरखर्च अन्‌ मुलाच्या शिक्षणावरच ते पैसे खर्च झाले. जुन्याच नव कराले आता कर्जमाफीची आस तेवढी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT