गोठ्यामध्ये म्हशींसाठी पूर्णवेळ पाण्याची सोय, हालचालीकरिता जागा उपलब्ध असावी. 
अ‍ॅग्रो

म्हशींच्या चांगल्या अारोग्यासाठी गोठ्याची रचना महत्त्वाची

सकाळवृत्तसेवा

हवामान, उपलब्ध असणारे मनुष्यबळ, चारा व पाण्याची उपलब्धता, गोठ्याला जोडणारा रस्ता व उंची इ. बाबी गोठा तयार करताना विचारात घ्याव्यात. म्हशीची शारीरिक स्थिती उत्तम निरोगी राहण्याकरिता ताणरहित वातावरण गोठ्यामध्ये मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी अावश्‍यक बाबींचा विचार करून गोठ्याची बांधणी करावी.  

महाराष्ट्राचा भौगोलिक विचार करता कोकण, पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्र, विदर्भ येथील पावसाळा व उन्हाळा इ. ऋतूमध्ये बराच फरक आहे त्यामुळे गोठा बांधताना अापल्या भागातील हवामानाचा विचार करावा. शिवाय म्हशींकरिता आरामशीर तसेच ताणरहित वातावरण गोठ्यामध्ये असणे हे अधिक दूध उत्पादन, उत्तम संगोपन, कमी मनुष्यबळाचा वापर इ. साठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पशुपालक म्हैसपालनामध्ये गोठ्याची निर्मिती हे उपलब्ध जागा, तयार करण्याकरिता लागणारा पैसा, म्हशीची संख्या इ. बाबींचा विचार करून बांधतात. सुयोग्य गोठ्यामध्ये पूर्णवेळ पाण्याची उपलब्धता, चाऱ्यासाठी उत्तम जागा, शेण व मलमूत्र यांचा योग्य निचरा, म्हशीसाठी सुयोग्य जागा व शारीरिक हालचालीकरिता जागा असणे अत्यंत गरजेचे आहे. 

म्हशीच्या संख्येनुसार गोठ्याची रचना 
   छोटे म्हैसपालक जे २ ते १० म्हशींचे संगोपन करतात अशा ठिकाणी फक्त म्हशी बांधण्याकरिता गोठे तयार केले जातात. अशा गोठ्यामध्ये पूर्णवेळ पाण्याची सोय, हालचालीकरिता जागा इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव नसतो. म्हशीकरिता मनुष्याद्वारे पाणी देणे, शेण हाताने काढणे तसेच कोबा किंवा फरशी टाकून गोठा तयार केला जातो. 
   मध्यम म्हैसपालक जे १० ते ५० म्हशीपर्यंत संगोपन करतात अशा ठिकाणी सुयोग्य गोठा तयार करणे हे अत्यंत गरजेचे आहे. तसेच मोठे म्हैसपालक जे ५० हून अधिक म्हशीचे संगोपन करतात त्यांनी आधुनिक पद्धतीचा गोठा बांधणे अत्यंत गरजेचे आहे.

गोठा कसा बांधावा?
   गोठ्यामध्ये सदैव पाण्याची उपलब्धता असावी.
   गव्हाणीची लांबी म्हशीसाठी २५ ते ३० इंच व रेडकासाठी १५ ते २० इंच इतकी असावी.
   रेडकासाठी व १ वर्षाखालील म्हशीकरिता मोकळी जागा असावी.
   म्हशीचे शेण व लघवीचा लवकर निचरा होईल अशी व्यवस्था असावी. गोठ्यातील जमिनीला उतार द्यावा.
   बसण्याची जागा ओलसर होऊ नये यासाठी गोठ्यामध्ये सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था असावी.  
   गोठ्यामध्ये खड्डे, जमीन चढउताराची होणार नाही याची दक्षता घ्यावी.
   चारा, पशुखाद्य, कुट्टीमशीन, औषधे व मजुरांसाठी जागा उपलब्ध असावी.
   मशीनद्वारे दूध काढण्याची सुविधा तयार करायची असेल तर अशी सुविधा निर्माण करण्याच्या बाबींचा विचार करावा.

गोठ्याचे प्रकार
सामान्यपणे गोठ्याचे ठाणबंद पद्धत, मुक्त संचार पद्धत अाणि अर्धवेळ ठाणबंद व मुक्तसंचार पद्धत असे तीन प्रकार आहेत.
गोठ्याच्या प्रकारानुसार फायदे व तोटे

ठाणबंद गोठा पद्धत
   म्हशी सदैव एका जागी बांधल्यामुळे शारीरिक हालचाली अत्यंत कमी होतात. यामुळे म्हशीमध्ये चयापचय, दूध उत्पादन इ. बाबींवर परिणाम होतो.
   म्हशीचे शेण, लघवी जागेवर असल्यावर म्हशी दररोज स्वच्छ करणे गरजेचे होते.
   गोठ्यातील ओलसरपणामुळे कासदाह, कृमीचा प्रादुर्भाव होतो.
   म्हशींना ठराविक वेळी चारा, पाणी जागेवर उपलब्ध करून द्यावे लागतात.
   गोठ्याच्या छप्पराचा प्रकार (पत्रे, सिमेंट, कौले किंवा गव्हाचे तणस) व बसण्याची जागा (मुरुम, फरशी किंवा कोबा) यांचा विविध मोसम पावसाळा, हिवाळा व उन्हाळ्यामध्य काही फायदे तसेच तोटे असतात.

मुक्त संचार पद्धत 
   म्हशींना सदैव पाणी व ठराविक वेळी चारा उपलब्ध असल्यामुळे पोषण चांगले होते.
   शरीराची हालचाल व रक्ताभिसरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.
   गोठ्यामध्ये ओलसरपणा नसल्यामुळे कासदाह, आजाराचे प्रमाण कमी होते.
   माशा तसेच गोचीडाचा त्रास कमी होतो.
   पुरेसा व्यायाम, सूर्यप्रकाश यामुळे "ड'' जीवनसत्त्वाची उपलब्धता होते, खुराची व्यवस्थित निगा राखता येते, माजाचे निदान होते इत्यादी बाबींचा फायदा होतो.
   म्हैस पालनाकरिता कमी मजूर लागतात.
   उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून कमी खर्चात गोठा बांधणी शक्‍य होते.

अर्धवेळ ठाणबंद व मुक्तसंचार पद्धत 
   गोठा बांधण्याकरिता कमी जागा लागते हे शहरामध्ये किंवा शहराजवळील तसेच कमी जमीन उपलब्ध असणाऱ्या पशुपालकांकरिता फायदेशीर आहे.
   म्हशीच्या रेडकांना वेगळी जागा नसल्यामुळे वाढीवर संगोपनावर विपरीत परिणाम होतात.
   गोठ्यातील जागा हवेशीर नसते.

-डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२, (स्नातकोतर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

Ashadhi Wari 2025: विठूनामाने ‘प्रवरा संकुल’चे मैदान दुमदुमले; अश्‍वरिंगण सोहळा उत्साहात, १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Raju Shetti: शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे नको: राजू शेट्टी; 'शक्तिपीठ'मुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार

SCROLL FOR NEXT