जिवाणू खते शेणखतात मिसळून सरीमधून द्यावे.
जिवाणू खते शेणखतात मिसळून सरीमधून द्यावे. 
अ‍ॅग्रो

उसासाठी द्रवरूप जिवाणू खतांचा वापर

आर. आर. मोरे, एस. डी. घोडके

जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता सुधारण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्‍यक आहे. रासायनिक खतांची उपलब्धता वाढविण्याचे काम जिवाणू खते करतात, त्यामुळे उसासारख्या नगदी पिकाला जिवाणू खतांचा वापरही अनिवार्य ठरत आहे. 

प्रयोगशाळेत उपयुक्त जिवाणूंची वाढ करून ते विशिष्ट माध्यमात मिसळून तयार केलेल्या खतास जिवाणू खत असे म्हणतात. त्यांच्या विविध प्रकारांची माहिती घेऊन उसासाठी वापर करावा.  

जिवाणू खतांचे प्रकार
नत्र स्थिर करणारे जिवाणू -

ॲझोटोबॅक्‍टर, ॲझोस्पिरीलम व रायाझोबियम या तीन प्रकारचे जिवाणू नत्र स्थिरीकरण करतात. ॲझोटोबॅक्‍टर हे असहजीवी पद्धतीने, ॲझोस्पिरीलम उपसहजीवी पद्धतीने आणि रायझोबियम हे सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करतात. वातावरणामध्ये ७८ टक्के नत्र आहे. मात्र वायुरूप स्वरूपातील नत्र पिके घेऊ शकत नाहीत. वरील प्रकारचे जिवाणू जमिनीमध्ये आणि वनस्पतींमध्ये असतात. ते हवेतील वायुरूप नत्र शोषून घेतात व त्याचे रूपांतर अमोनिया नत्रामध्ये करतात. नायट्रिफिकेशन क्रियेमध्ये अमोनिया नत्राचे रूपांतर नायट्रेट नत्रात होऊन ते पिकास मुळांद्वारे उपलब्ध होते.
याशिवाय ॲसिटोबॅक्‍टर डायझोट्रॉफिक्‍स हे नत्र स्थिर करणारे जिवाणू शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. हे जिवाणू उसाच्या रसामध्ये आढळतात. उसाच्या संपूर्ण शरीरात उदा. खोड, पाने व मुळे यांमध्ये ते असतात. त्यांच्या संपूर्ण जीवनकालावधीमध्ये ते नत्र स्थिरीकरण करतात. ॲझोस्पिरीलम जिवाणूपेक्षा तीनपट जास्त नत्र स्थिरीकरण ते करतात. एका वर्षामध्ये एक हेक्‍टर क्षेत्रात हे जिवाणू साधारणपणे २०० किलो नत्र स्थिर करतात. ॲसिटोबॅक्‍टर यांच्याबरोबरच हर्बास्पिरीलम, ॲझोरक्‍स, बुरखोलडेरिया, डायझोट्रॉफिक्‍स हे जिवाणूसुद्धा पिकाच्या अंतर्गत भागात राहून नत्र स्थिर करतात.

प्रमाण - ॲसिटोबॅक्‍टर डायझोट्रॉफिक्‍स ३ लिटर प्रति ५०० लिटर पाणी प्रतिहेक्‍टरी या प्रमाणात सकाळच्या वेळी फवारणी करावी. 

स्फुरद विरघळविणारे जिवाणू -
नत्रानंतर स्फुरद हे पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक प्रमुख अन्नद्रव्य आहे. जमिनीमध्ये टाकलेल्या स्फुरदापैकी केवळ १० ते २० टक्के स्फुरदच पिकांना उपलब्ध होते. उर्वरित ८५ ते ९० टक्के स्फुरद जमिनीमध्ये अविद्राव्य स्वरूपात राहते. जमिनीचा सामू बिघडून ती विम्लधर्मीय झाल्यास जमिनीतील स्फुरद कॅल्शिअम फॉस्फेटच्या स्वरूपात स्थिर होतो. तसेच, जमिनीत स्फुरदाचे ॲल्युमिनिअम व लोह फॉस्फेट असे अविद्राव्य स्वरूपात रूपांतरण होते, त्यामुळे स्फुरद पिकांना उपलब्ध होत नाही. या जिवाणू खतांमुळे जमिनीत एक प्रकारचे आम्ल तयार होते. जमिनीतील अविद्राव्य स्वरूपातील स्फुरदाचे या आम्लामुळे विद्राव्य स्वरूपात रूपांतर होते, त्यामुळे पिकांना स्फुरदाची उपलब्धता होते. 

प्रमाण - स्फुरद विरघळविणारे द्रवरूप जिवाणू खत प्रतिहेक्‍टरी २.५ लिटर प्रति ५०० किलो शेणखतात मिसळून लागणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे. 

पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू -
प्रकाशसंश्‍लेषण, प्रथिनेनिर्मिती, पाणी धरून ठेवणे आणि संप्रेरकांचे कार्य वाढविणे याचबरोबर पिकांचे उत्पादनही वाढविण्यासाठी पालाशची गरज असते. जमिनीत पालाश हा सिलिकेटच्या क्षारांच्या स्वरूपात (उदा. फेल्स्पार, मायका व चिकण माती) अडकलेला असतो. अशा प्रकारचा पालाश उपलब्ध करून देण्याचे काम फ्रॅट्युएरा ऑरेन्शियासारखे जिवाणू करत असतात. हे जिवाणू वेगवेगळी सेंद्रिय आम्ले उत्सर्जित करतात. त्याशिवाय पालाशचा वापर करून पिके निर्माण करीत असलेल्या सिडेरोफोरस या संजीवकाचीही निर्मिती करतात. त्यामुळे पिकाची शारीरिक क्रिया वेगवान होते. संशोधकांनी विकसित केलेल्या पालाश उपलब्ध करून देणाऱ्या द्रवरूप जिवाणू खतांमध्ये फ्रॅट्युएरा ऑरेन्शियाबरोबर बॅसिलस प्रजातीचे ५ प्रकार व सुडोमोनास प्रजातीचा १ प्रकार अशा ७ प्रकारच्या जिवाणूंचा एकत्रित समूह केला आहे. हे जिवाणू एकत्रितपणे वेगवेगळी आम्ले तयार करून देण्याचे कार्य करतात. 

प्रमाण - जिवाणू खत प्रतिहेक्‍टरी २.५ लिटर प्रति १ टन शेणखतात मिसळून जमिनीत मुळांजवळ द्यावे. किंवा २.५ लिटर प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीत आळवणी करावी. 

गंधक आणि सिलिकॉन उपलब्ध करून देणारे जिवाणू -
गंधकाच्या कमतरतेमुळे उसामध्ये क्‍लोरॉसिस ही विकृती निर्माण होते. त्यामुळे गंधकाचा उसामध्ये वापर हा अनिवार्य आहे. गंधक विघटन करणारे जिवाणू जमिनीतील अविद्राव्य गंधकाचे विघटन करून पिकांना उपलब्ध करून देतात. 

प्रमाण - गंधक विघटन करणारे द्रवरूप जिवाणू खत प्रतिहेक्‍टरी ५ लिटर प्रति २ टन कंपोस्ट खतात मिसळून जमिनीत मिसळून द्यावे. 

सिलिकॉन पिकाच्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये मोठी भूमिका बजावतात. दुय्यम मूलद्रव्यांमध्ये सिलिकॉनची पिकाला जलद उपलब्धता होत असते. बारा महिन्यांच्या उसामध्ये प्रतिहेक्‍टरी जवळजवळ ३०० किलो सिलिकॉन आढळतो. सिलिकॉन विरघळविणारे जिवाणू जमिनीतील सिलिकॉन विरघळविण्याचे कार्य करतात. तसेच, बगॅस ॲशमधील सिलिकॉन स्रोतातून सिलिकॉन उपलब्ध करण्याचे कार्यही जिवाणू करतात.

प्रमाण - सिलिकॉन विरघळविणारे जिवाणू खत प्रतिहेक्‍टरी २.५ लिटर प्रति १.५ टन बगॅस ॲशमध्ये मिसळून लागणीच्या वेळी द्यावे.  

लोह व जस्त उपलब्ध करून देणारे जिवाणू -
जमिनीत असणारे लोहयुक्त क्षार (उदा. ऑगिट, हार्नब्लेड) व खडकांमधील लोह पिकांना उपलब्ध स्वरूपात नसतात. पिकांमध्ये हरितद्रव्य निर्मितीसाठी लोहाची गरज असते. जमिनीत जस्त हा कार्बोनेट व ऑक्‍साईडच्या स्वरूपात उपलब्ध असतो. लोह व जस्ताचे क्षार विरघळवून पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम वेगवेगळे जिवाणू करतात. अशा वेगवेगळ्या जिवाणूंचा एकत्रित समूह विकसित करण्यात आला आहे. हा समूह पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम करतो.

प्रमाण - जिवाणू खत प्रतिहेक्‍टरी २.५ लिटर प्रति १-१.५ टन शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे, किंवा प्रतिहेक्‍टरी २.५ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीत आळवणी करावी. 

जिवाणू खतांची गरज का?
शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा व पाण्याचा जास्त वापर करतात, त्यामुळे जमिनीचा पोत खराब होऊन जमिनी विम्लधर्मीय बनतात. यावर उपाय म्हणून केवळ सेंद्रिय खतांचा वापर पुरेसा होत नाही. 

सेंद्रिय खतातून पिकांच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये पिकांच्या गरजेनुसार मिळत नाहीत. परिणामी पिकांच्या उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही, त्यामुळे रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय खताबरोबर जिवाणू खतांची जोड द्यावी, त्यामुळे कमीत कमी खर्चात उस तसेच इतर पिकांचे अपेक्षित उत्पादन घेता येते. 

रासायनिक मूलद्रव्यांचे जमिनीत पिकांच्या गरजेइतके प्रमाण असते. मात्र, ती पिकास योग्य त्या स्वरूपात उपलब्ध नसतात. रासायनिक खते आणि सेंद्रिय पदार्थातील अन्नद्रव्यांचे पिकास आवश्‍यक त्या स्वरूपात रूपांतर करण्यासाठी, त्यांची कार्यक्षमता व उपलब्धता वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर आवश्‍यक ठरतो.

- आर. आर. मोरे, ९६५७९८२५८४ (शास्त्रज्ञ व संशोधन अधिकारी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT