अ‍ॅग्रो

विदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसाय

विनोद इंगोले

विदर्भातील उन्हाळ्यात असणारे जिवाची  काहिली करणारे तापमान हीच पोल्ट्री व्यवसायाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. पूरक व्यवसायामध्ये पोल्ट्री उद्योग सुरू करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. अगदी अकोला जिल्ह्यातील ९९ टक्के पोल्ट्री बंद झाल्या, पर्यायाने शेतकऱ्यांच्या आशा- आकांक्षांना मोठा फटका बसला. ज्या कारणांमुळे पोल्ट्री व्यवसाय बंद झाला, त्यावर मार्ग काढत पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) येथील नीलेश झोंबाडे यांच्याप्रमाणेच अनेक शेतकरी करत आहेत. त्यातून अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांत १५ पोल्ट्री उद्योग उभे राहिले. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील गोरव्हा (२), रिधोरा (२), टिटवन (१), बार्शी टाकळी, बोरगावमंजू (प्रत्येकी १), तर नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी (१), वाशीम जिल्ह्यातील मालेगाव, कामरगाव (प्रत्येकी १), बुलडाणा जिल्ह्यात एक यांचा समावेश आहे. एकंदरीत विचार करता पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्‍चिम विदर्भ व त्यातही अमरावती जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायाचा विस्तार अधिक आहे. त्यापाठोपाठ बुलडाणा, वाशीम, वर्धा, यवतमाळ मधील शेतकरी पोल्ट्रीकडे वळू लागल्याचे चित्र दिसते. 

विदर्भात कुक्‍कुटपालनाकरिता पक्ष्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भामध्ये १५ लाख अंडी देणाऱ्या (लेअर) आणि त्याच्या दुप्पट म्हणजे सुमारे ३० लाख मांसल (ब्रॉयलर) कोंबड्यांचे संगोपन होते. अमरावती येथील अमृता हॅचरीजच्या डॉ. शरद भारसाकळे यांनी सांगितले, की एक दिवसाचे पक्षी इच्छुक शेतकऱ्यांना संगोपनासाठी कराराने दिले जातात. त्यातून प्रतिवर्ष १० लाख किलो चिकनचे उत्पादन होऊन, सात कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत जातात. 

उत्तम नियोजनातून अडचणींवर केली मात 
अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) येथील नीलेश सुभाषराव झोंबाडे यांचे काका डॉ. शिवाजीराव झोंबाडे हे लुधियाना येथील पंजाब विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. त्यांचा कर्नाल (हरियाना) येथे पोल्ट्री, तर जालंधर येथे पोल्ट्री फीडचा उद्योग आहे. त्यांच्या व्यवसायामध्ये नीलेश यांनी सात वर्षे मार्केटिंगचा अनुभव घेतला. त्या अनुभवाच्या पायावर स्वतःच्या अकोला जिल्ह्यात २०१५ मध्ये पोल्ट्री व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. अधिक तापमानामुळे जिल्ह्यातील अनेक पोल्ट्री व्यवसाय बंद पडल्याच्या पार्श्वभूमीवर खरेतर हे धाडसच होते. पहिल्या टप्प्यात १६ लाखांची गुंतवणूक करून सहा हजार पक्ष्यांचे शेड उभारले. पुढे २०१७ मध्ये दहा लाख गुंतवणूक करत आणखी सहा हजार पक्षी क्षमतेचे दुसरे शेड उभारले.

रायपूर येथून एका दिवसाच्या पक्ष्यांची खरेदी सुमारे ३५ ते ४० रुपये याप्रमाणे केली जाते. दर १५ दिवसांनी एक बॅच निघावी, असे नियोजन केले जाते.  

तापमान नियंत्रणासाठी खास उपाययोजना ः बाहेरील तापमान उन्हाळ्यामध्ये ४८ अंशांपर्यंत जाते. या वेळी पोल्ट्रीतील तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यात फॉगिंग, फॅन आणि स्प्रिंकलर अशा शीतकरण घटकांचा समावेश आहे. शेडवर स्प्रिंकलर बसवले असून, शेड दोन्ही बाजूने ज्यूटच्या पोत्यांनी झाकले जाते, ती ड्रिप पाइपद्वारे सतत ओली राहतील असे नियोजन असते.

एक ते दहा दिवस दाणेदार खाद्य (पौष्टिक घटकांचा समतोल असलेले खाद्य) देण्यावर भर राहतो. पक्ष्यांचे वजन सरासरी २ किलो मिळण्यासाठी पशुखाद्यावरील खर्च ९० रुपयांपर्यंत जातो. सहा हजार पक्ष्यांच्या संगोपनाकरिता सरासरी ३६ हजार रुपये खर्च होतो. एक दिवसाचा पक्षी (४० ग्रॅम वजन) त्यानंतर दहा दिवसांत २८० ग्रॅम, २० दिवसांनंतर ८०० ग्रॅम त्याचे वजन मिळते. त्यानंतर ३२ ते ३५ दिवसांत दोन किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजन मिळते. 

प्रतिजैविकांचा वापर टाळला असून, त्याऐवजी वनस्पतिजन्य औषधांचा वापर करतात. यामुळे प्रतिजैविकांच्या वापरातून ४२ दिवसांत पक्ष्यांचे वजन २ किलोपर्यंत मिळत असताना, वनस्पतिजन्य औषधांच्या माध्यमातून ते केवळ ३२ ते ३५ दिवसांत मिळत असल्याचे नीलेश सांगतात. या औषधांसाठीचा खर्चही २ ते ३ रुपयांनी कमी राहतो.  

विक्री व्यवस्था ः देशभरातील दर कळत राहण्यासाठी नीलेश यांनी एसएमएस सुविधा कार्यान्वित करून घेतली आहे. त्यानुसार अधिक दर असलेल्या नाशिक, संबलपूर (ओरिसा), वाशीम, मंगरूळपीर, नागपूर, इंदूर, भोपाळ भागात ते मालाचा पुरवठा करतात. या व्यवहारात वाहतुकीचा खर्च सामान्यतः खरेदीदाराकडे असतो.  

अनुकरण, मार्गदर्शनातून मिळाले प्रोत्साहन...
गोरव्हा शिवारात नीलेश झोंबाडे यांचे अनुकरण करत शुभम राजेश खांबलकर व नीलेश राठोड यांनीही पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. शुभम खांबलकर यांच्याकडे जेमतेम दोन एकर शेती असून, दीड हजार पक्ष्यांचे संगोपन ते गेल्या वर्षापासून करतात. शेड उभारणीसाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला. नीलेश राठोड यांच्याकडे एक हजार पक्षी आहेत. शिवारात अन्य ठिकाणी १५ पोल्ट्री सुरू असून, सद्यःस्थितीत ६० हजार पक्ष्यांचे संगोपन होते. 

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात आशिष दारोकार यांच्या कुटुंबीयांचा दहा वर्ष जुना पोल्ट्री व्यवसाय आहे. दोघे भाऊ मिळून १९ हजार पक्ष्यांचे संगोपन करतात. आशिष यांच्याकडील पक्ष्याची संख्या ११ हजारांवर आहे. त्याकरिता २७ लाख रुपये खर्चून साडेबारा हजार चौरस फूट आकाराचे शेड उभारले आहे. त्यातील १६ लाख ५० हजार रुपये बॅंकेकडून कर्ज घेतले. मूळ चेन्नई येथील खासगी कंपनीशी झालेल्या करारानुसार एक दिवस वयाचे पक्षी, औषधे आणि खाद्य यांचा पुरवठा कंपनीकडून होतो. पक्ष्यांचे ४० दिवस संगोपन केल्यानंतर त्यांचे वजन २ किलो ३०० ते ४०० ग्रॅम पोचते. ८ रुपये किलोप्रमाणे दर दिला जातो. पशुखाद्य, वीज, मजुरी यावर ८ रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. त्यातून प्रति बॅच सरासरी ८ रुपयांपर्यंत शेतकऱ्याला मिळत असल्याचे आशिष यांनी सांगितले.    ः आशिष दारोकार, ९४२१६०१३८१

तेजापूर (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील उच्चशिक्षित सचिन टोगे यांनी १८ लाख रुपयांची गुंतवणूक करीत पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याकडे पाच हजार पक्षी असून, विक्रीकरिता खासगी कंपनीशी करार केला आहे. मूळ छत्तीसगड येथील खासगी कंपनीशी पक्षी संगोपनाचा करार केला आहे.  कंपनी पक्षी, फीड पुरविते. पक्ष्यांचे वजन सरासरी २ किलो झाल्यानंतर कंपनीद्वारे मांसल पक्षी विक्रीसाठी पाठवले जातात. ४२ दिवस संगोपन केल्यानंतर किलोमागे सहा रुपये शेतकऱ्याला मिळतात. गेल्या वर्षभरात चार बॅच निघाल्या असून, सध्या पाचवी बॅच शेडमध्ये आहेत. व्यवस्थापनादरम्यान मरतुकीचे प्रमाण चार ते पाच टक्‍के राहते.  ः सचिन टोंगे, ९७६५३०६६६४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT