मूर्तिजापूर/अकोला : अमरावती ते अकोलादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (पूर्वीचे ६) वर राजपथ इन्फ्राकॉनने सलग १०९.८८ तासात ४२.२०० किमी बिटूमिनस काँक्रीटचे पेविंग करून जगातील सर्व विक्रम मोडून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. बुधवारी ता. ७ जून २०२२ रोजी माना कॅम्प येथे 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे निर्णायक स्वप्नील डांगरिकर यांनी राजपथ इन्फ्राकॉनचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांना 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'चे प्रमाणपत्र सुपूर्द केले.
गडकरींनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, "भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, NHAI ने एक जागतिक विक्रम केला आहे, ज्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने प्रमाणित केले आहे." NHAI च्या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल गडकरी यांनी राज पथ इंफ्राकॉन प्राइवेट लिमिटेडचे सर्व अभियंते, कंत्राटदार, सल्लागार आणि कामगारांचे अभिनंदन केले आहे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी राजपथ इन्फ्राकॉन तर्फे 'अखंड रस्त्यावर अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हिंग' या श्रेणीत 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प सोडला. तारीख ३ जून रोजी सकाळी ७.२७ वाजता अमरावती जिल्ह्यातील लोणीपासून अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हिंगच्या कार्याला सुरुवात झाली आणि ता.७ जूनला रात्री ९.२० वाजता अकोला जिल्ह्यातील नवसाळ येथे १०९.८८ तासांत पेव्हिंगचे कार्य पूर्ण करून ८४.४०० किलोमीटरचा विक्रम करण्यात आला.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने विश्वविक्रम झाल्याचे घोषित करताच, या विक्रमासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आज अखेर फळाला आली. यावेळी उपस्थित कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: आनंदाश्रू तरळले. रात्री फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष झाला.'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'जय भवानी जय शिवाजी', 'असा जयघोष सर्वत्र निनादू लागला.
या कामाचा दर्जा राखण्यासाठी आणि तो तपासण्यासाठी सुसज्ज दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा माना कँपला उभारण्यात आलेली आहे. त्यानंतरच ३४,००० मेट्रिक टन बिटूमिनससह इतर सर्व साहित्य प्रत्यक्ष कामासाठी वापरण्यात आले.
गेल्या सहा महिन्यांत, रस्त्याचे चार थर तयार करण्यात आले असून, विक्रमाच्या वेळी हा पाचवा थर टाकण्यात आला. या विक्रमाची नोंद करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी, गिनीज बुक टीमने मंजूर केलेली 22 तज्ज्ञांची चमू तीन शिफ्टमध्ये परीक्षण करीत होती. या तज्ञांमध्ये सर्वेक्षक, अधिवक्ता, टाइम-कीपर, रस्ता अभियांत्रिकी तज्ञ आणि नामांकित महाविद्यालयांचे डीन यांचा समावेश होता. या सर्व कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंते परीक्षण करीत होते.
विदर्भातील ४५-४६ अंश तापमान, अंगातून निघणार्या घामाच्या धारा असतानाही मागील ५ दिवस सातत्याने आव्हानात्मक ध्येय गाठण्यासाठी, दाहक उन्हाच्या झळा सोसत, रात्रंदिवस एक करणाऱ्या, सर्व अभियंता, अधिकारी आणि कामगारांच्या चेहऱ्यावरील थकवा, तणावाची जागा, विश्वविक्रमाच्या घोषणेनंतर आनंदाने घेतली.
या विक्रमी कामासाठी, प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्लालिटी इंजिनिअर, सुरक्षितता अभियंता, सर्व्हेअर, इतर अनेक कर्मचारी आणि विविध सहयोगी कंपन्यांचे इंजिनिअर, कामगार याची निष्णात चमू अहर्निश तैनात होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, ४ हॉट मिक्सप्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाईल फिडर, ६ टॅडेम रोलर,१ पी टी आर मशीन, १०६ हायवा, २ न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह अभियंते, पर्यवेक्षक, मदतनीस,कारागीर असे एकूण ७२८ योद्ध्यांचे,उच्च ध्येयाने प्रेरित, मनुष्यबळ इथे कार्यरत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.