This bird is a friend of the farmer 
Blog | ब्लॉग

'हा' पक्षी म्हणजे शेतकऱ्यांचा...

सूर्यकांत बनकर, करकंब

ज्यांची घरे शेतात आहेत, ज्यांना शेती आहे किंवा ज्यांना कधी शेतात येन- केन कारणाने जाण्याचा योग आला आहे, अशा सर्वांनीच साळुंकी पाहिलेली असणार. लहानपणी गुरे राखायला जायचो. तेव्हा रानात चरणाऱ्या जनावरांच्या मागून गवतातील कीटक खात चालणाऱ्या 'लांड्या' पाहून काही विशेष वाटायचे नाही. सुगीच्या काळात बहरात आलेल्या ज्वारीची राखण करतानाही "लांड्याSSS लांड्या-लांड्या" अशा मोठमोठ्याने हाकाट्या देलेल्या आहेत. घराच्या अंगणात आणि परिसरात अजूनही जोडीने फिरणाऱ्या ह्या लांड्या अर्थात 'साळुंख्या शेतकऱ्यांच्या मित्र आहेत' हे कळायला मात्र खूप उशीर झाला.
अंगणातील पाहुण्यांमध्ये ज्यांची हक्काची जागा आहे अशा साळुंक्यांनी मला सध्याच्या लॉक डाऊनमध्ये जरा वैतागच दिला. कारण दारातील झाडांवरील विविध पक्षांची वर्दळ वाढलेली असताना एखाद्या पक्ष्याला मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी मी जरा पुढे सरसावलो की काहीही संबंध नसताना ह्या साळुंख्या मात्र गलका करुन इतर सर्व पक्ष्यांना सावध करायच्या. लागलीच सर्व पक्ष्यांचे लक्ष माझ्याकडे जायचे आणि कॅमेरा ऑन करुन त्यांच्या दिशेने धरलेला मोबाईल म्हणजे आपणावर रोखलेली बंदूकच आहे, असे समजून क्षणार्धात सर्व पक्षी उडून जायचे. त्यामुळे सगळेच मुसळ केरात जायचे. 
लहानपणापासून जिला 'लांडी' म्हणत आलो त्याच ह्या साळुंकीला 'भारतीय मैना' किंवा सामान्य मैना म्हणतात हे जेव्हा कळाले तेव्हा मुलींना ठेवल्या जाणाऱ्या मैना, साळु अशा नावांचा आणि साळुंखे सारख्या आडनावांचा संदर्भ लागला. एवढेच नाही तर कायम जोडीनेच राहणाऱ्या या मैनेच्या जोडीची ताटातूट होणे शक्यच नसताना पोटाची खळगी भरण्यासाठी लाडक्या बायकोला गावीच ठेवून मुंबईला जावे लागणाऱ्या कामगारांच्या मनाची घालमेल (संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी) व्यक्त करताना शाहीर आण्णाभाऊ साठेंना सुद्धा "माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतेया काहिली" असे म्हणत याच साळुंकीचा आधार घ्यावासा वाटला. यावरुन त्यांची जोडी किती अतूट असते, याचा अंदाज यावा. वरुन गडद तपरिकी रंगाची दिसणारी साळुंकी डोके, मान आणि गळ्याच्या भागावरील काळा तर चोच आणि पायाच्या पिवळ्या धमक रंगामुळे भारी आकर्षक दिसते. विशेष म्हणजे ती उडत असताना तिचे पंख आणि शेपटीचा काही भाग आतून पांढरा असल्याचे आपल्या लक्षात येते. गरगरीत गोल डेळ्याच्या मागेही अर्धचंद्राप्रमाणे थोडा पिवळा रंग असतो. परिस्थितीनुसार वेगवेगळे आवाज काढण्यात साळुंक्या माहिर असतात. जसा त्या कर्णकर्कश आवाज काढतात तसाच त्या पोपटाप्रमाणे सुमधुर आवाज सुद्धा काढतात. म्हणूनच पोपट आणि साळुंकी यांचा दुरान्वयेही काहीही संबंध नसताना माणसाने मात्र केवळ मंजुळ आवाजामुळे 'राघु-मैना' जोडी फेमस करुन टाकली. नाहीतर ना राघुच्या मादीला मैना म्हणतात, ना मैनेच्या नराला राघू म्हणतात. तरीही माणसाने मात्र लैला- मजनू, हीर- रांझा, नल- दमयंती सारखी राघू- मैना ही जोडी का बरे लावली असेल, हे न उलघडणारे कोडेच की! तर अशा ह्या साळुंक्या टोळ आणि कीटक खात असल्याने शेतातील पिकांचे संरक्षणच होते. ह्यामुळेच १८०० मध्ये ऑस्ट्रेलियाने म्हणे कीटकांच्या बंदोबस्तासाठी साळुंक्या आयात केल्या. मात्र तिथे साळुंकीचे नैसर्गिक शत्रू नसल्याने त्यांची झपाट्याने वाढ होत गेली. लक्षणिय वाढलेल्या या साळुंक्यांनी आपली उपजिविका भागविताना कीटकांबरोबरच इतर ऑस्ट्रेलियन पक्षांची अंडी व पिलांवरही ताव मारायला सुरुवात केली. परिणामी तेथिल स्थानिक पक्षांमध्ये घट होवू लागली. शिवाय तेथिल प्रसिद्ध असणाऱ्या अंजिर पिकालाही साळुंक्यांचा आतोनात उपद्रव होवू लागला. याची परिणिती आस्ट्रेलियन शासनाने साळुंकी हा पक्षी धोकादायक म्हणून जाहिर करण्यात झाली. (आहे की नाही गंमत!) कीटकांशिवाय फळे, धान्य, घराच्या परिसरात पडलेले खरकटे अन्न सुद्धा त्या खातात. गवताच्या काड्या, काटक्या, कागद, आदींपासून त्या घरटे बनवितात. आमच्या घरासमोरील गुलमोहराच्या झाडाला टेकून उभ्या केलेल्या चार इंची पाईपमध्ये नर आणि मादीने मिळून वीस फूट उंचीवर घरटे बनविले आहे. कदाचित एव्हाना त्यात मादीने आकाशी निळ्या रंगाची अंडी घातली सुद्धा असतील. रात्रीच्या वेळी एखाद्या झाडावर समुहाने राहणाऱ्या साळुंक्या सुर्योदयापूर्वी मात्र लहान-लहान गटात किंवा जोडीने विभागून अन्न-पाण्यासाठी बाहेर पडतात. मला तसा किर्तनाचा नाद नाही, पण गावात दरवर्षी गीता जंयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्याठिकाणी ध्वनिक्षेपकावरुन होणारी किर्तनसेवा आमच्या घरी सहज ऐकू येते. तेव्हा साळुंकीच्या नावाचा उल्लेख असणारा कोणतातरी अभंग कानी पडल्याचे पुसटसे आठवत होते. त्याचा शोध घेतला असता तो सापडलाही. तो असा आहे - 
"आपुलिया बळे नाही मी बोलत
सखा भगवंत वाचा त्याची
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी,
शिकविता धनी वेगळाची"
आता याचा अन्वयार्थ शोधण्याच्या खोलात न जाता एवढेच सांगतो की साळुंकीचा मंजुळ आवाज ऐकायचा असेल तर मात्र दुपारच्या वेळी त्यांची जोड एखाद्या झाडावर विसावली असताना त्याच झाडाखाली तुम्हाला झोपेचे सोंग घेवून पडून रहावे लागेल. अर्थात माझ्यासारखे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT