Rangapanchami
Rangapanchami  
Blog | ब्लॉग

मराठी माणूस रंगपंचमी विसरणार का?

सायली क्षीरसागर

आजच सकाळपासून सगळ्यांची रंग खेळायची लगबग दिसली. मग लहानपणीचे दिवस आठवले...होळी दिवशी दुपारी मस्त भरपेट पुरणपोळीचे जेवण करून एक झोप काढून, मग संध्याकाळी गडबड असायची ती, होळीच्या तयारीची..मग मित्र-मैत्रिणी गोळा करून (त्यातल्या त्यात आमच्यातला एखादा मोठा म्होरक्या असायचा), सगळ्यांनी एकेक काम वाटून घेऊन सामान आणायला गावभर भटकायचं. संध्याकाळी होळीची तयारी झाली की, सगळं महिला मंडळ होळीची पूजा करायला यायच्या आणि मग पुरूष मंडळींच्या देखील तिथेच गप्पा रंगायच्या. लहान मुलांचा जोरजोरात डफडी वाजण्याचा कार्यक्रम सुरू असायचा. 

होळीची धामधुम संपली की वेध लागायचे ते, रंगपंचमीचे! तीन-चार दिवस रंगपंचमीची तयारी चालायची. रंग, पिचकाऱ्या, फुग्यांची रेलचेल असायची. काही वर्षांपूर्वी शाळांना रंगपंचमीलासुद्धा सुट्टी असायची बरं का! त्यावेळी धुळवड खेळणं महाराष्ट्रात तितकं रूजलेलं नव्हतं. महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार होळीनंतर पाच दिवसांनी म्हणजेच रंगपंचमीलाच रंग खेळले जायचे. पण गेल्या दहा-पंधरा वर्षात होळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच धुळवडीला रंग खेळायची प्रथा पडली आहे. महाराष्ट्रात धुळवड खेळायची परंपरा पण आहे; पण आदल्या दिवशी केलेल्या होळीच्या राखेने ही धुळवड खेळली जाते. 

धुळवड ही मुख्यत्वे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात खेळतात. पण बदलत्या काळानुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येचे प्रमाण देखील बदलत गेले आणि काही प्रमाणात प्रथाही! महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात देखील हे चित्र बदलत गेले...आणि पुण्यातली तरूणाई देखील धुळवडीकडे वळली! याची बरीच कारणं आहेत. कालांतराने आपल्या इथल्या शाळांनीसुद्धा रंगपंचमीऐवजी धुलीवंदनाला सुट्टी द्यायला सुरू केले. त्यामुळे आपसूकच मुलांनासुद्धा रंगपंचमीपेक्षा धुळवड आपली वाटू लागली. 

मराठी लोकांनीच आता धुळवडीला इतके महत्त्व दिले, की रंगपंचमीमधला आपलेपणाच आता निघून गेला आहे. पहिल्यासारखे रंगपंचमीचे कुतुहल आता कोणालाच राहिलेले नाही. रंगपंचमीची वाट बघणं, त्या दिवशी एखाद्याला ठरवून अगदी ओळखू येणार नाही इतकं रंगवणं, येणाऱ्या जाणाऱ्या ओळखीच्यांना फुगे फेकून मारणं, ऑफिसला चाललेल्या काकांना मुद्दाम रंगवण्याची भीती दाखवणं, असे अनेक उद्योग आपल्यापैकी अनेकांनी नक्कीच केले आहेत. 

कदाचित बदलत्या सामाजिक रचनेमुळे असेल किंवा मेट्रोपोलिटन कल्चरमुळे असेल, आपण आपल्या सणावारांच्या दिशाही बदलत चाललो आहोत. इतर सण साजरे करायला अजिबात ना नाही, पण ते साजरे करता करता आपण आपले मूळ हरवता कामा नये. हे सण टिकवून ठेवण्यामध्ये समाजाचा मोठा वाटा असतो. आपण एखादी गोष्ट उचलून धरली की सहजा सहजी त्याला कोणी विरोध करत नाही. शाळांनी रंगपंचमीला सुट्टी न देता धुळवडीला सुट्टी देणे हे म्हणजे आपल्या मूळ संस्कृतीपासून आपल्या मुलांना काही प्रमाणात दूर ठेवल्यासारखे आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे शाळांना असे निर्णय घ्यावे लागत असतील, पण यात आपल्या सणांची परंपरा लोप पावता कामा नये. त्यामुळे शाळांनीदेखील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या पारंपारिक संस्कृतीची किमान तोंडओळख करून द्यावयास हवी.  

आपली संस्कृती जपणारे आपणच असतो, त्यामुळे आपणच या दूरावणाऱ्या काही सणांना पुन्हा आपलंसं करण्याची गरज आहे. धुळवड तर साजरी करूच, पण त्याबरोबर रंगपंचमीही वेळात वेळ काढून तितक्याच आनंदाने खेळू. पुढील पिढीस रंगपंचमी म्हणजे काय, असा प्रश्न विचारण्याची वेळ येऊ नये. जशी आपण लहानपणी रंगपंचमी खेळलो, तितक्याच जोषात पुढेही रंगपंचमी खेळली गेली पाहिजे. ही जबाबदारी आपली. शेवटी आपली रंगपंचमी अशीच धुळवडीच्या रंगात विरून जाणार नाही ना याची खबरदारी घेणे महत्त्वाचे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT