ANI
ANI
Blog | ब्लॉग

अरविंद देव – नामवंत मुत्सद्दी हरपला

विजय नाईक,दिल्ली

देशाचं परराष्ट्र धोरण, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, व व्यूहात्मक विचारसरणी यात त्यांना तज्ञ मानलं जाई. विद्यमान परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जय़शंकर त्यांना गुरू मानायचे.

भारतीय परराष्ट्र खात्यात सर्वश्रुत असलेले नामवंत मुत्सद्दी अरविंद देव यांचे येथे काल मध्य रात्री दोन वाजता निधन झाले. गेले दहा दिवस येथील शारदा व अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर कोरोनाच्या आजाराचे उपचार चालू होते. अखेर हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे प्राणोक्रमण झाले. देव यांचं व्यक्तिमत्व देखणं, उंचपुरं व बलदंड होतं. देशाचं परराष्ट्र धोरण, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, व व्यूहात्मक विचारसरणी यात त्यांना तज्ञ मानलं जाई. विद्यमान परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जय़शंकर त्यांना गुरू मानायचे. अलीकडे लिहिलेले द इंडिया वे – स्ट्रॅटेजीज फॉर अनसर्टन वर्लड्, हे पुस्तक डॉ जयशंकर यांनी देव यांना अर्पण केलंय. गेल्या वर्षी त्या पुस्तकाची पहिली प्रत त्यांनी देव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेट दिली होती. कोरोना झाल्यावर अपोलो रुग्णालायात त्यांना दाखल करण्यापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सारी जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाने घेतली. हा सन्मान क्वचितच परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्याला मिळतो. मंत्रालयात त्यांना अतिशय आदरातिथ्याने वागविले जात असे.

निवृत्त झाल्यापासून देव येथील पूर्व दिल्लीतील इंडियन फॉरेन सर्व्हिसेस अपार्टमेन्टमध्ये राहात होते. 1979 मध्ये पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत युनियनतर्फे मला सांस्कृतिक विनिमय कार्यक्रमाच्या अंतर्गत भेटीचे आमंत्रण आले होते. तेव्हा माझ्या पत्नीचा (डॉ. दीपा) व्हिसा करून देण्याची विनंती देव यांनी त्यावेळच्या दिल्लीतील रशियन राजदूतास केली होती. हा पहिला परिचय. अर्थात त्यावेळी उत्तर पूर्वेच्या दौऱ्यावर असल्याने माझे स्नेही व द टाईम्स ऑफ इंडियाचे प्रतिनिधी कै. सुभाष किरपेकर यांनी देव यांना भेटून विनंती केली होती. त्यावेळी देव हे परराष्ट्र मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर होते. त्यानंतर, राजदूत म्हणून रूमानिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, श्रीलंका, नेपाळ येथे ते गेले. तत्पूर्वी, महत्वाच्या पदावर स्वित्झरलँड, इंग्लंड आदी देशात त्यांनी काम केले. गेल्या काही वर्षात संबंध अधिक घनिष्ट झाले, तेव्हा मी त्यांना दैनिक सकाळसाठी परराष्ट्र धोरण व घडामोडी यावर लिखाण करण्याची विनंती केली. त्यानंतर सुमारे दोन वर्षे त्यांनी मराठीतून सकाळमध्ये सातत्याने लेखन केले. चीनने तिबेटवर आक्रमण करण्यापूर्वी भारतातर्फे तिबेटच्या दूतावासात नेमण्यात आलेले शेवटचे अधिकारी देव होत. तेथील दूतावास बंद करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. माजी परराष्ट्र सचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्यामते, देव यांनी ती जबाबदारी मोठ्या शिताफीने पार पाडली. परंतु, त्याविषयी मी देव यांना विचारता, तपशील सांगण्यास त्यांची तयारी नव्हती. तो इतिहास आहे, आता उगळ्यात अर्थ नाही, असे ते सांगत.

स्वभावाने मनमोकळे, हास्यविनोद करीत एकाएकी गहन विषयात शिरणारे, अगत्याने घरच्यांची विचारपूस करणारे, राजकीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करण्यासाठी वारंवार बोलविणारे देवसाहेब होते. त्यांच्या घरी माझ्या व राजदूत सुधीर देवरे यांच्या अधुनमधून बैठका-चर्चा होत. त्यातून अऩेक गोष्टीवर प्रकाश पडे. निवृत्ती नंतर ते पाकिस्तानविषयक वृत्तसंस्था पॉटमध्ये अनेक वर्ष तज्ञ म्हणून घडामोडींवर भाष्य करीत होते, लिहित होते. तसेच, दृकश्र्याव्य माध्यमेही त्यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, तिबेट यातील घडामोडींविषयी मुलाखतीसाठी आमंत्रण देत.

सस्थेचे संचालक व ऑब्झर्व्हर रिसर्च फौंडेशनचे ज्येष्ठ तज्ञ सुशांत सरीन म्हणतात, माझ्या गुरुंना आज मी मुकलो आहे. ही वॉज वन ऑफ द वायजेस्ट मॅन हू टॉट मी द रियलिटीज ऑफ डिप्लोमसी अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. ए क्वाएट, अनअश्युमिंग मॅन विथ ए ब्रिलियंट माइंड, ही वॉज कॉल्ड पेशवा बाय हिज अडमायरर्स. ही वॉज इन्स्ट्रूमेन्टल इऩ नेपाल बिकमिंग ए डेमॉक्रसी.

साउथ ब्लॉक दिल्ली –शिष्टाईचे अंतरग हे पुस्तक मी लिहिण्यास घेतले, तेव्हा त्यांची मुलाखत घेण्यास 10 नोव्हेंबर 2010 रोजी मी त्यांची भेट घेतली होती. शिष्टाईचे विश्व व परदेश सेवेतील त्यांचा अनुभव अयकण्याची इच्छा होती. त्यांच्या अभ्यासिकेत भेट झाली. विदेशसेवेतील परिवर्तनं व शिष्टाईच्या प्रभावाबाबत विचारता, ते म्हणाले, आपली शिष्टाई प्रभावी होऊ पाहात आहे. तथापि, ती नेहमीच प्रभावी ठरेल, असे नाही. कारण, नवनवे घटक पुढे येत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विदेश मंत्रालयाची सूत्रे हाती घेतली. 1964 पर्यंत (17 वर्षे) ती त्यांच्या हाती होती. त्या काळात वैश्विकदृष्टी असलेलं त्यांच्याइतकं प्रगल्भ, उत्तुंग नेतृत्व भारतीय उपखंडात नव्हतं. नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्पसेस ऑफ हिस्टरी व आत्मचरित्र या तीन ग्रंथातून त्यांच्या ज्ञानाचा आवाका दिसून येतो. शेजारच्या राष्ट्रांना ते खटकत होतं. पाकिस्तानात महंमद अली जीना होते. परंतु, फाळणीनंतर वर्षभरात त्यांचा मृत्यू झाला. विदेशमंत्रीपद वेगळं झालं, ते त्यानंतर.

विदेशमंत्री या नात्यानं नेहरू सर्वाधिक प्रभावी ठरले, असं सांगून देव म्हणाले, आफ्रिकेतील वसाहतवादाविरूद्ध त्यांनी आवाज उठविला. त्यांच्या अलिप्त धोरणावर टीका होते. परंतु, अऩ्य कोणता पर्याय होता, हे कुणी सांगू शकेल काय. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व पूर्वाश्रमीचा सोव्हिएत युनियन यात शत्रुत्व होतं. अशा वेळी कुणाच्याही गोटात सामील होणं योग्य नव्हतं. अलिप्त राष्ट्र संघटनेच्या मध्यम मार्गाचा भारत व अऩ्य राष्ट्रांनी स्वीकार केला, तो यासाठीच.

प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले व विदेशमंत्री झालेल्या नेत्यांमध्ये यशवंतराव चव्हाण, सरदार स्वरणसिंग, पी.व्ही. नरसिंह राव व प्रणब मुकर्जी यांचा समावेश करावा लागेल, असे सांगून ते म्हणाले, की परराष्ट्र मंत्रालय व अन्य मंत्रालयात एक फरक असा, की अऩ्य मंत्रालयात नवीन मंत्री आला, की त्या खात्याचे सचीव बदलतात. विदेश मंत्रालयात तसे होत नाही. मंत्री बदलला तरी सर्व साधारणतः सचिवांचं सातत्य राहातं. अधिकारी वर्गाला सर्वसाधारणतः अभय असतं. त्याला माजी विदेश सचिव ए.पी.व्यंकटेश्वरन व एस.के.सिंग हे अपवाद आहेत.

चरणसिंग यांच्या कारकीर्दीत माजी विदेश सचीव जगन मेहता यांनाही तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलं होतं. विदेश मंत्रालयाच्या प्रारंभीच्या काळात सचिवांची कारकीर्दही किमान तीन ते चार वर्षांची असे. एम.जे. देसाई हे कॉमनवेल्थ सेक्रेटरी, नंतर परराष्ट्र सचिव व नंतर सेक्रेटरी जनरल झाले. त्यामुळं, अधिकारांचं सातत्य राहिलं. तसं आता राहिलेलं नाही. राजदूतांचा कार्यकाल कमी झालाय. त्यांच्या सारख्या बदल्या झाल्यास विशिष्ट देशसमुदायाचे ज्ञान ते समजून घेऊ शकत नाहीत. तथापि, इस्लामी व अरब देशात नियुक्त होणाऱ्या राजदूतांना अधिकाधिक कालावधि मिळत आहे, ही समाधानकारक बाब होय. मंत्रालयात त्यावेळी उच्चाधिकाऱ्यासह एकूण सत्तर ते अयंशी कर्मचारी असतं. त्याचा आता दसपट विस्तार झालाय.

1977 नंतर सेवेव्यतिरिक्त बाहेरून आलेल्या तज्ञांच्या नेमणुका होऊ लागल्या. अऩेक देशांनी संबंध प्रस्थापित केल्यानं मंत्रालयाचं रंगरूप बदलणं अत्यावश्यक व नैसर्गिक आहे. प्रारंभीच्या काळात या सेवेत कायदेतज्ञ, डॉक्टर्स, इंजिनियर्स यांना प्रवेश नसे. या सेवेसाठी महत्वाची गरज म्हणजे, राज्यशास्त्र, इतिहास व इंग्रजी भाषेचं ज्ञान असणे. गेल्या वर्षात आर्थिक संबंधांना महत्त्व आलंय. त्यामुळे अर्थकारणचं ज्ञान असणंही गरजेच आहे. तसंच, किमान एका विदेशी भाषेची निपुणताही.

या मुलाखतीतील त्यांचं भाष्य आजही महत्वाचं आहे. देव यांना भारतीय राजकारणातही स्वारस्य होतं. त्यावर आम्ही मोबाईलवर अर्धा पाऊण तास चर्चा करीत असू. त्यांच्या मागे जवाहर व रविंद्र हे दोन पुत्र व नातवंड आहेत. त्यांची स्नुषा सुपर्णा म्हणाल्या, ज्ञानार्जन हा सर्वात मोठा गुण आहे, असं पप्पा सांगत. पदाच्या गैरवापराला त्यांचा कट्टर विरोध होता. तसेच, सचोटीचा पैसाच माणसाला समाधान देतो, असं सांगत. त्यांच्या निधनाने परराष्ट्र सेवा एका नामवंत मुत्सद्याला मुकली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : गोल्डी ब्रार अन् लॉरेन्स बिस्नोई सिंडिकेटच्या गुन्हेगारी मॉड्यूलच्या विरोधात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT