Blog | ब्लॉग

ज्यांची स्वप्नं उघड्यावर असतात, त्यांना झोप कशी बरं येईल?

रजनी कांबळे, कोळिंद्रे (खालसा), चंदगड

सुगीचे दिवस सुरु झाले की, सगळी शिवारं मोकळी होतात आणि मग जागोजागी मेंढरांचे कळप दिसू लागतात. मेंढरांच्या कळपासोबत दोन मेंढपाळ, एक माग-एक पुढं आणि त्यांच्या पाठोपाठ मान खाली घालून जाणारी मेंढरं. किती प्रामाणिक असतात ही मेंढरं? मालक जिकडं जाईल तिकडं चालायला लागतात. अगदी विश्वासानं! तेही एकमेकाला सोबत घेऊन. बरंच काही शिकता येईल या मेंढरांकडून माणसांना..

या मेंढरांना बघितलं की, मला मराठी शाळेतले दिवस आठवतात. हो, म्हणजे जेव्हा मास्तर प्रभातफेरी काढायचे तेव्हा आम्हीही असेच एका रांगेत रस्त्याच्या एका बाजूनं त्या मेंढरांसारखंच मान खाली घालून चालायचो. पुढे दोन मास्तर, मागे दोन. सोबत बाई पण असायच्या. सगळा गाव फिरुन यायचो आम्ही न कळणाऱ्या घोषणा देत. पण, आमच्या प्रभातफेरीमुळे किती लोकं जागरुक झाली आणि किती लोकांचं भलं झालं काय माहित? पण, आमचे पाय मात्र कायम दुखायचे. मग, प्रश्न असा पडतो की दिवसभर फिरुन या मेंढपाळांचे पाय दुखत नसतील का? त्यांच्यासोबत त्यांचे खासगी सुरक्षा रक्षकही असतात. म्हणजेच, त्यांची शिकावू कुत्री. ती दिसायला खूपच भयानक असतात. म्हणजे, कळपाच्या आसपास जरी गेलात तरी लचका तोडतील की काय अशी भीती वाटल्याशिवाय राहत नाही. कधी-कधी त्यांच्यासोबत त्यांची मुलंही असतात. ती शाळेला जात नसली तरीही त्यांची शाळा मात्र भरलेली असते. कधी माळरानावर, कधी शिवारात, कधी धरणाच्या बाजूनं तर कधी डोंगर कपारीत. सभोवताली हिरवागार निसर्ग, पानं-फुलं, झाडं, डोंगर, नदी, खळाळून वाहणारे झरे आणि कुठलाच ठावठिकाणा नसलेल्या रानवाटा ज्या कधीच संपत नाहीत नुसतंच चालणं, तेही रात्र-दिन!

पण, सूर्य मावळतीला गेल्यानंतर तो उद्या पुन्हा येईपर्यंत आपणही थांबणं गरजेचं असतं. या नियमानुसार मग दिवसभर मेंढरांसोबत फिरुन झाल्यानंतर कुठेतरी पिकं कापून मोकळ्या झालेल्या शेतात एखादा छोटासा तंबू उभारला जातो किंवा काही वेळा शेताचे मालक मुद्दामहून मेंढरांचा कळप आपल्या शेतात बसवतात. त्याचं कारण असं की, त्यामुळे मेंढरांची विष्ठा शेतात आपसूकच पसरली जाते व त्यामुळे शेतीला खत मिळते. याबदल्यात शेताचा मालक मेंढपाळांची त्या रात्रीची जेवणाची सोय करतो किंवा त्यांना जीवनावश्यक वस्तू देतो. दिवसभर दमून भागून आलेली मेंढरं एका जागी शांत बसतात. जंगली जनावरं आणि भटक्या कुत्र्यांपासून मेंढरं सुरक्षित रहावी म्हणून सगळ्या मेंढरांच्या भोबती मेंढपाळ जाळी बांधतात. राखणीसाठी त्यांचे सुरक्षारक्षक तैनात असतातच. खरं तर कुत्रा हा प्राणी खूपच भारी वाटतो. त्याला भाकरीचा एक तुकडा दिला, तर रात्रभर तो घराची राखण करतो. खरंच, राजकारण्यांपेक्षा कुत्रा खूपच इमानदार वाटतो. असो, मेंढपाळ मेंढरांची अगदी पोटच्या पोरांसारखी काळजी घेतात. कधी-कधी नवीन पिले जन्मास येतात. मग ती चालायला लागेपर्यंत त्यांना कडेवर घेऊन प्रवास सुरुच राहतो. त्यांना झोप तर लागतच नसावी. कारण, ज्यांची स्वप्नं उघड्यावर असतात त्यांना झोप कशी बरं येईल? आज इथं, उद्या तिथं तर परवा आणि कुठेतरी. जिथं वस्ती पडेल तिथं यांचं जगणं चालू असतं, तेही अविरतपणे!

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT