श्री रामांनी खर-दूषणांचा चौदा सहस्र राक्षसांसह केलेला संहार म्हणजे रामायणातील शौर्य, पराक्रमाचे एक महान पर्व आहे.
- डॉ. शंकर अभ्यंकर
प्रभू श्रीरामांचे खर-दूषणांशी केलेले युद्ध म्हणजे रामायणातील शौर्य, पराक्रमाचे एक महान पर्व आहे. श्रीरामांनी खर-दूषणांचा चौदा सहस्र राक्षसांसह संहार केला. हे युद्ध विषम होते. चौदा सहस्र राक्षसांविरुद्ध एकटे श्रीराम लढले. श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धनुर्वेदच! म्हणूनच गीतेच्या विभूतियोगात ‘राम: शस्त्रभृतामहम्’ अशी आपली विभूती भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहे.
श्री रामांनी खर-दूषणांचा चौदा सहस्र राक्षसांसह केलेला संहार म्हणजे रामायणातील शौर्य, पराक्रमाचे एक महान पर्व आहे. एकट्या श्रीरामांनी केवळ दीड मुहूर्तात (म्हणजे केवळ ७२ मिनिटांत) खर-दूषणासहित चौदा सहस्र राक्षसांचा विनाश केला. हे शौर्य केवळ अत्यद््भुत आहे!! महर्षी वाल्मीकींनी श्रीरामविक्रमाचा कालावधी ‘अर्धाधिकमुहूर्तेन रामेण...’ असा सुस्पष्टपणे केला आहे.
हे युद्ध विषम होते. चौदा सहस्र राक्षसांविरुद्ध एकटे श्रीराम लढणार होते. युद्धात जे श्रेष्ठ वीर असतात, त्यांना महारथी या नावांनी संबोधिले जाते. ‘जो आपला सारथी व अश्व यांना आपल्या आयुधांद्वारे अक्षत ठेवतो (म्हणजे जखमी होऊ देत नाही), आणि दहा सहस्र वीरांशी एकाकी सामना देऊ शकतो, त्याला महारथी म्हणतात.’ परंतु श्रीरामांनी जमिनीवर उभे राहून हे युद्ध केले आहे. कल्पना करा- महाक्रूर, नरमांसभक्षक चौदा सहस्र राक्षस थयथयाट, आरडाओरडा करत एकट्या रामांवर शस्त्रांसह तुटून पडताहेत! ‘युद्धस्य कथा रम्या’ हे खरे असले, तरी हे चित्र जरी डोळ्यांपुढे आणले, तरी युद्धाची भीषणता वाचकांच्या ध्यानी येईल.
राक्षसांनी श्रीरामांना कसे घेरले, त्याचे वर्णन रामायणात कसे आहे पाहा... ‘विकृत मुखे पसरून। गर्जना अखण्ड करून। परस्परांसी प्रोत्साहन। देती उद्धत।। करिती धनुटणत्कार। टाकिती भयाण धुत्कार। बडविती वाद्ये ते घोर। छाताडांसह।।’
अवर्णनीय विक्रम
मग श्रीरामांनी जो विक्रम केला, तो अवर्णनीयच; पण कवीच्या प्रतिभेलाही आव्हान करणाराच आहे. असंख्य बाणांनी श्रीरामांनी जणू गगन झाकोळून टाकले. संतप्त झालेल्या दूषणाने श्रीरामांवर आक्रमण केले. श्रीरामांनी त्याचे धनुष्य प्रत्यंचेसह तोडले. रथाचे चारही घोडे मारून रथही मोडला. अर्धचन्द्राकार बाणाने सारथ्याचे मस्तक धडावेगळे केले. दूषणाच्या मर्मस्थानावर बाण मारून त्याला रक्तबंबाळ केले. संतापलेल्या दूषणाने आपल्या हातात लोखंडी धारदार खिळे लावलेला आणि मानव-पशूंच्या चरबीने भरलेला, शत्रुघातकी परीघ हातात घेतला. श्रीरामांनी दोन धारदार बाणांनी दूषणाचे दोन्ही हातच तोडले!
दूषण पडलेला पाहून प्रमाथी, महाकपाल आणि स्थूलाक्ष यांनी आक्रमण केले. श्रीरामांनी एका बाणाने महाकपालाचा कण्ठ छेदला. प्रमाथीचे सर्व अवयवच तोडून टाकले. स्थूलाक्षाच्या बटबटीत अशा दोन्ही डोळ्यांत खोलवर बाण मारून त्याला नरकाला पाठविले. तोपर्यंत प्रभू रामचंद्रांनी पाच सहस्र राक्षसांचा वध केला होता.
संतापलेल्या खराने प्रोत्साहित केलेले उर्वरित राक्षस श्रीरामांवर तुटून पडले. त्यांचे नेतृत्व करणारे बारा सेनापती होते– श्येनगामी, पृथुग्रीव, यज्ञशत्रु, विहङ्गम, दुर्जय, करवीराक्ष, पुरुष, कालकार्मुक, हेममाली, महामाली, सर्पास्य आणि रुधिराशन! लक्षणीय गोष्ट अशी, की या सर्वांना धनुर्विद्या अवगत होती. त्यांनी श्रीरामांवर बाणांचा पाऊस पाडला. (‘...विसृजन्त: शरोत्तमान।’). श्रीरामांनी हे सर्व बाण तर तोडून टाकलेच; पण कर्णि नामक अत्यंत धारदार बाणांनी बारा सेनापती आणि शंभर प्रमुख राक्षसांचा वध केला. सहस्रावधी बाण टाकून राक्षससेनेचा संपूर्ण संहार केला. त्या रणभूमीवर जणू मृत्यूचे ताण्डव चालले होते.
आता श्रीरामांसमोर त्रिशिरा आणि स्वत: खर हे दोनच योद्धे रणभूमीवर शिल्लक उरले. खराला विनंती करून त्रिशिरा श्रीरामांवर आक्रमण करता झाला. त्याने महान पराक्रम करत श्रीरामांच्या ललाटावर तीन बाण मारले. श्रीरामांनी चौदा बाणांनी त्रिशिराच्या छातीवर प्रहार करून त्याला रक्तबंबाळ केले. त्याच्या रथाचे चारही घोडे मारले. आठ बाणांनी सारथ्याच्या चिंधड्या केल्या. रथावरचा ध्वज तोडला. अत्यंत वेगवान अशा तीन बाणांनी त्रिशिराची तिन्ही मस्तके तोडून टाकली!
दण्डकारण्यात येण्यास मानव घाबरत असत. दण्डकारण्यात राक्षसांची दहशत व भीती होती. आता मात्र श्रीरामांच्या शौर्याने, पराक्रमाने राक्षसच भ्यायले.
श्रीरामांच्या अलौकिक विक्रमाने खरासारखा महाबलाढ्य योद्धाही काही काळ थिजला, घाबरला, स्तब्ध झाला. खराच्या ठायी असीम क्रौर्य होते. स्वत:ला सावरून त्याने प्रतिशोधासाठी रणगर्जना केली; पण खराची शक्ती सज्जनांना छळण्यासाठीच होती.
श्रीरामांशी झुंजताना खराने त्याचा पराक्रम पणाला लावला. त्याने श्रीरामांच्या धनुष्याची प्रत्यंचा तोडून धनुष्याचेही दोन तुकडे केले. इतकेच काय, पण बाणांचा मारा करून श्रीरामांचे कवचही (चिलखत) भूमीवर पाडले. धनुर्विद्येचे उत्तम ज्ञान खराला होते. नालीक, नाराच, विकर्णि- अशा विविध बाणांचा मारा त्याने श्रीरामांवर केला. बाण कोठे लागल्यावर अतीव वेदना होतात, ती शत्रूची मर्मस्थानेही त्याला ज्ञात होती. महर्षी अगस्तींनी दिलेले महावैष्णव धनुष्य श्रीरामांनी सिद्ध करून त्याचा टणत्कार केला. देहावर दुसरे कवच चढविले.
मग मात्र श्रीरामांनी खराला पूर्णपणे घायाळ केले. त्याच्या मस्तकात एक बाण मारला. दोन बाण बाहूत मारले. तीन अर्धचन्द्राकार बाणांनी त्याची छाती फोडली. नंतर तेरा बाणांनी खराची मर्मस्थाने घायाळ केली. खराच्या रथाचा दांडा तोडला. रथाचे चारही घोडे मारले. सहा बाणांनी सारथ्याला घायाळ करून त्याचे मस्तक तोडले. रथाचे अरे तोडले. खराच्या धनुष्याचे तुकडे केले. हातात गदा घेऊन रक्तबंबाळ आणि विरथ झालेला खर जमिनीवर उभा राहिला. त्याचे सैन्य मेले, सेनापती नरकाला गेले.
शत्रूकडे दुष्कृत्यांची आठवण
आता खराचा वध अटळ होता; पण त्याला मारण्यापूर्वी श्रीरामांनी त्याच्या पापाचा पाढाच वाचला. शत्रूच्या दुष्कृत्यांची आठवण त्याला युद्धाच्या निर्णायक क्षणी देणे याला मंत्रयुद्ध म्हणतात. त्यामुळे प्रबळ शत्रूही अंतरंगातून नामोहरम होतो. खचतो.
श्रीराम म्हणतात, ‘राक्षसाधमा! तुला मारल्यावर हे जनस्थान निर्भय होईल. ऋषि-मुनी, आचार्य, तापस, विद्यार्थी निर्भयपणे वावरतील. अध्ययन-अध्यापनाचे कार्य सुरळीत होईल. यज्ञयाग सुखरूप होतील. जनस्थानातील राक्षस संस्कृतीचा विनाश झाल्यावर मानवांचे येथे येणे स्वाभाविक होईल. राक्षसांचा विनाश झालेला पाहून आजपर्यंत इतरांना त्रास देणाऱ्या व भय दाखविणाऱ्या राक्षसी स्वत:च घाबरून जनस्थान सोडून पळून जातील. मारल्या गेलेल्या ऋषींच्या विधवा पत्नींचे दु:ख त्यांना आज कळेल!’
पिसाटलेला, रक्ताळलेला, अवाढव्य खर श्रीरामांवर धावून गेला. त्या वेळी बाणाचा आघात त्याच्यावर करण्यासाठी श्रीरामांनी ब्रह्मदण्डासारखा एक अत्यंत तेजस्वी बाण धनुष्याला जोडला. प्रत्यक्ष इंद्राकडून प्राप्त झालेल्या त्या बाणाने त्यांनी धनुष्याची प्रत्यंचा ताणून खराची छाती विदीर्ण केली. त्या बाणाने खर भस्मसात होऊन भूमीवर कोसळला. इंद्राने आपल्या वज्राने वृत्रासुराला मारावे किंवा प्रत्यक्ष भगवान शंकरांनी श्वेतवनात अन्धकासुराला भस्मसात करावे, त्याप्रमाणे श्रीरामांनी जनस्थानात खराचा वध केला. आपल्या बारा सेनापतींसह खर आणि दूषण श्रेष्ठ धनुर्धारी होते. तरीही त्या चौदा महारथी, अतिरथींसह श्रीरामांनी चौदा सहस्र राक्षसांना कंठस्नान घातले. श्रीराम म्हणजे मूर्तिमंत प्रकट अजिंक्य धनुर्वेद होता.
देव-देवता हर्षभरित
खर मारला गेल्यावर देव-देवता, चारण, गन्धर्व, हर्षभरित, रोमांचित झाले. अप्सरा, विद्याधर नाचू लागले. नगारे, भेरी वाजू लागल्या. पुष्पवृष्टी होऊ लागली. खराला मारणे ज्यांना अशक्य होते, ते अनेक क्षत्रिय राजे (राजर्षी) श्रीरामांचे अभिनंदन करण्यासाठी महर्षी अगस्त्यांसमवेत आले.
भावार्थ असा की, अत्यंत प्रज्ञावंत ऋषिसंघाने श्रीरामांची प्रार्थना करून, त्यांना मार्गदर्शन करून चित्रकूटापासून जनस्थानापर्यंत आणले. त्यामुळे दण्डकातील सर्व राक्षस खर-दूषणासहित मारले गेले. दण्डकारण्य तर निर्भय झालेच; पण श्रीरामांनी अत्यंत दूरदृष्टीने फार मोठे राजकारणही साधले! मानवी संस्कृती दण्डकारण्यात येऊ नये आणि पुढे वानर संस्कृतीपर्यंत जाऊ नये म्हणून रावणाने राक्षसांची मोठी प्रबळ सेना जनस्थानात ठेवून मध्ये जणू पाचर मारली होती. खर-दूषणादींचा वध करून ती पाचर तर श्रीरामांनी काढलीच; पण उत्तरेकडील देव, ऋषी व मानवी संस्कृतीचा प्रवाह थेट लंकेपर्यंत जाण्याचा मार्गच मोकळा केला. हे कार्य केवळ अलौकिक होते.
श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धनुर्वेदच! म्हणूनच गीतेच्या विभूतियोगात ‘राम: शस्त्रभृतामहम्’ (१०.३१) अशी आपली विभूती भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहे. श्रीराम धनुर्विद्या पारंगत असल्याने एवढा पराक्रम करू शकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.