Manohar Parrikar
Manohar Parrikar 
देश

जीवलग मित्र गेला ...

सकाळवृत्तसेवा

मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे कठीण, पचनी पडणे कठीण, स्वीकारणेही कठीण. माझ्यापेक्षा तो लहान होता. पण मी त्याला कायम मोठ्या भावाचा दर्जा दिला. कारण मनोहर माझ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत म्हणजे कर्तृत्व, दातृत्व, हुशार, कार्यक्षमता वगैरे वगैरेच्या बाबतीत कितीतरी पटीने पुढे होता. अशा व्यक्तीच्या आठवणी विसरणे अशक्‍यच. कोणताही निर्णय घेताना मनोहरचा होकार ऐकण्याची माझी सवय होती. मनोहरमध्ये लहानपणापासून नेतृत्व गुण होते. पुढून नेतृत्व करणे हा त्याचा स्वभावधर्म, परिस्थितीवर लगेच ताबा मिळविणे हे त्याला सहज शक्‍य होते. संघाची शाखा असो, खेळ असो, शाळा, कॉलेज, कुठेही असो सर्वांत पुढे मनोहर!
- संजय पुरुषोत्तम वालावलकर
 

देवाने मनोहरला अतिशय देखणे रूप, व्यक्तिमत्व व तेवढेच लोभस हास्य दिले होते. अभ्यासात तर विचारायलाच नको. एवढी नैसर्गिक गुणवत्ता असलेला विद्यार्थी मी अजूनतरी बघितलेला नाही. जस जसा वयाने मोठा होत गेला तस तशी त्याची उंची वाढली, हिरो दिसायला लागला. पण कुठेतरी त्याला वाटलं असणार की, आपण गरजेपेक्षा जास्त हिरो दिसतो की काय? आपण आकर्षणाचा विषय होतो की काय? मग त्याने गबाळा राहायला सुरू केले. वाटेल ती पॅंट, शर्ट घालायचे. मॅचिंगचे तर अक्षरशः तीनतेरा. त्या काळापासून आजपर्यंत चप्पल किंवा सॅंडल, बूट नाही म्हणजे नाही. अपवाद फक्त संघाचा. गणवेष घालून केलेले संचलन. अत्यंत छायाचित्रणास अनुरूप चेहरा. या संदर्भात आमचे भरपूर वाद होत असत. अशावेळी तो थेट स्वामी विवेकानंदांचे उदाहरण देई. चारित्र्य माणूस बनविते, शिंपी नव्हे.

संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे म्हणत असत, चांगले असले पाहिजे व चांगलेही दिसले पाहिजे. असे माझे त्यावर उत्तर असायचे. संघ शाखा व क्रिकेट हे आमचे लहानपणीचे छंद. पण जसजसे वय वाढत गेले तसतसे क्रिकेट बंद होऊन दुर्गानंद नाडकर्णींच्या मार्गदर्शनाखाली संघकार्याची दिशा स्पष्ट होत गेली. संघाकडून कुठलीही अपेक्षा किंवा स्वार्थ न ठेवता सतत काम करीत राहायचे. हे राष्ट्र आपोआप परम वैभवाला पोहोचेल. हीच ती दिशा होय!

मनोहरचे आवडते खेळाडू म्हणजे फलंदाजीत गुंडाप्पा विश्‍वनाथ, गोलंदाजीत इरापल्ली प्रसन्ना व क्षेत्ररक्षणात एकनाथ सोलकर. हे उदाहरण अशासाठी दिले की, प्रत्येक बाबतीत सर्वोत्कृष्ट शोधण्याची त्याची सवय खेळातही दिसायची.

जोपर्यंत संघ जिंकत नाही, तोपर्यंत फलंदाज मध्येच निवृत्त होत नाही. फलंदाज असे म्हणू शकत नाही की, आता संघाची इनिंग स्थिर झाली. मी चाललो परत तंबूत.
कामुर्लीची एक म्हातारी. जिला स्वत:च्या दोन मुलांनी एकटी टाकून दुसरीकडे स्वतंत्र संसार थाटले. ती म्हणायची, तिसरा मुलगा पणजीत राहतो. तो मला दर महिन्या ला पैसे पाठवितो. ती बॅंकेत जाऊन चौकशी करायची, पैसे आले का? पैसे आले का? कारण ते पैसे म्हणजेच तिचा प्राणवायू. हा प्राणवायू म्हणजे दयानंद सामाजिक सुरक्षा योजना. अशा हजारो, लाखो ज्येष्ठ नागरिक गोव्यात आहेत, त्या कामुर्लीच्या अशिक्षित म्हातारीला माहीतसुद्धा नाही की तिचा हा तिसरा मुलगा म्हणजे मनोहर पर्रीकर होते. 

नरेंद्र मोदींची पणजीत झालेली ऐतिहासिक सभा संपल्यानंतर ग्रामीण भागातल्या दोन महिलांमधील संवाद माझ्या कानावर पडला. सभा संपल्यानंतर लाखो लोक परतायला
लागले. स्वाभाविकपणे व्यवस्थेवर प्रचंड ताबा होता. एवढ्यात व्यासपीठावरून एक भावनिक सूचना आली. जोपर्यंत शेवटची व्यक्ती येथून परतत नाही तोपर्यंत मी येथून
हलणार नाही. त्या महिला आपापसांत बोलत होत्या. आम्ही येथेच बसून राहूया, म्हणजे सूचना देणारी व्यक्ती आमची चौकशी करेल व आम्हाला आमच्या घरी सोडायला येईल व त्या व्यक्तीचे पाय आमच्या घराला लागतील. ती व्यक्ती म्हणजे लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळविलेले मनोहर भाई! 

आपले मार्ग वेगळे असतील, पण ध्येय एकच आहे. हे राष्ट्रपरम वैभवाला न्यायचे आहे, हे आपले व्रत आहे. संघाची प्रतिज्ञा मनोहरच्या प्रत्येकवेळी लक्षात असायची. तिचा
शेवट आहे, ‘...आणि हे व्रत मी आजन्म पाळीन.’ आजन्म याचा अर्थ मनोहरला नक्कीच माहीत होता. अधूनमधून लोकांच्या भावनेशी खेळायची त्याची जुनी सवय होती. तीव्र प्रतिक्रिया दिली की, योग्य पद्धतीने माघार घेण्याचा मनाचा मोठेपणाही तो दाखवायचा. तो आज हे जग जरी सोडून गेला असला तरी तो कोट्यवधी लोकांच्या हृदयात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

SCROLL FOR NEXT