Modi government bjp game plan for 2022 presidential elections  sakal
देश

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपद निवडणूक : भाजपाचा मास्टरप्लान, सुमित्रा महाजनांचं नावही चर्चेत

नरेंद्र मोदी सरकारला या निवडणुकीत आपल्या मनातील उमेदवार लादता येणार नाही

मंगेश वैशंपायन -सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सह चार राज्यातील सत्ता राखलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वोसर्वा नेतृत्वाने आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाारंची चाचपणी सुरू केली असून एका ढोबळ मास्टर प्लॅनवर पक्षनेतृत्वाचे काम सुरूही झाले आहे. मात्र 5 पैकी 4 राज्ये पुन्हा राखून व केंद्रासह 17 राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात स्वतबळावर किंवा मित्रपक्षांच्या साथीने सत्तेवर असलेल्या भाजपला या निवडणुकीत आपल्या बळावर आपला उमेदवार निवडून आणणे अवघड असल्याचे मतांचे गणितच बोलत आहे.

परिणामी नरेंद्र मोदी सरकारला या निवडणुकीत आपल्या मनातील उमेदवार लादता येणार नाही तर अण्णाद्रमुक, वायएसआर काॅंग्रेस, बीजू जनता दल, बसपा व अन्य मित्रपक्षांचे मत विचारात घेऊनच उमेदवारांची निवड अंतिम करावी लागणार हे स्पष्ट आहे. भाजपची मतांंची झोळी कमी पडत असल्यानेच राष्ट्रपती- उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडताना करणे मोदी यांना संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानताम् हे संसदेच्या भिंतींवर लिहीलेल्या श्लोकातील भाव प्रत्यक्षात उतरविणे भाग पडणार आहे. यानिमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांच्या संघटन कौशल्याचा, योगी आदित्यनाथ यांच्या वाढलेल्या प्रभावक्षेत्रात व भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सौम्य स्वभावाचा पुन्हा कस लागणार हेही उघड आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद व उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांना भाजप नेतृत्व व संघ पुन्हा संधी देण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.

विरोधकांची मोर्चेबांधणी

भाजपला बहुमतासाठी अजूनही एनडीएबाहेरील 9194 मतांची गरज पडणार आहेत. भाजपकडील मतांचे बळ कमी पडत असल्याचे हेरून विरोधी पक्षांतर्फे एकच उमेदवार देण्याबाबत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधी पक्षांंचा एक गट यासाठी विलक्षण सक्रिय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओरिसाचे नवीन पटनाईक, तमिळनाडूचे एम के स्टॅलीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, केरळचे पिनराई विजयन आदींशी संपर्क साधण्यासाठी या गटाने पुढाकार घेतला आहे. काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही संपर्क करण्याचे प्रयत्न डाव्या पक्षांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून सुरू आहेत. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांना विरोधकांतर्फे उमेदवारी जाहीर केल्यास सध्या भाजपच्या बाजूने असलेल्या व धर्मनिरपेक्षता, राज्यघटना यावर विश्वास असलेल्या पक्षांच्या नेतत्वाचे मन वळविण्यात यश येईल अशी आशा विरोधी पक्षांच्या एका गटाला वाटते. मात्र काॅंग्रेसच्या नवनेतृत्वाच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा यातील लाखमोलाचा सवाल अद्याप अनुत्तरित आहे.

उमेदवार कोण राहणार.....

या प्रश्नाचे खरे उत्तर आजच्याघडीला फक्त एका किंवा जास्तीत जास्त दोन नेत्यांनाच माहिती आहे हेही सत्य आहे. या पातळीवर दिल्लीतील स्वघोषित राजकीय पंडितांनी प्रस्तावित नावांची चर्चा ण्यास सुरवात केली आहे. यात काही नावांची चर्चा दिल्ली दरबारी जोरातच सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष भाजप उमेदवारांचे नाव जाहीर होईल तेव्हाच मोदींच्या धक्कातंत्राचा अविष्कार समजेल हे स्पष्ट आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवार निवडताना मोदी-शहा यांना 2024 ची लोकसभाही ध्यानात घेणे भाग आहे. 2017 मध्ये मोदींनी या पदासाठी दलित समाजातील कोविंद यांचे नाव पुढे केले होते. के आर नारायणन यांच्यानंतरचे ते दुसरेच दलित राष्ट्रपती ठरले. या धर्तीवर पाहिले तर मोदी यंदा एखाद्या महिलेच्या नावाची निवड सर्वोच्च पदासाठी करू शकतात. त्यासाठी छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुइया उईके, झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन आदींच्या नावांची चर्चा आहे. महाजन यांची निवड मोदींनी केली तर लोकसभा अध्यक्षपदी राहिलेल्या महिलेला सर्वोच्च पद मिळण्याची देशाच्या इतिहासातील ती पहिलीच घटना ठरेल.

उईके व महाजन यांना संघवर्तुळातूनही विरोध होण्याची शक्यता नाही. मुर्मू या आदिवासी व महिला या दोन्ही गटांत बसणाऱया आहेत. यांच्याशिवाय आणखी दोन नावे भाजप वर्तुळात चर्चेत आहेत ती म्हणजे वरिष्ठ भाजप नेते थावरचंद गेहलोत व केरळचे राज्यपाल आरीफ महंमद खान. गेहलोत यांची प्रकृती यात अडथळा ठरण्याची शक्यता आहे. शिवाय दलित समाजाला मोदी सलग पुन्हा संधी देतील काय अशी शंका व्यक्त होते. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी डाॅ. ए के अब्दुल कलाम यांची निवड करून 2002 मध्ये हुकमाचा एक्का टाकला होता. मूळचे कट्टर काॅंग्रेसी असलेले आरीफ महंमद खान यांची डाॅ. कलाम यांच्याशी स्पर्धा अशक्य असली तरी आरीफ महंमद खान यांचे नाव अल्पसंख्यांक म्हणून मोदी पुढे करणारच नाहीत व अटलजींशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणारच नाहीत असे कोणी सांगू शकत नाही.

उपराष्ट्रपती पदासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या नावांची चर्चा आहे. राजनाथसिंह व सीतारामन ही भाजप वर्तुळातील वरिष्ठ नावे आहेत. समन्वयी स्वभावाचे राजनाथसिंह यांना वाजपेयी व मोदी या दोन्ही सरकारांचा अनुभव आहे. राज्यसभेचे कामकाज चालविण्यासाठी त्यांना तो कामी येऊ शकतो असा भाजपमध्ये मतप्रवाह आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकतात अशा खासदार-आमदारांच्या- प्रेसिडेन्शियल काॅलेजची एकूण मते आहेत 10 लाख 98 हजार 903. यात 6264 मते असलेल्या जम्मू-काश्मीरचा समावेश केल्यास भाजपला बहुमतासाठी आणखी 5 लाख 46 हजार 320 मतांची गरज भासेल. यात एकट्या भाजपकडे सद्यस्थितीत 4 लाख 65 हजार 797 मते असून भाजपला सोडून गेलेले शिवसेना, अकाली दल आदी वगळता राहिलेले नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल व उरलेल्या अन्य मित्रपक्षांची 71,329 मते होतात. ही एकूण बेरीज होते 5 लाख 37 हजार 126. विजयाच्या जादुई आकड्यापासून ही संख्या 9194 मतांनी कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT