नवी दिल्ली : ‘भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानला (India-Pakistan Partition) समोरासमोरच्या युद्धात पराभूत केले, सध्याच्या पाकपुरस्कृत दहशतवाद्यांविरोधातील छुप्या युद्धातही भारताचाच विजय होईल,’ असा आत्मविश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh Minister of Defence of India) यांनी आज व्यक्त केला. स्वातंत्र्यावेळी धर्माच्या आधारावर देशाची झालेली फाळणी ही ‘ऐतिहासिक चूक’ होती हे १९७१ च्या युद्धाने सिद्ध केले, असा दावाही राजनाथसिंह यांनी आज केला.
भारताने १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाला ५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त ‘स्वर्णिम विजय पर्व’ (Swarnim Vijay Parv) साजरे केले जाणार असून त्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे आज राजनाथसिंह यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी राजनाथसिंह यांनी देशाच्या संरक्षण दलांवर संपूर्ण विश्वास व्यक्त करत पाकिस्तानला ठणकावले. ‘‘दहशतवाद आणि भारतविरोधी कारवायांना प्रोत्साहन देऊन पाकिस्तानला भारताचे तुकडे करण्याची इच्छा आहे. मात्र, भारतीय लष्कराने १९७१ मध्येही त्यांचा संपूर्ण पराभव केला होता आणि दहशतवाद्यांची नांगी मोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही प्रत्यक्ष लढले गेलेले युद्ध जिंकले, आता छुपे युद्धही नक्कीच जिंकू,’’ असे राजनाथसिंह म्हणाले. ‘धर्माच्या आधारावर भारताची झालेली फाळणी ही ऐतिहासिक चूक होती, हे १९७१ च्या युद्धाने सिद्ध केले. एका धर्माचे नाव घेत पाकिस्तानचा जन्म झाला, पण ते एकसंध राहू शकले नाहीत,’ असेही राजनाथसिंह म्हणाले..0.
स्वर्णिम विजय पर्व अधिक देदिप्यमान पद्धतीने साजरे करण्याची भारत सरकारची इच्छा होती. मात्र, सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर ११ सेनाधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने साधेपणाने कार्यक्रम साजरे करण्याचा निर्णय झाला, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले. या अपघातात हवाई दलातील ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वरुण सिंह यांच्या प्रकृतीवर लक्ष असून त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले.
‘वॉल ऑफ फेम’चे उद्घाटन
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील घटनांची माहिती देणाऱ्या आणि जवानांची गौरवगाथा सांगणाऱ्या ‘वॉल ऑफ फेम’चे उद्घाटन केले. त्यांनी लष्करी शस्त्रांच्या प्रदर्शनालाही भेट दिली. भारतीय जवानांनी १९७१ च्या युद्धात दाखविलेल्या शौर्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, असे राजनाथसिंह यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, १९७१ चे युद्ध केवळ पाकिस्तानी सैन्याविरुद्ध नव्हते, तर अन्याय आणि अत्याचारांविरोधात होते. त्यावेळी केवळ भारताला पाकिस्तानवर विजय मिळाला नाही, तर न्यायाचा अन्यायावरही विजय झाला. हे युद्ध म्हणजे लोकशाही परंपरा, न्याय्य वागणूक आणि मूल्ये यांचे आदर्श उदाहरण होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.