देश

#Specialtyofvillage हत्तरवाडला एक गाव - एक तुलसी विवाह

चेतन लक्‍केबैलकर

खेडेगावात सार्वजनिक सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावात एकी नांदावी, हा त्यामागील मूळ उद्देश; पण अलीकडे गावागावात त्यातून स्पर्धा वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्याचा विपरीत परिणाम गावातील ऐक्‍यावर होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘एक गाव - एक तुलसी विवाह’ ही संकल्पनाच सुखद धक्का देणारी आहे. खानापूर तालुक्‍यातील हत्तरवाड येथे संपूर्ण गावात एकच तुळस आहे. वर्षातून तुळशीचा विवाह मोठ्या उत्साहात आणि तितक्‍याच धामधुमीत होतो. अनेक वर्षे ही परंपरा अखंडित आहे.

तुलसी वृंदावन हे हिंदू धर्माचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक घरासमोर तुलसी वृंदावन असणे ही ओळख मानली जाते. कार्तिक द्वादशीपासून तुलसी विवाहांना प्रारंभ होतो. प्रत्येक घरासमोर तुळशीचा विवाह होतो. केवळ एका कुटुंबापुरता हा सोहळा असतो; पण हत्तरवाड येथील तुलसी  विवाहदेखील थाटामाटात, तोही अख्खा गाव एकत्र येत साजरा करते. 
विवाह म्हटलं, की पै-पाहुणे, लगीनघाई, विधिवत कार्य आणि उत्साह असतो. असा सगळा थाटमाट हत्तरवाडच्या तुलसी विवाहात पाहावयास मिळतो. गावात एकमेव तुलसी वृंदावन आहे. कार्तिक (नोव्हेंबर) मध्ये तुलसी विवाहांना सुरवात झाल्यानंतर गावकऱ्यांना घरातील उपवर मुलींच्या विवाहासारखी तुलसी विवाहाची उत्सुकता लागून राहते. पै-पाहुण्यांना निमंत्रण दिले जाते. 

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी रात्री मंगलाष्टके, ढोल-ताशांच्या गजरात तुलसी विवाह पार पडतो. गावजेवणही दिले जाते. विवाहाला सासुरवाशिणींसह पै-पाहुणे आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थिती लावतात. इतर कोणत्याही सण-उत्सवाला सासुवाशिणी, गावकुसाबाहेर कामानिमित्त गेलेली मंडळी चुकतील; पण तुलसी विवाहाला ही मंडळी आवर्जून हजेरी लावतात. विवाहादिवशी गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. 

काय आहे आख्यायिका?
नंदगडपासून अवघ्या पाचेक किलोमीटरवरील हत्तरवाड. एक गाव-एक तुलसी विवाह या परंपरेमुळे गावाचा महिमा सर्वदूर पोचला आहे. याबाबत जुन्या पिढीतील शिक्षक पांडुरंग गावडा सांगतात, की शिवकाळात पतीच्या निधनानंतर पत्नीने सती जायची प्रथा होती. त्या काळातील गावच्या पाटलाचे कोणत्या तरी लढाईत निधन झाले. त्यांची पत्नी सती गेली. तेथे तुळशीचे रोपटे लावले गेले. त्याचे झाडात रूपांतर झाले. सहसा असे होत नसल्याने या तुळशीचे महत्त्व वाढले. त्यातच सासुरवाशिणी माहेरी आल्यानंतर नवस बोलू लागल्या. त्यांच्या नवसाला तुळस पावू लागली आणि माहात्म्य वाढले. पुढे वृंदावन बांधले गेले. सुरुवातीच्या काळात कोंबड्याचा बळी दिला जायचा. अलीकडे कोंबड्यांबरोबरच बकऱ्याचा बळी दिला जातो. ही तुळस भाविकांना पावते, अशी पंचक्रोशीत श्रद्धा आहे. पूर्वीच्या काळी वीज नव्हती. तुलसी विवाहाप्रसंगी महिला आरती घेऊन यायच्या. संपूर्ण परिसर त्या लखलखाटात न्हाऊन निघायचा. गावात वीज पोचली, तरीही आरतीची परंपरा कायम आहे.

हत्तरवाडने आज तंत्रज्ञान युगातही संस्कृती जपण्याचा वसा कायम ठेवला आहे. तुलसी विवाह हा त्याचाच एक भाग आहे. यातून गावाचे ऐक्‍य अबाधित राखण्यात मदत होते. गावगाड्याचा मान पाटील घराण्याकडे वंशपरंपरागत आहे. तुलसीदेवीच्या भक्तीतून गावाच्या उन्नतीसाठीची शक्ती मिळते, ही भावना दृढ आहे. 
-पांडुरंग गावडा,
निवृत्त शिक्षक, हत्तरवाड

तुलसी विवाहाचे अनन्यसाधारण असे महत्त्व नव्या युगातही तसूभरही कमी झालेले नाही. काही शतकांची ही परंपरा आणि चालीरीती आजही कायम आहेत, हेच तुलसी विवाहाचा महिमा वृद्धिंगत होण्यामागचे प्रमुख कारण असावे.

- पांडुरंग पाटील, निवृत्त सैनिक

नवदाम्पत्यांना मान
येथे तुलसी विवाहात नवदाम्पत्यांना मान असतो. पंचक्रोशीतील नववधू-वरांनी तुलसी विवाहसमयी आरती धरायची असते. शेकडो नवदाम्पत्यं आरती घेऊन हजर राहतात. या दाम्पत्यांनी दिवसभर उपास करायचा असतो. या परंपरेला आजही तितकेच महत्त्व आहे.

स्वराज्याची साक्ष
हत्तरवाड येथील तुलसी विवाहाच्या आख्यायिकेत छत्रपती शिवरायांच्या काळाचा आणि त्यावेळच्या घटनांचा उल्लेख होतो. त्यामुळे हा भाग स्वराज्यात होता, याला पुष्टी मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT