- प्रा. विजय नवले
हाडे, स्नायू, लिगामेंट्स, जॉइंट्स या संदर्भात उद्भवणाऱ्या व्याधींवर फिजिओथेरपिस्ट काम करतात. दुखणे निर्माण झाले, अपघातामुळे दुखापत झाली, वयोमानामुळे त्रास होऊ लागला किंवा कार्यशैलीतील शारीरिक हालचालींमधील चुकांमुळे स्वास्थ्य बिघडले की, फिजिओथेरपिस्टकडे जावे लागते.
अशा पद्धतीचा आजार निर्माण होऊ नये, यासाठीसुद्धा प्रतिबंधात्मक उपचारपद्धती फिजिओथेरपीमध्ये आहेत. मान, पाठ, कंबर, गुडघे, हात, पाय आदी अवयवांसंदर्भात अशा समस्या येत असतात. त्याचबरोबर संधिवात, पार्किन्सन, पक्षाघात आदी आजारांमध्ये फिजिओथेरपिस्टची गरज पडते. हृदयरोग, अस्थमा, बाळंतिणीच्या शारीरिक व्याधी अशाही आजारांसंदर्भातील शुश्रूषेचे काम त्यांना करावे लागते.
ज्यांना खासकरून मानवी शरीर, शारीरिक वेदना यांबाबत काम करण्याची आवड आहे, ज्यांना डॉक्टर व्हायचे आहे, ज्यांना अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाला नाही, पण याच क्षेत्रात काम करायचे आहे, ज्यांना अन्य पॅरामेडिकल अभ्यासक्रम नको आहेत अशांनी फिजिओथेरपीचे शिक्षण घेण्यास हरकत नाही.
बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा बारावी सायन्सनंतर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. त्यानंतर सहा महिन्यांची इंटर्नशिप आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीसह हे शिक्षण पूर्ण झालेले असावे. मुख्यत्वेकरून नीट परीक्षेतील मेरिटप्रमाणे प्रवेश दिला जातो, तर काही स्वायत्त संस्था स्वतंत्र प्रवेशपरीक्षा घेतात. थेअरी विषयांच्या अभ्यासासोबतच प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. इंटर्नशिपमध्ये प्रत्यक्ष रुग्णांवर काम करण्याची संधी मिळते.
ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, इलेक्ट्रोथेरपी, मॅटर्नल फिजिओथेरपी, ऑर्थोपेडिक्स, फिजिकल मेडिसिन, रिहॅबिलिटेशन, पेडियाट्रिक्स, न्यूरो-मस्कुलो-स्केलेटल, सायकियाट्री, बायोमेकॅनिक्स, सायकॉलॉजी, पॅथॉलॉजी, मायक्रोबायॉलॉजी, प्रथमोपचार, बायो स्टॅटिक्स, ट्रोमॅटॉलॉजी, क्रीडा फिजिओथेरपी, न्यूरॉलॉजी, न्यूरोसर्जरी, जनरल सर्जरी आदी विषय शिकविले जातात.
फिजिओथेरपिस्ट रुग्ण शुश्रूषेसाठी अनेक पदांवरून काम करतात. फिजिओथेरपिस्ट, ट्रीटमेंट मॅनेजर, ऑस्टिओपॅथ, गेरियाट्रिक थेरपिस्ट, होम केअर फिजिओथेरपिस्ट, संशोधक, प्रशिक्षक, अध्यापक, रिहॅबिलिटेटर अशा पदांवर ते काम करतात.
फिजिओथेरपीचा सखोल अभ्यास असावा.
रुग्ण आणि दुखणे यांविषयी सतत शिकण्याची तयारी असावी.
निरीक्षणे नोंदविता आली पाहिजेत.
तांत्रिक उपकरणे लीलया वापरता आली पाहिजेत.
स्वभाव संयमी असणे आवश्यक. अत्यंत सकारात्मक असावे.
संवादकौशल्ये उत्तम असावीत. बोलणे आश्वासक असावे.
श्रवणकौशल्ये चांगली असावीत. रुग्णाचे म्हणणे नीट ऐकले पाहिजे.
सेवाभाव, वेदनेची जाणीव, कष्टाची तयारी, शुश्रूषा करण्याची आवड, शरीरशास्त्राविषयी सहज आकलन, वैद्यकीय तंत्रज्ञान शिकण्याची तयारी ही गुणवैशिष्ट्ये असतील, तर फिजिओथेरपीचा अभ्यासक्रम करण्यास हरकत नाही.
हल्ली कामाच्या पद्धती आणि आपले धावपळीचे जीवनमान पाहता अनेक जण फिजिओथेरपिस्टचे रुग्ण होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. एकाच जागेवर बसून केलेले काम काही व्याधींना निमंत्रण देत असते. पौष्टिक खाणे कमी झाल्यानेदेखील काही समस्या उद्भवतात. खाली वाकून काम करणे,
मोबाइल दीर्घ काळ पाहणे, बसण्याच्या चुकीच्या पद्धती, लुसलुशीत गादी - सोफा - खुर्ची यांचा चुकीचा वापर, व्यायामाचा अभाव आदी असंख्य कारणांमुळे मान, पाठ यांचे आजार उद्भवतात. वार्धक्यातील आजारांची श्रृंखलादेखील यामध्ये येते. खेळाडूदेखील अनेकदा दुखापतींनी त्रस्त होतात. आरोग्याच्या छोट्या समस्यांनादेखील अंगावर काढायचे नाही, या मानसिकतेतूनसुद्धा अनेक लोक उपचारांसाठी सतर्क असतात. त्यामुळे फिजिओथेरपिस्टच्या तज्ज्ञांचे काम वाढत आहे. आगामी काळातदेखील हा स्कोप असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.