article
article sakal
एज्युकेशन जॉब्स

शाळा पुन्हा हवीशी व्हावी...

गोविंद डेगवेकर

गेल्या आठवड्यातली सर्वांत धक्कादायक बातमी संसद वा टोकियोमधून नव्हे, तर नवी मुंबईतून धडकली. १५ वर्षांच्या शाळकरी मुलीने स्वतःच्या आईची गळा दाबून हत्या केली. कारण तितकंही गंभीर नाही. काय तर, आई रोज तिच्या मागे अभ्यासासाठी तगादा लावत होती; एवढ्याशा कारणावरून जन्मदात्या आईचा जीव घेण्याची बुद्धी कशी काय होईल? हा प्रश्न वरकरणी वाटतो तितका सोपा नाही....

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शाळकरी मुलीच्या हातून असे क्रूर कृत्य घडण्यामागे असे काय कारण असेल? उत्तर : शिक्षणाच्या बाबतीत पालकांच्या वाढलेल्या अतिअपेक्षा! जर कार्ल मार्क्स, धर्म ही अफूची गोळी आहे, असं म्हणून गेला असेल, तर मी असं नमूद करीन, की शिक्षण हा आजचा नवा धर्म बनला आहे. जिथे विद्यापीठे आणि शाळा, मंदिरे व मशिदी झाल्या आहेत; तर त्यातील शिक्षणतज्ज्ञ हे धर्मगुरू म्हणून बसले आहेत. आता या धर्मगुरूंकडून विद्या संपादन करून पोटची मुलं आपला उद्धार करतील, अशी भावना मनात घेऊन अनेक जण जिवाचं रान करीत आहेत. अर्थात हा पालकवर्ग समाजाच्या सर्वात खालच्या थरातील आहे. म्हणजे, माझ्या वाट्याला जे काही कष्टमय जीवन आलं ते मी माझ्या मुलाच्या नशिबी येऊ देणार नाही आणि यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही!

बरं हा सारा समज घेऊन जगणाऱ्या मध्यमवर्गाच्या या साऱ्या अपेक्षांचा गाडा दोन वर्षांमागे सुरळीत चालला होता. पण, मार्च २०२० मध्ये देशात कोरोनानं शिरकाव केला आणि सारं काही डळमळलं. रस्त्यामधोमध बिनदिक्कत धावणाऱ्या गाड्याची चाकेच निखळून पडावी तशी. अभ्यासक्रमाखाली भरडून निघालेल्या पालक-विद्यार्थ्यांच्या जगात उलथापालथ झाली. सगळ्यांना घरी बसावं लागलं. सुरक्षित अंतर पाळण्याची सक्ती आली. शाळा नाही, शिकवण्या नाहीत. फक्त नि फक्त ऑनलाईन क्लास. या स्थितीला १६ महिने उलटून गेले तरी आपण अजून अंधारात चाचपडत आहोत; मग, पालक आणि शिक्षकांनी एकच धोषा लावला आहे. तो म्हणजे, आजवर झालं ते झालं आता तातडीने शाळा सुरू करा!

या साऱ्या धुमश्चक्रीत मुलांच्या मानसिकतेचा विचार मात्र कुणीही केलेला नाही. म्हणजे रोज शाळेच्या वर्गात जाऊन बसणाऱ्या इवल्याशा जीवाला काय वाटेल? गेल्या काही वर्षांत बालमानसिकतेबाबत करण्यात आलेल्या अनेक सर्वेक्षणाचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. त्यात शालेय अभ्यासक्रम शिकताना आणि तो पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत मुलांना चिंता, नैराश्य, ताण आणि निद्रानाश अादी लक्षणांनी वेढल्याचे आढळून आले आहे. म्हणजे याआधी कधी पाहिली गेली नसेल, इतकी असंतुलित मानसिकता मुलांमध्ये निर्माण झाली आहे. यातील सर्वच अनुभवांतून नवी मुंबईतील ती १५ वर्षीय विद्यार्थिनी गेली नसेल, हे कशावरून?

मुले दीड वर्षांहून अधिक काळ घरात आहेत. आता त्यांना काही दिवसांत शाळेत पाठवायचा निर्णय घेताना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल आणि शाळेत जाणारं मूल हे केंद्रस्थानी राहील, यासाठी आखणी करणे गरजेचे असेल.

कारण इतक्या दीर्घ कालावधीनंतर मुले-मुली शाळेच्या वातावरणात स्वतःला नव्याने जुळवून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा एक प्रकारचा मानसिक संतुलनाचा सर्वांत अवघड, पण अत्यंत महत्त्वाचा प्रयोग असेल. ही कल्पना सत्यात उतरविण्यासाठी शाळेशी निगडित प्रत्येक घटकाला जबाबदारीने वागावे लागेल; पण मी पुन्हा एकदा इथे आवर्जून नमूद करीन की, पहिली चूक पुन्हा करून चालणार नाही. ती म्हणजे, अभ्यास एके अभ्यास! आपल्याला क्रमिक अभ्यासाच्या मागे धावून चालणार नाही.

जे विद्यार्थी सुखवस्तू घरातले नाहीत, म्हणजे ज्यांना शाळा शिकताना ज्या काही सुखसोयी मिळायला हव्यात, त्यापासून ते वंचित आहेत, (कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण घेणे ज्यांना परवडणारे नव्हते) अशा वर्गातील मुलामुलींमध्ये बालकामगार समस्या उद्‍भवली. काहींची बालवयातच लग्नेही लावून देण्यात आली.

आज मुलांची शाळेच्या दिशेने जाणारी वाट निसरडी आहे. कारण पुन्हा शाळा म्हणजे शिस्त आली. अभ्यास आला. मग त्यातील प्रगती आली. एकदा का यशाच्या मागे धावणे सुरू झाले, की त्यासोबत अनिश्चितता ही हजर असतेच. मी अभ्यास पूर्ण करू शकेन की नाही, हे एकदा का मुलांच्या मनात शिरले की मग पुन्हा आपण एकटे पडू, ही भीती त्या मुलांच्या मनाभोवती विळखा घालते.

आपल्याला शाळा या प्रयोगाच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताना ‘पाठ्यक्रम पूर्ण’ हे वाक्य काही काळासाठी तरी काढून टाकावं लागेल. मुलांना शाळेच्या अंगणात बागडू द्या, खेळू द्या. दीड वर्षे दुरावलेल्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा नव्याने भेटू द्यात. एकमेकांमध्ये गप्पागोष्टी होतील. हसणं-खिदळणं होईल. ते एकमेकांना शुभेच्छा देतील. त्यांचा एकमेकांवरचा विश्वास दृढ होऊ द्यात.

यासाठी पालकांना तसे वातावरण तयार करावे लागेल. कोरोना काळातील मरगळ दूर करून पालकांना त्यांच्या मुलांशी संवाद साधावा लागेल. आणि सर्वांत महत्त्वाचे मुलांना काय वाटते, हे प्रत्येक टप्प्यावर जाणून घ्यावे लागेल. शाळा सुरू झाल्यानंतर जशी काही मुले स्कूलबसमध्ये बसण्यास उत्सुक असतील, तशी त्यातील काही जण मनाने तयार असतीलच, असे नाही. काहींना शाळा नकोशी झालेली असेल. कारण मुलांना लॉकडाऊन ही देवाने दिलेली ‘देणगी’ वाटत आलेली आहे. मग पुन्हा नको असणाऱ्या जागी जाऊन का बसा, असा स्वाभाविक प्रश्न त्यांच्या मनात शिरला नसेल कशावरून?

शाळांच्या स्वच्छतागृहांमध्ये जाण्याचे भय वाटत होते. वर्गातील रटाळ वाचनाचा कंटाळा होता असेल, त्यांच्या समोर पुन्हा तोच पेच उभा राहिला तर मग काय? नक्कीच या साऱ्या स्थितीतून त्यांना वर काढण्यासाठी पुन्हा संवादाचा गरज आहे. शाळा सुटल्याची भावना मनातून काढून टाकता येणे आवश्यक आहे. शाळेत मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहेच, पण शाळेच्या चार भिंतीमध्ये येणारे दडपण हळूहळू बाजूला सारून अक्षरांशी नव्याने मैत्री करण्याचे कसब मुलांना शिकवावे लागेल. शिक्षक हा यातील प्रमुख योद्धा असेल.

कोरोनाने मनामनांत भयाचे विषाणू सोडले आहेत, हे खरे. पण, सारे काही कोरोनाशी जोडणे योग्य नाही. शिक्षकांना त्यांचे सहकारी, सोबती, पालनकर्ते आणि त्यांचे वडीलधारे म्हणून सिद्ध व्हावे लागेल. एकदा रोग कळला की मग तो बरा कसा करायचा, हे ठरवता येते. त्या पद्धतीने शाळा या एका शब्दाभोवती मुलांच्या अनेक शंका-कुशंकांचे निरसन शिक्षकांना ‘डॉक्टर’ म्हणून करावे लागेल. मुलांना शाळा पुन्हा व्हावीशी हवी, या प्रक्रियेतील हा परिहार्य टप्पा पार केलाच, तर मग नवी मुंबईत घडलेली घटना पुन्हा कधी कानावर पडणार नाही...

- डॉ. समीर दलवाई

samyrdalwai@gmail.com

(अनुवाद : गोविंद डेगवेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT