महावीर झेंडगें Canva
एज्युकेशन जॉब्स

आईच्या पाठिंब्यामुळे महावीर झेंडगेंची दरवर्षी नवीन पदाला गवसणी!

आईच्या पाठिंब्यामुळे महावीर झेंडगेंची दरवर्षी नवीन पदाला गवसणी! स्पर्धा परीक्षेतील यशस्वी प्रवास

अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

गेल्या सहा वर्षांत 'एमपीएससी'तून चार पदे संपादन केली. यंदा सहाय्यक राज्य कर आयुक्त पदाला गवसणी घातलेले मोहोळचे सुपुत्र महावीर बाळासाहेब झेंडगे यांची यशोगाथा.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : कॉलेजच्या शिक्षणापर्यंत आयुष्यात नेमके काय करायचं हेच माहीत नव्हतं. शिक्षण (Education) हा आयुष्यातील एक टप्पा असून, तो पूर्ण करायचा, एवढीच कल्पना. त्यामुळे कॉलेजमधील शिक्षण सुरू असताना, अपघाताने एक स्पर्धा परीक्षा दिली अन्‌ या क्षेत्राकडे आकर्षित झाले व यशाचा पाठलाग करत गेल्या सहा वर्षांत 'एमपीएससी'तून (MPSC) चार पदे संपादन केली. यंदा सहाय्यक राज्य कर आयुक्त (Assistant State Commissioner of Taxes) पदाला गवसणी घातलेले मोहोळचे सुपुत्र महावीर बाळासाहेब झेंडगे यांची यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.

आपल्या या यशाबद्दल महावीर झेंडगे म्हणाले, घरची परिस्थिती तशी मध्यम स्वरूपाची. शेती होती पण पावसावर अवलंबून असल्याने बेभरवशाचीच. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे घरात आर्थिक चणचण भासत असायची. त्यात वडिलांचा गावातील राजकारणात सक्रिय सहभाग असल्याने कुटुंबाचा सर्व भार आईवरच असायचा. कौटुंबिक गाडा हाकत शेतीकडे आईच लक्ष वेधून घेत असे. आई राजाबाईंचे जेमतेम पाचवीपर्यंत तर वडिलांचे सहीपुरते शिक्षण पूर्ण झालेले. त्यामुळे दहावीचे शिक्षण पूर्ण करणारा घरातील मी पहिलाच सदस्य.

लहानपणापासूनच शिक्षणात बऱ्यापैकी चांगला असल्याने, मला चांगले शिक्षण मिळावे यासाठी आईची सतत धडपड असायची. त्यामुळे हिंगणी (ता. मोहोळ) येथे प्राथमिक व बार्शीतील शिवाजी महाविद्यालयातून माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर गावातील शिक्षक व वडिलांचे काही सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आई- वडिलांनी ऍग्री करण्यासाठी पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. तोपर्यंत आयुष्यात नेमके काय करायचं हे पक्कं नव्हतं. ऍग्री शिक्षण घेऊन मुलगा नेमका काय होणार आहे, याची किंचितही कल्पना आई- वडिलांना नव्हती. परंतु शाळेत हुशार होता म्हणजे काही तर चांगले शिक्षण घेतोय एवढेच त्यांना माहीत. आई- वडिलांबरोबरच लहान भाऊ दीपक यानेही माझ्या यशासाठी अतिशय परिश्रम घेतले.

तिकडं ऍग्री करून मी "एमएस्सी'साठी परदेशात शिक्षणाला जावे अशी स्वप्ने रंगवत असताना, स्पर्धा परीक्षेची एक जाहिरात आली. त्यामुळे मित्रांबरोबर सहज द्यायची म्हणून ही परिक्षा दिली अन्‌ मुलाखतीपर्यंत मजल मारून गावाकडे आलो होतो. या काळात या परीक्षेचा निकाल लागला, सोबतचे मित्र उत्तीर्ण झाले, परंतु मला अपयशास सामोरे जावे लागले. त्यामुळे निराश झालो. विनाकारण या स्पर्धा परीक्षेच्या नादी लागलो अन्‌ शैक्षणिक एक वर्षदेखील वाया घालवले, असा पश्‍चात्ताप होऊ लागला. त्या वेळी आईने मला धीर दिला. पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.

त्यामुळे जोमाने पुन्हा प्रयत्न सुरू केले. 'एमएस्सी'साठी राहुरी येथे प्रवेश घेतला अन्‌ खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला. यामध्ये 2013 व 2014 च्या पूर्व परीक्षेतच अपयश आले. त्यानंतर जिद्द, चिकाटी बाळगून रात्रंदिवस अभ्यास केला अन्‌ 2015 साली वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाली. आता थांबायचे नाही, या इराद्याने पुन्हा प्रयत्न सुरू केले. 2015 ला कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली. 2016 ची राज्यसेवा उत्तीर्ण होऊन अंतिम यादीमध्ये स्थान प्राप्त केले. पुढे 2017 ला भूमी अभिलेख उपअधीक्षक म्हणून निवड झाली. कक्ष अधिकारी म्हणून नोकरीवर हजर झालो होतोच; परंतु अभ्यासात कसलाही खंड पडू दिला नाही. दरवर्षी दिलेल्या परीक्षांचा अनुभव, कृषिमित्र तसेच स्पेस अकॅडमीमधील सहकारी यांच्या मार्गदर्शनामुळे दरवर्षी नवनवीन एका पदापर्यंत पोचत होतो. त्यात आणखी एक भर पडली असून, नुकताच 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये सहाय्यक राज्य कर आयुक्त म्हणून निवड झालेली आहे. या यशाचे सर्व श्रेय आईला आहे. तिच्या पाठिंब्याशिवाय हे यश अशक्‍य होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : पुण्याला पावसाने झोडपलं

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT