फॅमिली डॉक्टर

गुलाबी थंडीचे काटे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

गुलाबी थंडी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. वर्षातील सर्वात सुखकर आणि आरोग्यदायी ऋतू म्हणजे हिवाळा. असे असले तरी बदलत्या हवामानाला साजेसे बदल आपल्या आहार-आचरणात होणे गरजेचे असते.


हेमंत व शिशिर ऋतू हे हिवाळ्याचे दोन ऋतू होत. हेमंतामध्ये थंडीची सुरवात होते तर शिशिरात थंडीची तीव्रता वाढते. शिशिर ऋतूचे वर्णन आयुर्वेदात या प्रमाणे केलेले आहे.
शिशिरः शीतलोऽतीव रुक्षः वाताग्निवर्धनः ।


शिशिर ऋतूत हवा फार थंड व कोरडी होते, त्यामुळे वातदोष वाढतो, अग्नीसुद्धा प्रदीप्त होतो.


अर्थात या बदलांना अनुकूल आहार, विहार, औषध, रसायनांची योजना केली तर हिवाळ्याचा आनंद घेता येईल आणि दुसऱ्या बाजूने हिवाळ्यातील बदलांचा आरोग्यवृद्धीसाठी फायदाही करून घेता येईल. हिवाळ्यामध्ये आहार यथोचित प्रमाणात आणि पौष्टिक गुणांनी युक्‍त घ्यावा असे आयुर्वेद सांगतो.


स यदा नेन्धनं युक्‍तं लभते देहजं तदा ।
हिनस्त्यतो वायुः शीतः शीते प्रकुप्यति ।।
तस्मात्‌ तुषारमसमये स्निग्धाम्ललवणात्‌ रसान्‌ ।।...चरक सूत्रस्थान
प्रदीप्त झालेल्या अग्नीला यथायोग्य इंधन म्हणजे अन्न मिळाले नाही तर तो अग्नी रसधातूला जाळून टाकतो व त्यातूनच वायूचा प्रकोप होतो. असे होऊ नये म्हणून या ऋतूत स्निग्ध आंबट, खारट पदार्थ खावेत.


बाहेरचे वातावरण थंड होत असल्याने आपल्या शरीरातील उष्मा संरुद्ध झाल्याने जाठराग्नी बलवान होतो. म्हणून हिवाळ्यात आपली शरीरशक्‍ती, शरीरातील धातू उत्तम व बलवान अवस्थेत असतात आणि आपण स्फूर्तीचा, चैतन्याचा अनुभव घेत असतो.
हिवाळ्यात चांगली भूक, उत्तम पचनशक्‍ती व बलवान धातू या त्रिवेणी संगमाचा योग्य फायदा प्रत्येकाने अवश्‍य घ्यायला हवा. शरीरशक्‍ती अजून वाढेल अशा पौष्टिक आहाराचे व औषधांचे आवर्जून सेवन करायला हवे.


अतो हिमेऽस्मिन्‌ सेवेत स्वाद्वम्ललवणान्‌ रसान्‌ ।...वाग्भट
म्हणजे या ऋतूत गोड, आंबट व खारट चवीच्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा. त्यातही मधुर रस (गोड चव) शरीराचे पोषण करण्यासाठी सर्वश्रेष्ठ असल्याने विशेषतः गोड गोष्टी या ऋतूत खाव्यात. योग्य अशा स्निग्ध पदार्थांचे सेवन करावे.

हिवाळ्यात योग्य आहार
दूध तसेच दुधाचे पदार्थ म्हणजे लोणी, तूप, ताक, अधूनमधून मलई, दही, खरवस, चीज वगैरे खाता येते. मुख्य जेवणात धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांपासून तयार केलेले विविध प्रकार, डाळी व कडधान्यांपैकी मूग, तूर तर उत्तमच पण हेमंत ऋतूत मसूर, मटकी व प्रकृतीला अनुकूल असल्यास हरबरा, उडीद, चवळी ही कडधान्येही खाता येतात. भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, दोडका, घोसाळी, पडवळ, बटाटा, टिंडा, भेंडी, पालक, मेथी या भाज्या नित्य वापरण्यास योग्य, तर वांगे, सिमला मिरची, घेवडा, वालाच्या शेंगा या भाज्या अधूनमधून खाता येतात. आमटी, भाजी वगैरे बनविताना जिरे, हिंग, धणे, मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, वेलची, हळद, कोकम, आले, लसूण अशा मसाल्यांचा योग्य प्रमाणात वापर करता येतो. काकडी, टोमॅटो, गाजर, बीट यांची दही घालून कोशिंबीर करता येते, चवीसाठी ताजी हिरवी चटणी, लोणचे, पापड खाता येतात. ऋतुनुसार बाजारात मिळणारी उत्तम फळे, ड्रायफ्रूट पैकी बदाम, खजूर, खारीक, काजू, अंजीर, मनुका, जरदाळू, अक्रोड उचित प्रमाणात खाता येतात. लाडू, बर्फी, खीर, खोबऱ्याची वडी, डिंकाचा लाडू, दुधी हलवा, साखर-केशरी भात असे गोड पदार्थ खाण्यात ठेवता येतात.


यालाच जोड म्हणून या दिवसांत आयुर्वेदिक रसायनांचे सेवन केले तर ते आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असते. तसे पाहता रसायन पूर्ण वर्षभर खाणे उत्तमच असते पण पचनशक्‍ती उत्तम असलेल्या कालावधीत रसायन सेवनाचा सर्वोत्कृष्ट उपयोग होत असल्याने हिवाळ्यात रसायन सेवन करणे श्रेयस्कर होय. च्यवनप्राश, धात्री रसायन, "सॅन रोझ', "मॅरोसॅन' "संतुलन चैतन्य कल्प', शतावरी कल्प यासारखी रसायने हिवाळ्यात अवश्‍य सेवन करावीत अशी होत.


हिवाळ्यात त्वचेची काळजीसुद्धा विशेषत्वाने घ्यावी लागते. कारण थंड व कोरड्या हवेमुळे त्वचासुद्धा कोरडी रखरखीत होत असते. मात्र सुरवातीपासून नीट काळजी घेतली तर त्वचा निरोगी ठेवता येऊ शकते. शरीरातील रसधातूचा त्वचेवर मोठा प्रभाव असतो, निरोगी त्वचेसाठी, नितळ तेजस्वी अंगकांतीसाठी रक्‍तधातू संपन्न असणे आवश्‍यक असते. तसेच त्वचा सुरकुतू नये, त्वचेचा घट्टपणा कायम राहावा यासाठी मांसधातूला उचित पोषण मिळणे आवश्‍यक असते. यावरून एक गोष्ट लक्षात येते की त्वचेची काळजी नीट घ्यायची असेल तर बाह्योपचारांबरोबरच आतील रसरक्‍तादी धातूंच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागते.

काय कराल?
थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे अभ्यंग. रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे वेळ काढून संपूर्ण अंगाला अभ्यंग तेलासारखे त्वचेला स्निग्धता देणारे, शिवाय त्वचेमार्फत आत जिरून रस, रक्‍त, मांस या धातूंपर्यंत काम करणारे तेल लावले तर त्वचेला आतून-बाहेरून आवश्‍यक ते सर्व पोषण मिळते, नियमित अभ्यंगाइतकाच दुसरा प्रभावी उपाय म्हणजे उटण्याचा वापर. उटण्यामध्ये अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा, हळद, दारुहळद अशा अनेक उत्तमोत्तम वनस्पतींचे मिश्रण असते, ज्या त्वचेला स्वच्छ तर करतातच, पण त्वचेवरील दोष दूर करण्यासही समर्थ असतात. उटण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे त्वचेला उचित स्निग्धता मिळते, वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो. सॅन मसाज पावडरसारखे उटणे या दृष्टीने उत्तम होय.


हिवाळ्यात उटणे लावताना किंवा मुखलेप लावताना त्यात पाण्याऐवजी दूध-दुधाची साय टाकण्याचा अधिक उपयोग होऊ शकतो. अभ्यंग, उटणे या प्रकारचे विशेष लेप यांची व्यवस्थित योजना केली तर हिवाळ्याचा दुष्परिणाम त्वचेला भोगावा लागणार नाही हे निश्‍चित.


हिवाळ्यामध्ये तळपाय विशेषतः टाचांना भेगा पडणे, शरीरात अतिरुक्षता वाढल्याने भेगांमधून रक्‍त येणे हीसुद्धा तक्रार आढळतात. यावर नियमित पादाभ्यंग उत्तम असतो. त्यातही पादाभ्यंगासाठी शतधौतघृत किंवा औषधांनी युक्‍त संतुलन पादाभ्यंग घृतासारखे शतधौत घृत वापरण्याचा अजून चांगला गुण येताना दिसतो. तळपायांना कोकमाचे तेल लावणे, फरशीच्या थंडपणापासून संरक्षण करण्याच्या हेतूने पायात मोजे घालणे किंवा घरातही पादत्राणे घालणे हेसुद्धा उपयोगी ठरते. तळपायाच्या तुलनेत तळहाताला भेगा पडण्याचे प्रमाण कमी असते. मात्र, हे सर्व उपाय तळहातालाही करता येतात.


हिवाळ्याचा परिणाम ओठांवरही होतो. ओठ फुटणे, दोन ओठ कडेला मिळतात त्या ठिकाणी बारीकशी चीर जाणे असे त्रास हिवाळ्यात होताना दिसतात. ओठ फुटू नये यासाठी ओठांवर दुधावरची साय लावणे उत्तम असते. ओठांच्या कडेला चीर पडणे हा प्रकार खूप वेदनामय असू शकतो. बोलताना, खाता-पिताना ओठाची हालचाल झाली की त्या ठिकाणी वेदना होतात. यावर घरचे ताजे लोणी किंवा घरचे साजूक तूप लावून ठेवण्याचा फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर दोन-तीन थेंब तूप लावण्यानेही ओठांना चीर जाण्याची प्रवृत्ती कमी होते असा अनुभव आहे.


एकंदर त्वचा कोरडी झाली तर त्याचा परिणाम गुदाच्या आसपासच्या त्वचेवरही होतो. विशेषतः फिशर म्हणजे गुदाला भेगा पडून शौचाच्या वेळेला आग होणे, वेदना होणे, या प्रकारचा त्रास होऊ शकतो. यावर गुदभागी व्रणरोपण तेल किंवा सॅन हील मलम सारखे औषधी तुपापासून बनविलेले मलम लावण्याचा उपयोग होतो. हिवाळ्याची सुरवात झाल्यावर लगेचच रोज रात्री झोपण्यापूर्वी गुदभागी दोन थेंब एरंडेल तेल लावण्यानेही या प्रकारचा त्रास होण्यास प्रतिबंध होतो.


आयुर्वेदाने हिवाळ्यात करायला सांगितलेला आहारसुद्धा त्वचेला पोषक असतो. आहाराच्या माध्यमातून आतून पुरेशी स्निग्धता मिळाली की त्यामुळे त्वचा फुटण्यास, कोरडी पडण्यास उत्तम प्रतिबंध होतो.


हिवाळ्यात त्वचेला आलेला कोरडेपणा पटकन दूर करण्यासाठी बऱ्याचदा केवळ बाह्योपचार केले जातात, यात सहसा क्रीम, मलम वगैरेंचा समावेश असतो. काही मर्यादेमध्ये याने बरे वाटत असले तरी ही क्रिम्स चांगल्या प्रतीची व नैसर्गिक घटकद्रव्यांपासून बनविलेली आहेत का याची खात्री करून घ्यायला हवी कारण बऱ्याचदा यात वापरलेल्या रासायनिक द्रव्यांचा नंतर त्वचेवर दुष्परिणाम होताना दिसतो.
हिवाळ्याच्या सुरवातीपासून हेमंत-शिशिर ऋतूची ऋतुचर्या सांभाळली, त्वचेलाच नाही तर संपूर्ण शरीराला आतून-बाहेरून योग्य प्रमाणात स्निग्धता मिळण्याकडे, रस-रक्‍त-मांस वगैरे धातूंच्या पोषणाकडे लक्ष ठेवले तर एकंदर आरोग्यही नीट राहील, त्वचाही सुरक्षित राहील.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT