Usalpav
Usalpav Sakal
फूड

खाद्यभ्रमंती : ‘विनय हेल्थ होम’चा उसळपाव

आशिष चांदोरकर

ईटीव्हीमध्ये असताना दादरला राहायला होतो, तेव्हा कबुतरखान्याच्या परिसरात उसळपावच्या अनेक गाड्या दिसायच्या. सकाळी उसळपाव, दिवसभर सँडविच नि वडापाव आणि रात्री पावभाजी नि भुर्जी किंवा ऑम्लेटपाव... मुंबईकरांचा दिवस पाव आणि ब्रेडशिवाय जाऊ शकत नाही. तर मूळ विषय असा की, दादर भागात सकाळच्या सुमारास उसळपावच्या गाड्या असायच्या.

उसळपाव हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. कारण उसळपाव ही माझं जन्मगाव असलेल्या बडोद्याची स्पेशालिटी आहे. तिथं सकाळच्या सुमारास जागोजागी शेवउसळ आणि पावच्या गाड्या दिसतात. बडोद्यात ‘महाकाली उसळपाव’ हा जॉइंट खूपच लोकप्रिय आहे. कधी गेलात, तर आवर्जून ट्राय करा. ‘महाकाली’मधली उसळ ही काळ्या मसाल्यातली असते. दोनतीन घासांनंतर उसळीचा झटका जाणवायला लागतो. उसळ हा पदार्थ आहेच एकदम भारी. बहुतांश ठिकाणी उसळीमध्येच मिसळीचा जीव असतो. काही ठिकाणी पावासोबत, काही ठिकाणी पुरीसोबत तर तर काही ठिकाणी घावनासोबत मिळणारी उसळ म्हणजे एक नंबर विषय. पुण्यात भवानी पेठेतील ‘वटेश्वर’मधली उसळपुरी देखील एकदम भारी. साताऱ्यात ‘चंद्रविलास’मधील पुरी नि उसळमिश्रित भाजी देखील अप्रतिम. उसळीवरच्या याच प्रेमापोटी दादरला असताना अनेकदा उसळपाव खाल्ला जायचा.

काही वर्षांपूर्वी असंच एकदा मुंबईला गेलो होतो. मुंबईचा चालताफिरता आणि खातापिता ज्ञानकोश असलेल्या प्रियदर्शन काळे अर्थात, राजाभाऊ यांची भेट झाली. सोबत माझा भाऊ सौरभ होता. राजाभाऊ राहायला गिरगावात. कुठं भेटायचं म्हटल्यावर त्यांनी तत्काळ ‘विनय’ला भेटू असं सांगितलं. सौरभला विनय माहिती होतं. त्यामुळं मला फार त्रास झाला नाही. ‘विनय’मध्ये बसल्यावर राजाभाऊ तिथली खासियत सांगू लागले. मिसळपाव, उसळपाव, पातळभाजी पाव, बटाटा वडा, साबुदाणा वडा, थालिपीठ नि कोथिंबीर वडी वगैरे. म्हणजे मराठमोळे पदार्थ ‘सर्व्ह’ करणारं ठिकाण. सौरभनं मिसळ मागविली. राजाभाऊंनी नेमकं काय मागवलं लक्षात नाही, पण मी आवर्जून उसळपाव ऑर्डर केली. काही मिनिटांत ऑर्डर आली. उसळपावचा रंग पाहून मनात धडकी भरायला झालं होतं. अर्थात, रंग आणि तिखटपणा यांचा तसा काही संबंध नव्हता.

बेतानं तिखट पण चवीला एकदम भारी. वाटाण्याची उसळ. मस्त शिजलेले वाटाणे आणि दाट ग्रेव्ही. अनेक ठिकाणी उसळीतील वाटाणे अर्धवटच शिजलेले असतात. ग्रेव्ही थोडी पातळसरच असते. मात्र, इथली उसळ सर्वार्थानं एकदम परिपूर्ण. सोबत मऊ पाव. बारीक चिरलेला कांदा आणि चटणी... उसळपाव खाल्ल्यानंतर एकदम दिलखूष. मिसळपाव खाल्ल्यानंतर सौरभलाही तसाच अनुभव.

विनयमधली पातळभाजी आणि पाव देखील अप्रतिम असते, असं राजाभाऊ सांगतात. कोल्हापुरात महानगरपालिकेच्या मागील गल्लीतील हॉटेल इंडियामध्ये मिळणारी पातळभाजी फारच जबरदस्त असते, असे जाणकार खवय्ये सांगतात. अनेक ठिकाणी (विशेषतः कोल्हापुरात) मिसळीला पातळभाजीशिवाय चव येत नाही. माझं तिथं जाणंही राहिलेलं आहे. त्यामुळं ‘हॉटेल इंडिया’ आणि ‘विनय’मध्ये पातळभाजी खाण्यासाठी आवर्जून एखादा स्पेशल दौरा करावा का, असा विचार सुरू आहे.

थोडक्यात, मिसळ असो किंवा उसळपाव किंवा पातळभाजी पाव विनय हे एकदम अप्रतिम आहे. गिरगाव किंवा परिसरात जाणार असाल, तर आवर्जून भेट द्या... निराश होण्याची वेळ येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT