Eating Pan
Eating Pan Sakal
फूड

खाद्यभ्रमंती : पानं : ‘जमलेली’, ‘रंगलेली’!

आशिष चांदोरकर

नळस्टॉपजवळ सुरू झालेलं ‘शौकीन’ हे पुण्यातील पहिलं वातानुकूलित पान शॉप. ‘शौकीन’चं वैशिष्ट्य म्हणजे मोरे यांच्या मातोश्री किंवा पत्नी स्वतः गल्ल्यावर असतात.

जेवण कितीही अप्रतिम असलं किंवा डेझर्ट्सनं आपलं मन कितीही भरलं असलं, तरीही मस्त पान जमविल्याशिवाय अनेकांचं जेवण ‘रंगत’ नाहीत. अर्थात, त्या अनेकांमध्ये अस्मादिकही आलेच. उत्तम जेवण झाल्यानंतर पानही तितकंच झकास हवं. पान नीट जमलं नाहीतर सगळा खेळ आणि मूड बिघडतो. त्यामुळं बहुतांश लोकांचे पानवाले ठरलेले असतात आणि त्या दुकानात किंवा ठेल्यावर पान लावणारा देखील... त्याच्याकडून घेतलेलं पानंच अधिक रंगतं. कधीतरी बदल म्हणून इकडचं तिकडचं पान चालतं. पण शक्यतो ठरल्या ठिकाणी पान खायलाच मंडळी पसंती देतात.

गेल्या अनेक वर्षांपासून माझी पसंती पुण्यातील नळस्टॉप चौकातील शरद मोरे यांच्या ‘शौकीन’ला आहे. ‘पानवाला’मध्ये ‘पुलं’ म्हणतात तसं आपण गेल्यानंतर आपण न सांगता आपल्यासमोर आपल्याला हवं ते पान आल्यानंतर होणारा आनंद मला ‘शौकीन’मध्ये अनुभवता येतो. आमचा महेंद्र कापरी असेल, भालेराव असतील किंवा अगदी अलिकडे ‘शौकीन’ परिवारात आलेला नीरज असो, प्रत्येक जण छान पान जमवितो...

नळस्टॉपजवळ सुरू झालेलं ‘शौकीन’ हे पुण्यातील पहिलं वातानुकूलित पान शॉप. ‘शौकीन’चं वैशिष्ट्य म्हणजे मोरे यांच्या मातोश्री किंवा पत्नी स्वतः गल्ल्यावर असतात. त्यामुळं मुली किंवा महिला इथं अगदी सहजपणे येतात. चॉकलेट, आइस किंवा फायर पानाप्रमाणेच मघई मसाल्यात ब्लॅक करंट, स्ट्रॉबेरी, मँगो, व्हॅनिला, केशर-पिस्ता, पिस्ता, रोस्टेड आल्मंड आणि बटरस्कॉच हे स्वादही ‘शौकीन’मध्ये मिळतात. पुण्यात बावधन, हडपसर, खराडी आणि सिंहगड रोडवर ‘शौकीन’च्या शाखा आहेत. पुण्याबाहेर नांदेड, सोलापूर, चिपळूण, रत्नागिरी, फलटण आणि मुंबई येथे ‘शौकीन’नं बस्तान बसविलं आहे. त्यामुळं या शहरात गेल्यानंतर पानाची चिंता आपोआपच मिटते.

पुण्यात ‘शौकीन’प्रमाणंच इतर अनेक ठिकाणी पान खाल्ल्यानंतर आत्मिक समाधान मिळतं. गेल्या बरेच वर्षात साधा फुलचंद सोडून दुसरं कोणतंही पान खाल्लेलं नाही. पण मार्केटयार्डमधील ज्योती पान शॉपचं ‘रामप्यारी’ खाल्ल्यानंतर प्रेमातच पडायला होतं. काही चटण्या, अगदी थोडा गुलकंद आणि स्पेशल फॉर्म्युला वापरून तयार झालेलं थंडगार ‘रामप्यारी’ खाल्ल्यानंतर काही मिनिटं स्वर्गात असल्याचा भास होतो. अवघ्या काही मिनिटांत पान संपूनही जातं. म्हणजे मघईपेक्षाही कमी वेळात. ‘ज्योती’मध्ये आधी ‘रामप्यारी’ नंतर साधा फुलचंद ही ऑर्डर ठरून गेली आहे.

‘शौकीन’ आणि ‘ज्योती‘ व्यतिरिक्तही अनेक ठिकाणी पानं छान जमतं. त्यापैकी एरंडवण्यातील हॉटेल समुद्रबाहेरचा धनंजय आणि हरी, बाजीराव रोडवरचा जगन्नाथ, कर्वेरोडवरचा अनिल, जंगली महाराज रोडवरचा शामराव, जोंधळे चौक आणि एसपी बिर्याणीसमोरचा पप्पू मिश्रा, शनिवार पेठेतील दक्षिणमुखी मारुती समोरचा सतीश, टिळक रोडवरच्या हॉटेल गिरीजाजवळचे आमचे घेवारे, निगडीमधील पारस आणि चिंचवड स्टेशनजवळच्या ‘रागा थाळी’च्या बाहेर असलेलं मल्हार...

हे झालं पुण्यातलं. पण पुण्याबाहेरही अनेक जण उत्तमोत्तम पान देऊन रसिकांची सेवा करीत असतात. त्यापैकी अनेक ठिकाणी स्वतः पानाचा आस्वाद घेण्याचीं संधी मिळाली. सगळीच ठिकाणं एकदम लाजवाब. मग त्यात औरंगाबादमधील ‘तारा’ आहे, कल्याणमधील ‘भाऊ पान शॉप’, नगरचं ‘दासी’, कोल्हापूरमधील ओपलच्या अलिकडचं ‘अनिता’ आणि रसिकराज पान शॉप, मुंबईतील गिरगांवचं ‘यशप्रकाश’ आणि दादर शिवाजी पार्कचं ‘शारदा’ अशा अनेक ठिकाणांचा समावेश होतो. तिथं पान खाल्ल्यानंतर प्रवासाचा सगळा शीण दूर होतो. मूड एकदम फ्रेश होऊन जातो. मागं एकदा परभणीहून जिंतूरला जाताना झरी-बोरीतील बोरी गावांत एका पान शॉपचं नाव होतं ‘सामना पान शॉप’. कट्टर शिवसैनिक असलेल्या त्या पठ्ठ्यानं पान टपरीचं नावच ‘सामना’ देऊन टाकलं होतं. आता तिथं ती टपरी आहे की नाही माहिती नाही. पण आजही ती टपरी लक्षात आहे. पान कोणतंही असो. मसाला, चॉकलेट, मघई, रामप्यारी किंवा साधा फुलचंद, १२०-३०० किंवा आणखी कोणतंही. पान जमलं पाहिजे. रंगलं पाहिजे. दिलखूष करून टाकलं पाहिजे...

येणारं नववर्ष पानाप्रमाणेच मस्त जमून यावं, पानाप्रमाणे आपलं आयुष्यही छान रंगून जावं आणि पानाचा स्वाद जसा जिभेवर रेंगाळत राहतो तसा चांगल्या नि संस्मरणीय आठवणींचा दरवळ कायम राहावा, याच नव्या वर्षाच्या शुभेच्छा...

(समाप्त)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT