Wari Special Food Recipes from Maharashtra: सोलापूरचे नाव घेतले की अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात; इथला समृद्ध वस्त्रउद्योग, विविधतेने नटलेली संस्कृती आणि अर्थातच, अस्सल सोलापुरी चव! या शहरात एक अशी खास डिश आहे जी केवळ स्थानिकांनाच नव्हे, तर बाहेरून येणाऱ्या प्रत्येक खवय्याला भुरळ घालते ती म्हणजे सोलापुरची बाजार आमटी!
चार-पाच वेगवेगळ्या डाळींचे एकत्रित मिश्रण, सोलापुरी काळ्या तिखटाचा झणझणीत स्पर्श आणि पारंपरिक पद्धती. ही आमटी म्हणजे सोलापूरच्या खाद्यपरंपरेचा एक जिवंत वारसा आहे. पण काय आहे या आमटीमागची कहाणी? कसे मिळाले तिला ‘बाजार आमटी’ हे नाव? आज ती कुठे मिळते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारीच्या वेळेस या आमटीचे काय महत्त्व आहे हे जाणून घेणे तितकेच रंजक ठरेल.
सोलापूर जिल्ह्यातील करकंब गावाला या खास आमटीचा उगमस्थान मानले जाते. पूर्वी सोलापूर हे व्यापाऱ्यांचे केंद्र असल्याने अनेक बाहेरील व्यापारी बाजारासाठी इथे येत असत. त्यांच्या जेवणाची सोय म्हणून स्थानिकांनी चार-पाच डाळी एकत्र करून एक खास आमटी बनवायला सुरुवात केली. या मिश्र डाळी आणि खास सोलापुरी काळ्या तिखटाचे एकत्रीकरण म्हणजेच बाजार आमटी. तिची चव इतकी भन्नाट होती की ती लवकरच संपूर्ण बाजारात आणि शहरात प्रसिद्ध झाली.
ही आमटी बनवण्यासाठी विविध डाळी जसे की तूर, मूग, मसूर इत्यादी शिजवून घेतल्या जातात. नंतर कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, आणि घरगुती मसाले टाकून फोडणी दिली जाते. त्यात सोलापुरी खास काळे तिखट मिसळून मसाला परतून घेतला जातो. नंतर या मसाल्यात डाळी आणि पाणी घालून आमटीला उकळ दिली जाते. ती तयार झाल्यावर गरमागरम कडक भाकरीसोबत सर्व्ह केली जाते.
सोलापूरमधील महावीर प्युअर व्हेज हे रेस्टॉरंट गेली दोन दशके बाजार आमटीसाठी प्रसिद्ध आहे. राहुल पोपटलाल पुरवत यांनी या ठिकाणाची सुरुवात केली होती, आणि सध्या त्यांचा मुलगा, प्रद्युम्न पुरवत हा व्यवसाय पुढे नेत आहेत. त्यांच्या मते, “प्रत्येक सोलापूरकराला बाजार आमटीची ओळख आहे. घरगुती मसाल्याचा वापर आणि पारंपरिक पद्धतीमुळे ही आमटी अजूनही लोकांची पहिली पसंती ठरते.”
करकंब हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातीलच एक गाव आहे. त्यामुळे पंढरपुर वारीमध्ये लांबचा प्रवास असल्याने आणि मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असल्याने, सोपे आणि झटपट बनणारे जेवण आवश्यक असते, तेव्हा ही आमटी मोठ्या प्रमाणात बनवली जाते.
पूर्वीपासून, सोलापूर जिल्ह्यातील लोक त्यांच्या घरी ही आमटी बनवून वारीत आलेल्या सर्वांना खाऊ घालत आले आहेत. बाजार आमटी ही एक अशीच भाजी आहे, जी मोठ्या प्रमाणात बनवता येते आणि चवीलाही चांगली लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.