छत्रपती संभाजीनगर : जवळपास प्रत्येक घरात ‘शिळे झाले’ म्हणून रोज लाखो लिटर पाणी रोज फेकून दिले जाते. शहरात एकीकडे पाण्यासाठी ओरड होते, तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी फेकले जात असल्याचे चित्र आहे. मात्र, पाणी कधीच शिळे होत नाही. पाण्यातील क्लोरीनची मात्रा संपल्यानंतर त्यात जीवजंतू तयार होतात. त्यामुळे जंतू होण्यापूर्वीच क्लोरीनचे दोन थेंब पाण्यात टाकल्यास कितीही दिवस तुमच्या घरातील पाणी स्वच्छ आणि ताजे राहू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्या आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे शहराची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत काही वर्षांत निर्माण झाली. म्हणून शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. सध्या शहराच्या काही भागाला चौथ्या दिवशी तर काही भागाला पाचव्या, सहाव्या, आठव्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या निम्म्या लोकसंख्येला नळाचे पाणी मिळत नाही, असे विदारक चित्र आहे. मात्र, दुसरीकडे ज्या भागात नळ आहेत, तिथे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. चौथ्या दिवशी नळाला पाणी येणार असल्याने नागरिक साठा करून ठेवतात. पान २ वर
‘जीवन ड्रॉप’चे दोन थेंब टाका अन् पाणी शुद्ध करा!
ज्या दिवशी पाणी येते त्यादिवशी मात्र साठवलेले पाणी शिळे झाले म्हणून फेकून दिले जाते. हे पाणी मोजले तर लाखो लिटरच्या घरात जाईल. त्यातून ज्या भागात पाणी नाही, तिथे दिलासा मिळू शकतो. पण, पाणी कधीच शिळे होत नाही.
धरणात असतो वर्षानुवर्षे पाणीसाठा
घरात साठविलेले चार किंवा पाच दिवसांचे पाणी शिळे झाले म्हणून नागरिक फेकून देतात. पण, धरणात वर्षानुवर्षे साठवलेले पाणी असते. हे पाणी शहरात पुरवठा होण्यापूर्वी त्यातील गाळ कमी करणे, जीवजंतू मरून जावेत यासाठी तुरटी, क्लोरीनचा वापर केला जातो. त्यामुळे नळाला आलेले पिण्याचे पाणी शिळे होत नाही, उलट पाणी २४ तासांनंतर आलेले म्हणजेच एका अर्थी शिळे झालेलेच पाणी पिण्यासाठी जास्त योग्य होय.
असे ठेवा पाणी शुद्ध
घरात नळाला येणारे पाणी साठविल्यानंतर शुद्ध राहावे, यासाठी पाण्यात क्लोरीन मिसळले जाते. हे क्लोरीन किमान तीन ते चार दिवस पाण्यात राहते. हळूहळू ते नाहीसे होते. दरम्यानच्या काळात हवेतून किंवा हाताच्या माध्यमाने, पाण्यात बुडविल्या जाणाऱ्या भांड्याच्या माध्यमातून जीवजंतू पाण्यात जातात. त्यामुळे साठवलेल्या पाण्यात अळ्या होऊ शकतात. पण, त्यापूर्वीच नागरिकांनी प्रत्येक तीन-चार दिवसाला पाण्यात ‘जीवन ड्रॉप’चे दोन थेंब टाकल्यास हे पाणी खराब होणार नाही.
परिणामी, लाखो लिटर पाण्याची बचत होईल. नळाला आलेल्या पाण्यात जर काही सूक्ष्म जीवजंतू असतील तर चोवीस तासांमध्ये मृतवत होऊन जातील. म्हणजेच पाणी जास्त शुद्ध होईल. जोपर्यंत पाणी धरण अथवा साठ्याच्या ठिकाणी असते, तेव्हा तेथे जिवजंतूंसाठी वनस्पतिजन्य पदार्थ उपलब्ध असू शकतात. त्यामुळे हे पाणी अशुद्ध असते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
धरणात वर्षभर पाणीसाठा असतो तो कधीच खराब होत नाही. नागरिकांना जो पाणी पुरवठा करण्यात येतो ते पाणी जलशुद्धीकरण करून पुरवण्यात येते. त्यामुळे पाणी व्यवस्थित भांड्यात झाकून भरून ठेवले तर आठ ते पंधरा दिवस पाण्याला काहीच होत नाही. तसेच पाणी अशुद्ध असेल तर पाण्याला शेवाळे लागते, यामुळे पाणी शिळे झाले म्हणून ते फेकून देणे चुकीचे आहे.
- डॉ. अभय धानोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
पाणी हे शिळे होत नाही. मात्र पाणी स्वच्छ जागेवर आणि चांगल्या पद्धतीने झाकून ठेवणे आवश्यक आहे. पाण्याची काळजी घेतली तर काही अडचण नाही, परंतु शंका असेलच तर असे पाणी फेकून न देता झाडांसाठी बागेसाठी किंवा वापरण्यासाठी उपयोगात घेता येऊ शकते.
- मनीषा एस. बेडवाल, प्रभारी अधिकारी तथा मुख्य अनुजीवशास्त्रज्ञ, प्रादेशिक आरोग्य प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर
महापालिकेने पुरवावे जीवन ड्रॉप
शहरात नळाला येणाऱ्या पाण्यामध्ये अंतर आहे. त्यामुळे नागरिक पाणी साठवितात व पुन्हा नळ आल्यानंतर हे पाणी फेकले जाते. जोपर्यंत नळाला रोज पाणी येत नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहू शकते. त्यामुळे महापालिकेनेच जीवन ड्रॉप नागरिकांना पुरविले पाहिजेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.