निवड ‘पॅथी’ची
डॉ. मृण्मयी मांगले,MBBS, Chronic disease reversal expert
‘गट हेल्थ’ आणि आपण
‘गट हेल्थ’ किंवा आतड्यांचं आरोग्य म्हणजे नेमकं काय आहे हा अजूनही शास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचा विषय आहे आणि त्यामध्ये झपाट्यानं संशोधन चालू आहे. असं समजा, की आरोग्याविषयी जी काही माहिती आपल्याला आत्ता आहे ती सगळी आतड्यांच्या आरोग्याबाबतच्या माहितीशिवाय अपूर्ण आहे.
जुनाट आजार होण्यामध्ये आणि त्यांच्या उपचारांमध्येदेखील या आरोग्याची मोठी भूमिका आहे, त्यामुळे आपण गट हेल्थबद्दल सोपी; पण महत्त्वाची माहिती घेऊया! (उदा : शरीरामध्ये बी जीवनसत्त्व कमी असेल, तर आपण आहारामध्ये त्याचं प्रमाण वाढवतो किंवा सप्लिमेंट्स घ्यायला सुरुवात करतो; परंतु बी जीवनसत्त्वाचं प्रमाण आतड्यांचं आरोग्य सुधारलं तर आपोआप वाढू लागतं.) ॲलोपॅथीचे जनक हिप्पोक्रेट्स यांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी ‘सर्व रोग ‘गट’मध्ये (पाचक tract मध्ये) सुरू होतात’ असं सांगून ठेवलं आहे. आयुर्वेदामध्येदेखील आपल्या जठराला, पोटातील अग्नीला, मलक्रियेचं विशेष महत्त्व सांगितलं आहे.
‘गट हेल्थ’ म्हणजे काय?
अनेक वर्षं आधुनिक विज्ञान अशा समजामध्ये होतं, की मानवी शरीराची सर्व चयापचयक्रिया मानवी पेशींमुळे होते व आपली शारीरिक यंत्रणा संपूर्ण स्वयंभू आहे; पण हिप्पोक्रेट्स यांनी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ आता समजू लागला आहे. आपल्या आतड्यामध्ये शंभर लाख कोटी एवढे निरनिराळे सूक्ष्मजीवाणू कायमस्वरूपी राहत असतात आणि आपल्या आरोग्यासाठी ते चांगले व महत्त्वाचे असतात. ते आपल्यात राहून त्यांना लागणारे पोषण आपल्याकडून मिळवतात व आपल्या आरोग्यासाठी चांगल्या अनेक गोष्टी करत असतात.
यामध्ये बॅक्टेरिया, फंगस, वायरस इत्यादी सूक्ष्म जीवाणूंचा समावेश असतो; तसंच आपल्या पोटातील त्यांच्या या वस्तीला ‘गट मायक्रोबायोम’ म्हणतात. त्यामध्ये ८०-८५ टक्के चांगले जीवाणू असतात व १०-१५ टक्के वाईट जीवाणू असतात.
ही जीवाणूंची सुदृढ वस्ती व आपल्या पचनक्रियेचे रचना आणि कार्य यांला एकत्रित मिळून ‘गट हेल्थ’ किंवा आतड्यांचे आरोग्य म्हणून जाणले जाते.
निसर्गातील ही इतकी सुंदर रचना आहे, की आपण दोघेही (मानवी शरीर आणि सूक्ष्म जीवाणूंची वस्ती) एकमेकांना सहकार्य करत जगत असतो आणि त्यामधील एकाचीही यंत्रणा बिघडली, की दुसऱ्याची प्रकृती खराब होते कारण आपलं जीवन एकमेकांवर अवलंबून असतं.
जीवाणूंना काय मिळतं?
आपल्या तोंडापासून ते गुदद्वारापर्यंत संपूर्ण पाचक ट्रॅक्टमध्ये निरनिराळे सूक्ष्मजीव वास करतात. पोटामध्ये वेगळे, लहान व मोठ्या आतड्यांमध्ये वेगळे असे पाच हजारांहून अधिक प्रजाती आणि प्रकार या वस्तीमध्ये असतात. त्यांना जिवंत राहण्यासाठी लागणारे सुयोग्य तापमान, पीएच, अन्न व त्यांच्यासाठी जीवनावश्यक असलेल्या इतर गोष्टी मिळतात.
आपल्याला काय मिळतं?
हे ऐकून अतिशयोक्ती वाटू शकेल; पण ही जीवाणूंची वस्ती नसेल, तर आपण आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकतच नाही. आपल्या अन्नातील वाईट जीवाणूंचा नाश करणं, अन्न पचन करण्यात लागणारे एन्झाईम तयार करणं, प्रतिकारशक्तीच्या क्रियेमध्ये भूमिका बजावणं, महत्त्वाची जीवनसत्त्वं तयार करणं अशी अनेक महत्त्वाची कामं हे जीवाणू करत असतात.
आपल्या शरीरातील पेशींच्या दसपट अधिक जीवाणू आपल्या अन्ननलिकेमध्ये असतात आणि आपण त्यांच्याशिवाय आरोग्यपूर्ण जगू शकत नाही; तसंच आजच्या काळात वाढत चाललेले जुनाट आजार, जसे की मधुमेह, संधिवात, पीसीओडी, नैराश्य, ऑटोइम्युन आजार हे केवळ असंतुलित सूक्ष्मजीवाणूंच्या वस्तीमुळे झालेले आजार असू शकतात. त्या जीवाणूंचं संतुलन आणि स्वास्थ्य पुनःस्थापित केल्यास आपण जुनाट आजारांमधून बाहेर येऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.