Jalgaon Crime News : स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पथकांनी जिल्ह्यातील तब्बल ८ गंभीर गुन्ह्यांची उकल केली. डिझेल चोरी करणारी टोळी, रस्ता आडवून रोकड लांबविणारी टोळी, पैशांच्या बॅगांची चोरी, दुचाकी व सायकली चोरी, महागडी चारचाकी वाहने कमी किंमतीत विक्री करणारे चोरटे, ट्रक चोरी, गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यासंह अन्य गंभीर गुन्ह्यातील संशयिताना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी (ता. २६) दुपारी पत्रकार परिषदेत आठ गुन्ह्यांमधील यशस्वी तपासाची माहिती दिली. (Police force aggressive with MCB to solve 8 serious crimes in district )
अमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठगबाजी करून सोन्याची अंगठी चोरून नेल्याप्रकरणी संशयित दिगंबर कौतिक न्हावी ऊर्फ मानकर याला स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अनिल जाधव, हवालदार दीपक माळी, रवींद्र पाटील यांनी जळगाव शहरातील आसोदा रोडवरील हरिओमनगरातील बोर्डाजवळ अटक केली. त्याच्याकडून २५ हजारांची सोन्याची लगड व अंगठी जप्त केली.
गावठी पिस्तुलासह संशयित अटकेत
वरणगावातील आंबेडकरनगरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या हरीश ऊर्फ हर्ष राहुल उजलेकर (वय १९) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ४० हजारांची दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, उदय कापडणे, रवींद्र चौधरी यांनी ही कारवाई केली.
फैजपूरची ट्रक चोरी
फैजपूर ठाण्यात ट्रक (एमएच १९, झेडए ५१८१) चोरीच्या गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुभाटी (जि. खरगोन) गावाजवळील खलटाका थाना चौकीत ट्रक जमा असल्याचे मिळून आले. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार संदीप पाटील, महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, प्रवीण मांडोळे, बबन पाटील, महेश सोमवंशी यांनी ट्रक जप्त केला.
तीन कार जप्त
अजिंठा चौफुली ते आकाशवाणी चौकदरम्यान महागड्या गाड्या संशयास्पद फिरत होत्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ लाख रुपयांची हुंडाई क्रेटा, १५ लाखांची हॅरियर आणि ४ लाखांची मारुती बलेनो कार जप्त केली. एलसीबीचे उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलिस कर्मचारी विनोद पाटील, गजानन देशमुख, मुरलीधर धनगर, संदीप चव्हाण, ईश्वर पाटील, प्रदीप चौरे, दीपक चौधरी यांनी संशयित मजहर रशीद पिंजारी (४३, रा. सालारनगर, जळगाव) यांच्याकडून तिन्ही कार जप्त केल्या. तिन्ही कारांवर बनावट नंबर प्लेट लावून कमी किंमतीत विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. यातील दोन गाड्यांच्या चोरीप्रकरणी दिल्ली येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. या गुन्ह्यात अजून संशयिताकडून इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
१४ दुचाकींसह दोघांना अटक
जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील वेगवेगळ्या भागातून दुचाकी आणि सायकलींची चोरी प्रकरणी दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १४ दुचाकी आणि १९ सायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी भूषण जगन्नाथ माळी (वय ४०) आणि विशाल विश्वनाथ माळी (वय २८, दोन्ही रा. वरणगाव, ता.भुसावळ) यांना अटक केली. त्यांच्याकडून ५ लाख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राहुल तायडे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, कर्मचारी सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भूषण शेलार, दीपक चौधरी यांनी केली. विक्री केलेल्या मालाची रक्कम घेऊन दुचाकीने घरी परतत असताना, यावल ते फैजपूर रस्त्यावर दुचाकी अडवून दोघांनी धाक दाखवून ३९ हजार ७०० रुपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने संशयित फरदीन कबीर पटेल (वय २४, रा. आयेशानगर, यावल), सोहेल रुबाब पटेल (वय २३, रा. विरारनगर, यावल) आणि एक अल्पवयीन मुलला ताब्यात घेतले.
बॅग लुटणारी टोळी जेरबंद
पारोळ्यातील एसबीआय बँकेसमोर पैशांची बॅग लांबविणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वीच अटक केली. त्यांच्याकडून रोकड जप्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.