जळगाव : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (ता. १) सार्वजनिक व घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही. सोबतच पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते नसणार याचे बंधन आहे. मेहरूण तलाव, नदीकाठावर नागरिकांना मूर्ती नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
मेहरूण तलाव परिसरात सोमवारी बॅरिकेड्स लावण्यात आले. तसेच विसर्जन मार्गावरील खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे आदींनी विसर्जनाच्या तयारीची पाहणी केली.
यंदा गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट होते. देखावे नव्हते. मूर्तीला चार फुटांची मर्यादा होती. मंडळांच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी, सायंकाळी महाआरती होऊन प्रसादवाटप झाले. गणेशोत्सवातील अनेक दिवस पाऊस होता. दर्शनासाठी सामाजिक अंतर ठेवूनच प्रवेश होता. स्वागत मिरवणुकीला परवानगी नव्हती, तशी विसर्जन मिरवणुकीलाही परवानगी नाही. यामुळे ढोल-ताशांचा आवाज न करता केवळ घोषणा देत मोजक्या कार्यकर्त्यांनाच विसर्जन करता येणार आहे. गणेश विसर्जनात अडथळे न येण्यासाठी महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलिस बंदोबस्त रवाना झाला आहे. सोबतच होमगार्डही असणार आहेत. मिरवणूक नसली तरी पोलिसांची करडी नजर विसर्जनावर असणार आहे.
प्रत्येक प्रभागात मूर्ती संकलन
महापालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागात मोक्याच्या ठिकाणी मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रे सुरू केली आहेत. भाविकांनी लहान मूर्ती परिसरातील मोठ्या मंडळांना विसर्जनासाठी द्याव्यात किंवा मूर्ती संकलन केंद्रावर देण्याचे आवाहन केले आहे. शहरात सकाळी नऊपासून विसर्जनाला सुरवात होणार आहे.
डोळ्यांचे पारणे फेडणारी मिरवणूक
जळगावच्या विसर्जन मिरवणुकीला अनेक वर्षांची परंपरा आहे. १९७२ मध्ये शहरात मोठ्या प्रमाणात जातीय दंगली उसळल्यानंतर त्या वेळी निघालेल्या विसर्जन मिरवणुकीस गालबोट लागले होते. त्यानंतर काही वर्षे मिरवणूक प्रचंड बंदोबस्तात व मर्यादित स्वरूपात निघायची. सामाजिक कार्यकर्ते (कै.) डॉ. अविनाश आचार्य यांनी स्वत: पुढाकार घेऊन शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यानंतर जळगावातील विसर्जन मिरवणूक अत्यंत शिस्तीत, जल्लोषात, मंडळांसह प्रशासनाच्या सक्रिय सहभागाने पार पडू लागली. मिरवणुकीत उत्कृष्ट आरास, उत्कृष्ट कसरती, शिस्तबद्धता अशा वेगवेगळ्या स्वरूपाची आकर्षक बक्षिसे डॉ. आचार्य यांनी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिली. त्यामुळे मिरवणुकीला चांगला प्रतिसाद मिळू लागला व विसर्जन मिरवणुकीचा ‘जळगाव पॅटर्न’ राज्यात लौकिकप्राप्त झाला. यंदा मात्र कोरोनामुळे डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या विसर्जन मिरवणुकीस जळगावकर मुकणार आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.