जळगाव

रुग्णांचा जीव टांगणीला अन्‌ म्हणे ‘ट्रायल’ घेत होते..!

देविदास वाणी



जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) व रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकमधील (Oxygen tank) साठा गुरुवारी सायंकाळी संपला अन्‌ ऑर्डर दिलेल्या ऑक्सिजनच्या टॅंकरचा शोध सुरू झाला. २७० रुग्ण या टँकमधील ऑक्सिजनवर होते. जर, ऐनवेळी डीन यांनी शंभर सिलिंडरची (Oxygen cylinder) पर्यायी व्यवस्था केली नसती, तर नाशिकमधील घटनेची पुनरावृत्ती जळगावला घडण्याची भीती होती. ( jalgaon district hospital oxygen tank empty administration says trial took)

ऑक्सिजन टँकरची इत्थंभूत माहिती टँकच्या संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपडेट होती. त्यात वेळोवेळी टँकमधील ऑक्सिजन संपतो आहे याची माहितीही अपडेट होत होती. मात्र, याकडे जिल्हाधिकारी, ‘डीन’ वगळता इतर अधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले होते. एका अधिकाऱ्याने तर, आम्ही ऑक्सिजन टँक संपल्यानंतर काय घडते याची ट्रायल घेत होतो, असे सांगत घटनेला गांभीर्य दिले नाही. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. तरच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.
जिल्हा रुग्णालयात २० केएल (किलोलिटर) क्षमतेचा ऑक्सिजन टँक आहे. त्याद्वारे २७० कोविडच्या रुग्णांना ऑक्सिजन पुरविला जातो. सोबतच बाल विभाग, महिला विभागातील रुग्णांनाही येथूनच ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. गुरुवारी सायंकाळी साडेसातला ऑक्सिजन टँकमधील साठा पूर्णत:

सर्वांची एकच धावपळ..

संपला अन्‌ जिल्हा रुग्णालयातील डीनपासून सर्वांचीच धावपळ उडाली होती. टँकमध्ये ऑक्सिजन बाहेर आणून टाकावा लागतो. या टँकमध्ये किती ऑक्सिजन आहे, तो किती वेळ, किती रुग्णांना पुरेल, कधी संपेल याची अपडेट माहिती टँकशी संबंधित समितीच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर आहे. या ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी राऊत, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी राहुल पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक डॉ. माणिक राव आदी अधिकारी आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक, अन्न व औषध प्रशासनाने निरीक्षक डॉ. राव यांची महत्त्वाची भूमिका यात आहे. काल टँकमधील ऑक्सिजन संपत आहे, हे कळत होते. लवकरच पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना, ऑक्सिजन आणणारा टँकर जळगाव-धुळे रस्त्यावर मध्येच कोठेतरी असेल, त्याचा फोन लागत नाही, अशी उत्तरे मेडिकल कॉलेजच्या संबंधितांना मिळत होती. सायंकाळी साडेसातनंतर डॉ. रामानंद स्वत: ऑक्सिजन प्लांटजवळ तळ ठोकून होते. जिल्हाधिकारी वेळोवेळी त्यांच्या संपर्कात राहून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत माहिती घेत हेाते. मात्र, या यंत्रणेतील अन्य एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी आला नाही किंवा पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न करण्यासाठी पुढे आला नाही.

अनुत्तरित प्रश्‍नांची मालिका
आमदार गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांना रात्री अकराला ‘जीएमसी’मध्ये अपडेट घेण्यासाठी पाठविले. श्री. देशमुख यांनी डीन व इतरांची भेट घेतली. अन्न व औषध प्रशासनाचे डॉ. माणिक राव यांना ऑक्सिजन पुरवठ्याबाबत विचारले असता, आम्ही ऑक्सिजन संपला तर काय होते याची ‘ट्रायल’ घेत होतो, असे सांगत वेळ मारून नेली. रुग्णांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न असताना अशी कोणती ‘ट्रायल’ हे अधिकारी घेत होते? त्या ट्रायलची कोणालाच कशी माहिती नव्हती? अन्‌ ट्रायल असती तर सायंकाळी साडेसात ते रात्री पाऊणपर्यंत तब्बल साडेपाच तास टँकर का आला नाही? दरम्यानच्या काळात डॉ. रामानंद यांनी २०० सिलिंडर तयार ठेवली नसती आणि रुग्णांच्या जीविताचे बरेवाईट झाले असते, तर त्यास जबाबदार कोण, असे अनेक अनुत्तरित प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत असून, त्यांची उत्तरे समोर येणे अपेक्षित आहे.

अखेर टँकमध्ये भरला ऑक्सिजन
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्यानंतर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होणार होती. मात्र, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दोनशे ऑक्सिजन सिलिंडरची पर्यायी व्यवस्था केली असल्याने रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासला नाही. गुरुवारी मध्यरात्री १२.४१ ला एक ऑक्सिजन टँकर आला. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटमध्ये ५.५ केएल ऑक्सिजन भरला गेला. दुसरा टँकर शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास आला त्याद्वारे १५.५ केएल ऑक्सिजन भरला गेला. असा एकूण १६ केएल ऑक्सिजन प्लांटमध्ये भरण्यात आला आहे. यामुळे आता कोणत्याही प्रकारचा ऑक्सिजनचा तुटवडा उद्यापपर्यंत नाही, असे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात सध्या ३५० रुग्ण उपचार घेत असून, त्यात दहा बालकांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT