खानावळीत ग्राहकांना आपुलकीने जेवण वाढताना विमलताई जाधव 
काही सुखद

दुर्गा खानावळीने जपलीय ८३ वर्षांची परंपरा

विकास जाधव

वाठार स्टेशन (जि. सातारा) या गावामध्ये १९३४ मध्ये सोनूबाई जाधव यांनी सुरू केलेली दुर्गा खानावळ आजही त्यांच्या सुना, नातसुनांनी सुरू ठेवली आहे. गेली ८३ वर्षे अंखडितपणे जाधव कुटुंबातील महिलांनी खानावळ व्यवसायात वेगळा ठसा उमटवलेला आहे.

वाठार स्टेशन (ता. कोरेगाव, जि. सातारा) हे दुष्काळी भागातील गाव. या गावामध्ये चार पिढ्यांपासून सुरू असलेली दुर्गा खानावळ  सातारा जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांतही खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. दुर्गा खानावळीस ८३ वर्षांची परंपरा आहे. स्वांतत्र्यपूर्व काळात वाठार स्टेशन गावातून महाबळेश्र्वरला जाताना जेवणाच्या सोईसाठी १९३४ मध्ये इंग्रज अधिकारी डॉ. बेंन्झी यांनी सोनूबाई बाळकृष्ण जाधव यांना खानावळीचा परवाना दिला होता. सोनूबाईंनी आपली भाची दुर्गा हिचे नाव देऊन राहत्या घरात खानावळ सुरू केली. सोनूबाईंचे वय वाढल्यामुळे त्यांच्याबरोबरीने दुर्गा यांनी खानावळीमध्ये मदत करण्यास सुरवात केली. याच दरम्यान सोनूबाईचा मुलगा वसंतराव यांचे विमल यांच्याशी लग्न झाले. पुढील काळात विमलताईंनी खानावळीचा व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढविला. २००२ मध्ये विमलताईंचा मुलगा विक्रम यांचे लग्न अरुणा यांच्याशी झाले. जाधव कुटुंबासाठी दुर्गा हे नाव भावनिक असल्याने अरुणा यांचेही नाव दुर्गा ठेवण्यात आले.

गेल्या काही वर्षांत विमल आणि दुर्गा या सासू-सुनांनी खानावळीच्या व्यवसायात चांगली वाढ केली. विमलताईंनी सातारा-फलटण रस्त्यावर जागा घेऊन खानावळ मोठी केली. या ठिकाणी सुसज्ज किचनही तयार केले. खानावळीतील पदार्थांना वेगळी चव असल्याने ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो.

काळानुसार केले बदल 
बदलाबाबत माहिती देताना सौ. विमलताई म्हणाल्या की, सुरवातीच्या काळात आम्ही जेवणामध्ये बाजरीची भाकरी, घुंट, पिठलं, उसळ, भात, कांदा, लोणचे देत होतो. मात्र, ग्राहकांच्या मागणीनुसार खाद्य पदार्थांमध्ये आम्ही बदल केले. सध्या आम्ही चपाती, वरण, तिखट भाजी, सुकी भाजी, दोन प्रकारच्या चटण्या, खरडा, भात, लोणचे, दही, तूप, सोलकढी असे पदार्थ देतो. सकाळी सातपासून खानावळीच्या कामांना सुरवात होते. सकाळी दहापर्यंत सर्व भाज्या तसेच भात तयार करून ठेवला जातो. ग्राहकांच्या संख्या मोठी असल्याने खानावळीच्या कामामध्ये दहा महिला मदतीस आहेत. स्वच्छतेच्या बरोबरीने भाज्याची चव कायम ठेवली आहे. खानावळीस लागणारे लोणचे, पापड, मसाले, विविध प्रकारच्या चटण्या घरी बनवितो. परिसरातील शेतकऱ्यांच्याकडूनच भाजीपाला, धान्य खरेदी केली जाते.

मान्यवरांची खानावळीस पसंती 
स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीसिंह नाना पाटील, किसन वीर तसेच सातारा परिसरात येणारे इंग्रज अधिकारी दुर्गा खानावळीत जेवायला येत असत. गेल्या काही वर्षांत राज्यातील मान्यवर, मंत्री, चित्रपट निर्मात्यांनीदेखील खानावळीची चव चाखली असल्याची माहिती विमलताई अभिमानाने सांगतात. आजही सातारा परिसरात येणारे परदेशी पर्यटक दुर्गा खानावळीत शाकाहारी जेवणासाठी आवर्जून येतात. खानावळ व्यवसायातील योगदान आणि महिला उद्योजक म्हणून अकरा पुरस्कारांनी विमलताईंना गौरविण्यात आले आहे.

साजरा होतो महिला दिन 
दुर्गा खानावळीच्या वाटचालीमध्ये महिलांचे मोठे योगदान अाहे. यामुळे गेल्या दहा वर्षांपासून विमलताई आणि दुर्गाताई आठ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनास एक हजार महिलांना मोफत जेवण देतात. अंध, अंपग पुरुष तसेच महिलांना खानावळीच्या जेवण दरात ५० टक्के सूट दिली जाते. 

स्वातंत्र्य लढ्यातही योगदान
स्वातंत्र्यपूर्व काळात वाठार रेल्वे स्टेशनवरून इंग्रज अधिकारी बग्गीतून महाबळेश्र्वरला जात असायचे. हे अधिकारी जेवणासाठी दुर्गा खानावळीत थांबायचे. त्यामुळे सातारा परिसरात कोणते इंग्रज अधिकारी येणार आहेत, याची माहिती सोनूबाई जाधव यांना मिळत होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांना सोनूबाई जाधव इंग्रज अधिकाऱ्यांच्याबाबत माहिती देत असत. इंग्रजांची नजर चुकवून सातारा येथील तुरुंगात असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना पोस्टमनच्या मदतीने सोनूबाई जेवणाचा डबा पोचवीत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सोनूबाईंना विचारले होते, की आपणास कोणती सुविधा हवी आहे का? मात्र सोनूबाईंनी मला कोणतीही सुविधा नको, असे सांगत स्वांतत्र्यसैनिक म्हणून मिळणाऱ्या सुविधाही नाकारल्या होत्या, अशी माहिती जाधव कुटुंबीय देतात.

शेतीमध्येही केली प्रगती 
सौ. विमल आणि सौ. दुर्गा या सासू-सुनांनी खानावळीतून मिळणाऱ्या मिळकतीमधून राहण्यासाठी चांगला बंगला बांधला. त्याचबरोबरीने सात एकर शेतीदेखील खरेदी केली. याबाबत माहिती देताना सौ. दुर्गाताई म्हणाल्या की, खरिपात भाजीपाला, मटकी, घेवडा लागवड करतो. पाण्याच्या उपलब्धतेनुसार रब्बी हंगामात ज्वारी तसेच दहा गुंठ्यांचे वाफे करून त्यामध्ये हंगामी भाजीपाला लागवड केली जाते. दुष्काळी भाग असल्याने पाण्याची टंचाई असते. पिकांना पाणी देण्यासाठी ओळखीच्या शेतकऱ्यांच्या शेततळ्यातील पाणी घेतले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. शेणखताचा जास्तीत जास्त वापर करतो.

खानावळीचे संकेतस्थळ 
उपक्रमाबाबत माहिती देताना विमलताई म्हणाल्या की, आम्ही ग्रामीण भागात असल्याने ग्राहकांना खानावळीत दै. ॲग्रोवनही वाचण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. व्यवसाय वुद्धीसाठी दुर्गा खानावळीचे संकेत स्थळ आहे. संकेत स्थळावर खानावळीचा इतिहास तसेच जेवणातील खाद्य पदार्थांची माहिती दिली आहे. माहिती प्रसारासाठी व्हॉटसॲपचाही प्रभावी वापर केला जात आहे. खानावळीच्या व्यवसायामध्ये पती वसंतराव आणि मुलगा विक्रम यांची मोलाची मदत होते. मुलगा खानावळीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी तसेच शेतीमध्ये भाजीपाला लागवडीचे नियोजन पहातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT