प्राणी हत्या
प्राणी हत्या Sakal
कोकण

बापूसाहेब महाराजांनी प्राणीहत्येवर आणली बंदी

शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग - केवळ माणसेच नाही, तर प्राण्यांच्या हिताचा विचार करणारा राजा तसा दुर्मिळच म्हणावा लागेल. बापूसाहेब महाराज याच शृंखलेतील होते. त्यांनी संस्थानात प्राणी हत्येला कायमची बंदी आणली. यासाठीचा कायदा करण्याबरोबरच त्याच्या अंमलबजावणीसाठी धाक न दाखवता लोकांना समजावले. त्यामुळे धर्माच्या नावाखाली सुरू असलेली प्राणी हत्या कायमची थांबली. निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता असे शब्द कोकणात पोहोचायला अनेक वर्षे लागली. आताही कोकणच्या अनेक भागांत पर्यावरण, जैवविविधता राखण्यासाठी संघर्ष पाहायला मिळतो. बापूसाहेब महाराज प्राण्यांबाबतही किती कनवाळू होते, याचा प्रत्यय त्यांनी प्राणी हत्येविषयी आणलेल्या कायद्यावरून येतो. १९२५ मध्ये हा कायदा आणत त्यांनी अघोरी प्रथांना पूर्णविराम दिला. त्या काळात काही मंदिरांमध्ये प्राण्यांचे बळी देण्याची पद्धत होती. गावानुसार या पद्धती बदलत जायच्या; मात्र यात क्रूरतेचे विकृत दर्शन घडायचे. बापूसाहेब महाराजांना हे मान्य नव्हते. त्यांनी धर्माच्या नावाखाली होणाऱ्या प्राणी हत्येवर बंदी आणणारा कायदा जुलै १९२५ पासून लागू केला. दसरा, पितृ पंधरावडा या काळात असे बळी देण्याच्या प्रथा अनेक ठिकाणी होत्या. या कायद्यामुळे त्याला पूर्णविराम मिळाला. अर्थात या प्रथा धार्मिक गोष्टींशी निगडित होत्या. त्यामुळे कायद्याचा धाक दाखवून या प्रथा बंद करणे सोपे नव्हते. काही ठिकाणच्या प्रथा थांबविण्यासाठी महाराजांनी लोकांची समजूत काढली. काही वेळा रोष ओढवूनही प्रथा बंद करायला लावल्या; पण यातही जोरजबरदस्ती नव्हती. या संदर्भात काही उदाहरणे सांगितली जातात.

कुडाळ तालुक्यातील आंबडपाल-मुळदे परिसरात घडलेला असाच एक किस्सा प्रसिद्ध आहे. पितृपक्षात महालयाच्या आधी डुकराची पारध धरून शिकार करण्याची प्रथा खुद्द राजघराण्यात होती. अर्थातच पितृपक्षात आणि देव कार्यात पशुहत्या करणे महाराजांना मान्य नव्हते; मात्र अशा प्रथा एकदम बंद करणे सोपे नव्हते. महाराज यासाठी निमित्त शोधत होते. एका वर्षी शिकारीसाठी आंबडपाल-मुळदे परिसरात रान उठवण्यात आले. डुकरांची एक झुंड उठली, ती सरळ आंबडपाल गावात घुसली. महाराज व इतर या डुकरांच्या मागे होते. आंबडपाल सीमेवर येताच महाराजांनी पारध थांबवण्याचा आदेश दिला. आंबडपाल हे गाव पूर्वी शंकराचार्यांना इनाम दिले होते. वाडवडिलांनी दान केलेल्या गावात शिकार करण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे सांगून महाराज मागे फिरले. ज्याअर्थी सद्गुरूंच्या गावात शिकारीने आश्रय घेतला, त्याअर्थी सद्गुरू आणि पूर्वजांनाही या काळात शिकार मान्य नाही, असे सांगून त्यांनी महालयानिमित्त शिकार करण्याची प्रथा कायमची थांबविली.

आणखी एक किस्सा वेंगुर्ले तालुक्यातील एका गावात घडला होता. त्या गावात देवीला रेडा बळी देण्याची प्रथा होती; मात्र ती अतिशय क्रूर होती. बळीसाठी निवडलेल्या रेड्याच्या गळ्यात माळ घालून देवीला गाऱ्हाणे घातले जायचे. त्यानंतर भंडारा उधळून रेड्याला गावात मोकळे सोडले जात असे. यानंतर हा रेडा चौखूर उधळायचा. तो गावाच्या सीमेबाहेर मात्र जात नसे. इकडे गावातील आपापल्या शेतात शेतकरी पाळ-कोयते, भाले, कुऱ्हाडी घेऊन दबा धरून बसलेले असायचे. रेडा शेतात आला की त्याच्यावर हत्याराने वार केले जात असत. रेड्याचे रक्त आपल्या शेतात पडणे पवित्र मानले जायचे. रक्तबंबाळ झालेला तो रेडा शेवटी देवळात येऊन प्राण सोडायचा. असे झाल्यावर विधी बरोबर झाला, असे मानले जायचे. महाराजांनी ही प्रथा प्रत्यक्ष पाहिली. त्यांचे हृदय द्रवले. त्यांनी ही प्रथा बंद करायचे ठरविले. गावकऱ्यांशी बोलून त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला; मात्र देवाच्या भीतीने ते तयार होईनात. शेवटी ‘तुम्ही देव उभे करा, मी देवाची परवानगी घेतो. सर्व जबाबदारी माझ्यावर असेल, तुम्ही घाबरू नका’, असे महाराजांनी सांगितले.

ठरलेल्या दिवशी मंदिरात संचार उभा करण्यात आला. देवाने काय म्हणून विचारताच महाराज म्हणाले, ‘तू या गावचा देव. या सीमेतील प्राणीमात्रांचा पोषणकर्ता, मालक. तुझ्या प्रजेची व्यवस्था राखणारा तुझा शिलेदार मी, या राज्याचा राजा, आज तुझ्याकडे एक मागणी मागतो आहे. माझी विनंती कबुल करणार असशील तरच ती मागतो. नाही तर आल्या पावली परत जातो.’ यावर संचार आलेल्या देवाने सांगितले की, ‘अरे राजा, तू माझा धाकटा भाऊ. तुझी मागणी मी कशी नाकारेन?’ यावर महाराज म्हणाले, ‘देवा, किडा मुंगीपासून माझ्यापर्यंत सारी तुझी लेकरे. तुझ्या नावावर एकाने दुसऱ्या गरीब व निरपराध प्राण्याचा क्रूरपणे बळी घेणे, हे न्यायाला धरून नाही. मलाही मान्य नाही. त्यासाठी प्राचीन काळापासून चालत आलेली बळी देण्याची ही आसुरी प्रथा नव्या युगात चालवणे योग्य नाही. ती मी बंद करणार आहे. त्याला तुझी संमती दे.’ यावर देवाने ‘पर्यायी उपाय कर आणि बंद कर. आपल्याला ते मान्य असेल,’ असे सांगितले. यानंतर गावची ती अमानुष प्रथा बंद झाली.

स्टेट बँकेची स्थापना

बापूसाहेब महाराजांनी १९३२ मध्ये स्टेट बँकेची स्थापना करून आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची गोष्ट मानली पाहिजे. बँक व्यवस्था त्या काळात लोकांसाठी नवीन होती; मात्र महाराजांमुळे अल्पावधीत बँकेने लोकांचा विश्‍वास संपादित केला. सावंतवाडी, कुडाळ, बांदा, आरोंदा येथील व्यापाऱ्यांना याचा फायदा होऊ लागला. बँकेने ठेवी जमा करण्याबरोबरच कर्ज वितरणही सुरू केले. बँक व्यवस्थेसाठी दरबारातर्फे एक बोर्ड नेमून त्यात तीन सरकारी अधिकारी व दोन बिनसरकारी सदस्य होते.

सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचे धोरण

सरकारी नोकरांच्या दृष्टीने महाराजांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ब्रिटिश सरकारच्या धरतीवर या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू केली. या आधी अधिकाऱ्यांच्या मर्जीवर काहींना पेन्शन मिळत असे. त्यामुळे अनेकजण यातून वंचित राहायचे. नव्या धोरणांमुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू झाली. याचा संस्थानवर आर्थिक बोजा पडला; मात्र चांगल्या कारभारासाठी नोकरवर्गाचे मनोबल उंचावणे आवश्यक असल्याने बापूसाहेबांनी हा निर्णय अंमलात आणला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT