cashew issue konkan sindhudurg
cashew issue konkan sindhudurg 
कोकण

भरपाई नाही; मग काजू विम्याचा उपयोग काय? 

एकनाथ पवार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - यंदा नुकसान होऊन देखील जिल्ह्यातील काजू बागायतदारांना हवामानावर आधारित फळपीक योजनेंतर्गत विमा परतावा मिळालेला नाही. त्यामुळे पुढील हंगामासाठी काजूचे क्षेत्र विमा संरक्षित करायचे की नाही, अशा द्विधा मनस्थितीत जिल्ह्यातील हजारो शेतकरी आहेत. दहा टक्के शेतकऱ्यांनाही विमा परतावा न मिळाल्यामुळे प्रचंड नाराजी आहे. 

काजू हे संपूर्ण जिल्ह्यात घेतले जाणारे पीक आहे. हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून काजूकडे पाहिले जात होते. त्यामुळे काजू लागवडीखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. जिल्ह्यातील काजू लागवडीखालील उत्पादनक्षम क्षेत्र हे 50 हजार हेक्‍टरच्या जवळपास आहे. बाराशे ते पंधराशे कोटी काजूपासून उलाढाल होते. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणात काजूला अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु दोन- तीन वर्षांपासून काजू पिकांवर सातत्याने संकटांवर संकटे येत आहेत. त्यामुळे काजू बागायतदार हैराण झाला आहे.

शासनाने प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू केली. हवामानावर आधारित या फळपीक योजनेत काजू पिकांचा समावेश झाला. त्यामुळे काजू बागायतदारांमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अतिवृष्टी, सततच्या ढगाळ वातावरणामुळे विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे या विमा योजनेचा आपल्याला फायदा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु काजू बागायतदारांचा गेली दोन वर्षे अपेक्षाभंग होत आहे. 

2019 मध्ये जिल्ह्यातील 4 हजार 627 शेतकऱ्यांनी 3 हजार 45 हेक्‍टर काजूचे क्षेत्र विमा संरक्षित केले. त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे 1 कोटी 40 लाख 52 हजार इतकी रक्कम भरली. जिल्ह्यात एकूण 39 महसूल मंडळे आहेत. त्या मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान यंत्रे बसविली आहेत. 1 डिसेंबर ते 29 फेब्रुवारी या कालावधीत नैसर्गिक आपत्ती येऊन नुकसान झाले, तर काजूला विमा परतावा मिळण्याची तरतूद आहे.

यावर्षी नोव्हेंबरपासून ते मार्चपर्यंत सतत ढगाळ वातावरण होते. याशिवाय सह्याद्री पट्ट्यातील काजू बागांना जानेवारीमध्ये वादळाचा तडाखा बसला. काही भागात पाऊसही झाला. काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून पंचनामे देखील करून घेतले; परंतु प्रत्यक्षात विमा कंपनीकडून 4 हजार 627 शेतकऱ्यांपैकी केवळ 418 काजू बागायतदारांना काजू विमा परतावा मिळाला. यातील दोन शेतकरी मालवण तालुक्‍यातील मसुरे मंडळातील आहेत, तर उर्वरित सर्व शेतकरी हे आंबोली (ता. सावंतवाडी) महसूल मंडळातील आहेत. या शेतकऱ्यांना 97 लाख 37 हजार इतका विमा परतावा मिळाला. 

जिल्ह्यातील दोन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाल्यामुळे उर्वरित 37 महसूल मंडळातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यावर्षी नुकसान होऊनही परतावा मिळणार नसेल, तर काजूचे क्षेत्र विमा संरक्षित का करावे? असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. त्यामुळे यावर्षी काजू विमा संरक्षित क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता आहे. 

- जिल्ह्यात काजूचे उत्पादनक्षम क्षेत्र 50 हजार हेक्‍टर 
- काजूची उलाढाल 1500 कोटींची 
- यावर्षी 4 हजार 627 बागायतदार 
- 3 हजार 45 हेक्‍टर विमा संरक्षित 
- दोन मंडळांत 418 बागायतदार 
- 97 लाख 37 हजार रुपये परतावा 
- 37 महसूल मंडळातील बागायतदारांची उपेक्षाच 

माझी कोकिसरे येथे काजूची उत्पादनक्षम 500 झाडे आहेत. गेल्यावर्षी काजूचे हे क्षेत्र विमा संरक्षित केले होते. गेल्यावर्षी काजूचे नुकसान देखील झाले; परंतु विमा परतावा मिळालेला नाही. त्यामुळे काजूचा विमा उतरायचा कशासाठी? हा आमच्यासमोरचा प्रश्‍न आहे. 
- प्रकाश पांचाळ, काजू बागायतदार, कोकिसरे  

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT