कोकण

मोर्जे खून प्रकरणातील चौघे गजाआड

सकाळवृत्तसेवा

वेंगुर्ले - दाभोली- मोबारवाडी येथील भानुदास मोर्जे खून प्रकरणातील संशयित दाभोलीचे उपसरपंच संदीप पाटील, शैलेश पाटीलसह चौघांना येथील पोलिसांनी आज चौथ्या दिवशी अटक केली. संशयितांना दाखविल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थ व मच्छीमारांनी घेतला. दरम्यान, सायंकाळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढली. त्यानंतर सायंकाळी उशिरा कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.

दाभोली मोबारवाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत भानुदास मोर्जे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तेथील उपसरपंच संदीप पाटील, त्यांचे भाऊ शैलेश पाटील, संदीप पाटील यांचे कामगार राजाराम कांबळी व भाई दाभोलकर यांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवस होऊनही संशयितांना अटक न झाल्याने काल (ता. २) येथील पोलिस ठाण्यासमोर ग्रामस्थांसह मच्छीमार समाज संघटनेने ठिय्या आंदोलन केले होते.

उपविभागीय पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी संशयितांना आज दुपारपर्यंत अटक करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार आज सकाळी पोलिसांनी चारही संशयितांना ताब्यात घेऊन सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले. त्यांना बुधवार (ता. ६)पर्यंत कोठडी देण्यात आली.
आज दुपारी संशयितांना आमच्या समोर हजर करा, या मागणीसाठी कुटुंबीय, स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार बांधव यांनी पुन्हा येथील पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. मात्र, ही मागणी न्यायालयाच्या आदेशाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली.

सायंकाळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मच्छीमार नेते छोटू सावजी, बाबी जोगी, रविकिरण तोरस्कर, राजन दाभोलकर, जयप्रकाश चमणकर, दादा केळुस्कर, वसंत तांडेल, सरपंच उदय गोवेकर, समाधान बंदवळकर, एकनाथ राऊळ या प्रतिनिधींशी चर्चा करून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

या वेळी केसरकर यांनी सांगितले, की कायदेशीर कारवाईसाठी उत्तम वकील देऊ. येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री सहायता निधीतून कुटुंबासाठी आर्थिक मदत देऊ. या वेळी सभापती सुनील मोरजकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळा दळवी, संजय गावडे, पंकज शिरसाट उपस्थित होते. यानंतर कुटुंबीयांनी, ग्रामस्थांनी व मच्छीमार बांधवांनी आपण मृतदेह ताब्यात घेत असल्याचे येथील पोलिसांना सांगितले. संपूर्ण दिवस वेंगुर्ले पोलिस ठाण्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT