कोकण

सिंधुदुर्गच्‍या पाऊलखुणा! संस्थानच्या सरदारांमध्येच जुंपली लढाई

शिवप्रसाद देसाई

खेम सावंत (Khem Savant) यांना गादीवर बसवून दुर्गाबाईंनी कारभार सुरू केला असला तरी गादीच्या वारसाचा वाद सुरूच राहिला. रावसाहेब यांच्या पत्नी दादीबाई (Dadibai)यांनी यात उडी घेतली. त्यातच इंग्रजांबरोबर पुन्हा वितुष्ट निर्माण झाले. यातून त्यांनी बळाचा वापर केला. संस्थानच्या प्रमुख सरदारांमधील अंतर्गत कलह वाढून आपापसांत लढाईपर्यंत मजल गेली.Portuguese fort Mandura captured by the Sawantwadi people historical memory konkan news akb84

मडुरा येथे इंग्रजांबरोबर सावंतवाडी संस्थानने तह केला होता; पण कोल्हापूरकर छत्रपतींच्या ताब्यात असलेला भरतगड सावंतवाडीकरांना परत घेण्याच्या घटनेवरून पुन्हा इंग्रजांशी वितुष्ट आले. याआधी केलेल्या आक्रमणात कोल्हापूरकरांनी सावंतवाडीच्या प्रभावक्षेत्रातील भरतगड किल्ला ताब्यात घेतला होता. कोल्हापूरकरांचा पराभव होऊन त्यांचे सैन्य परत गेले, तरी किल्ला त्यांच्याच ताब्यात होता. तो पुन्हा मिळविण्याचा निश्‍चय दुर्गाबाईंनी केला. जानेवारी १८१३ मध्ये त्यांनी संभाजी सावंत आणि चंद्रोबा सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली भरतगडावर आपले सैन्य पाठविले. त्यांनी तो किल्ला हस्तगत केला.

यातून वेगळाच तिढा निर्माण झाला. १८१२ मध्ये सावंतवाडीकरांशी मडुरा येथे झालेल्या तहाआधी दोनच दिवस कोल्हापूरकर आणि ब्रिटीशांमध्ये तह झाला होता. त्यात कोल्हापूरकरांकडून सिंधुदुर्ग, पद्यगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले घेऊन त्या बदल्यात कोल्हापूरकरांच्या राज्याचे रक्षण करण्याची हमी ब्रिटीश सरकारने घेतली होती. त्यामुळे सावंतवाडीकरांनी भरतगडावरचा हक्क सोडून तो कोल्हापूरकरांना द्यावा, असे इंग्रजांनी सावंतवाडीकरांना सांगितले; मात्र दुर्गाबाईंनी ते मानले नाही. अखेर इंग्रजांनी बळाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. कर्नल डाऊसी यांच्या नेतृत्वाखाली सैन्य देऊन भरतगडावर पाठविण्यात आले. इंग्रजांचे हे सैन्य कोल्हापुरातून घाट उतरून १७ मार्च १८१३ ला भरतगडावर पोहोचले. ते सैन्य येताच सावंतवाडीकरांनी भरतगडावरचा ताबा सोडून दिला. एप्रिल १८१३ ला तो कोल्हापूरकरांच्या ताब्यात देण्यात आला.

याच दरम्यान आणखी एक विषय चर्चेला आला. ब्रिटीश सरकारने वराड, मसुरे व मालंड या तर्फा आपल्याला देवून त्या ऐवजी सावंतवाडी संस्थानच्या पाट व हवेली या तर्फात असलेला सिंधुदुर्ग किल्ल्याचा तनखा द्यावा, अशी चर्चा बरेच दिवस सुरू हाती. १८१३ मध्ये ब्रिटीश अधिकारी कर्नल डाऊजी याने सावंतवाडी संस्थानला तसे पत्र लिहिले; पण सावंतवाडीकर याला तयार होईनात. शेवटी बॉम्बे नेटिव्ह इन्फट्रीच्या सातव्या फलटणीतील दुसरी तुकडी, मालवण तळावरचा तोफखाना, आणि कर्नल डाऊजीच्या सैन्यातील एक तुकडी वराड व मालंड या तर्फावर ताबा मिळवण्यासाठी आली. २७ जानेवारी १८१४ला त्यांनी ताबा घेतला. त्यानंतर ब्रिटिशांनी एक जाहिरनामा काढला. त्यात वराड, मसुरे व मालंडचा तणखा सिंधुदुर्ग किल्ल्याला तर पाट व हवेलीचा तणखा सावंतवाडी संस्थानला जोडून दिला.

याच दरम्यान संस्थानच्या गादीवरून नवा वाद तयार झाला. रावसाहेब भोसले यांच्या पत्नी व गादीवर असताना हत्या झालेल्या भाऊसाहेब यांच्या आई दादीबाई या दुर्गाबाईसाठी नव्या शत्रूच्या रूपाने पुढे आल्या. त्या माजगावमध्ये राहत. रावसाहेबांच्या निधनानंतर त्यांना मिळत असलेली नेमणूक दादीबाईंना मिळू लागली. तितक्यावर त्यांचे समाधान झाले नाही. फोंड सावंत यांच्या दोन मुलांपैकी एक आपल्याला दत्तक देवून त्याला आपला मुलगा रामचंद्रराव उर्फ भाऊसाहेब हे नाव ठेवावे आणि गादीचा मालक करावा, अशी मागणी दादीबाईंनी केली. याला दुर्गाबाई तयार होईना. कारण असे केल्यास त्यांच्या हातचा कारभार जावून तो दादीबाईंना मिळण्याची शक्यता होती. यासाठी दादीबाईंना बांदा कोटाचा सरदार चंद्रोबा सुभेदार यांची मदत होती.यातच संस्थानच्या सरदारांमधील वाद विकोपाला गेले. रेडीच्या यशवंतगडाचा किल्लेदार संभाजी गोविंद यांना अर्धांगवायुचा त्रास सुरू झाला. चंद्रोबा सुभेदार यांनी जादूटोणा केल्याने आपल्याला त्रास झाल्याचा ग्रह त्याने करून घेतला. बर वाटल्यावर आपण सुड घेवू, अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली. दुर्गाबाईंचा भरवसा जास्त प्रमाणात संभाजी गोविंद तर दादीबाईंचा चंद्रोबा यांच्यावर होता. यातून दोन गट तयार झाले.

१९ एप्रिल १८१५ ला दादीबाई आपल्या मर्जीतील सैन्य घेवून बांद्यात चंद्रोबा सुभेदार यांना मिळाला.त्यावेळचे कारभारी लक्ष्मण कृष्ण नेसरकर, संभाजी गोविंद आणि बाबणो नाईक यांनी एकत्र येत थेट चंद्रोबांवर स्वारी केली. त्या दोन्ही गटांची बांद्याजवळ वाघडोळा येथे तब्बल तीन महिने लढाई झाली. शेवटी संभाजी गोविंद यांचा पराभव झाला. त्यांना पळून सावंतवाडीत यावे लागले. त्यांचा पाठलाग करत चंद्रोबांची फौज सावंतवाडीत पोहोचली. शेवटी दुर्गाबाईनी मध्यस्ती केली. दोघांनाही आपापल्या जागी जाण्याची ताकीद दिली. यावर चंद्रोबा यांचे समाधान झाले नाही. शेवटी संभाजी गोविंद यांच्याकडून पुन्हा त्रास होणार नाही याच्या खात्रीसाठी चंद्रोबांच्या मागणीवरून माधवराव शिवराम सबनीस आणि मंगेशराव शिवराम चिटणीस यांना त्यांच्यासोबत बांद्याला पाठविण्यात आले. नंतर संभाजी गोविंद आणि बामणो गोपाळ हे आपल्या यशवंतगड आणि निवती किल्ल्यावर परतले. तरीही सरदारांचा स्वैराचार सुरूच होता.यातच १८१७ मध्ये पोर्तुगिजांनी सावंतवाडीकरांविरूद्ध पुन्हा उचल खाल्ली.

पोर्तुगिजांनी ५ हजार इतकी फौज घेऊन उसप तर्फेवर हल्ला केला. उसपमधील हरये गवस देसाई उसपकर यांचे घर लुटून त्या गावातील इतर घरांचीही जाळपोळ केली. याचा सुड उगवण्यासाठी सावंतवाडी सरकारने यशवंतगडाचा किल्लेदार संभाजी गोविंद याना सैन्य नेवून पोर्तुगीजांचा तेरेखोल किल्ला ताब्यात घेण्याचा आदेश दिला. त्यांनी तेरेखोल किल्ला सरही केला. लगेचच पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मोठी फौज घेवून तेरेखोल किल्ल्यावर आला आणि पुन्हा सत्ता स्थापन केली. त्यावर न थांबता त्याने रेडीत येवून यशवंतगडाला वेढा घातला. त्याच्या सोबत २५ तोफाही होत्या. हा वेढा २७ दिवस पडला होता. यावेळी स्वतः दुर्गाबाई होडावडे येथे जावून राहिल्या. तेथून त्या सैन्याचा पुरवठा व इतर नेतृत्व करत होत्या. यात दोन्ही गटांचे मोठे नुकसान झाले. सावंतवाडीकरांकडील तातो काक सावंत परुळेकर व आणखी दोन सरदार मृत्यूमुखी पडले. काही शिपाई गेले. पोतुगिजांना किल्ला घेता येईना. शेवटी रात्रीच्या वेळी वेढा उठवून ते गोव्याकडे परतले.

पाटणकर घराण्याशी सोयरीक

याच कालावधीत गादीचे मालक खेम सावंत (चौथे) यांचा विवाह नारायण पाटणकर यांच्या तृतीय कन्या अंबिका यांच्याबरोबर झाला. मात्र, दरबारातील काही जणांना हे आवडले नाही. कारण ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याशी पुन्हा सोयरीक जुळवायला ते इच्छुक होते. शिंदे घराणेही त्यासाठी अनुकूल होते. दुर्गाबाई मात्र शिंदे घराण्याशी सोयरीक करायला इच्छुक नव्हत्या. त्यामुळे तो विषय तसाच राहिला. खेम सावंतांच्या या पहिल्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी संघात, वाचा कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार; विराट कोहलीचेही टीममध्ये नाव

Pune Municipal Elections : पुण्यात महापालिका निवडणुकीपूर्वी धक्कादायक वळण! भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना जोरदार झटका

Mumbai Municipal Corporation Election : मोट बांधण्याची मविआची हालचाल; मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्यासाठी प्रयत्न

Kolhapur Election : कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीवर शिक्कामोर्तब; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, निवडणूकची रणधुमाळी सुरू

SCROLL FOR NEXT