रत्नागिरी : कोकणातील समुद्रकिनाऱ्याला अनेक खाड्या जोडल्या गेल्या आहेत. त्यामध्ये बाणकोट, दाभोळ, जयगड, साखरतर, पूर्णगड, भाट्ये, वाशिष्ठीसह अनेक छोट्या-मोठ्या खाड्यांचा समावेश आहे. विविधी जातींच्या भरगच्च हिरव्यागार कांदळवनांमध्ये जैवसृष्टी लपली आहे. ती पर्यटकांसाठी आकर्षणाची ठरत आहे.
कोकण किनारपट्टीच्या तब्बल ७२० किलोमीटरपैकी १६७ किमी किनारा रत्नागिरी जिल्ह्याला लाभला आहे. बाणकोट खाडीतील मगरींचा अधिवास हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मार्श क्रोकोडाईल प्रजातीच्या मगरी खाडीच्या बॅकवॉटरमध्ये सापडत असल्याची नोंद आहे. या परिसरातील कांदळवनाचे दाट जंगल असून रायझोफोर ‘मुक्यॉनाटा’ म्हणजेच लाल कांदळांची प्रजात आढळते. या प्रजातीच्या पसरलेल्या मुळांना आधारमूळ म्हणतात आणि ती एखाद्या पुष्पगुच्छासारखी दिसते.
या कांदळवनाच्या झाडाला दुरून पाहिल्यानंतर ते चालत असल्याचा आभास निर्माण होतो म्हणून त्याला वॉकिंग मँग्रोव्ह म्हटले जाते. ब्लॅक कॅप किंगफिशर हा दुर्मिळ पक्षी सापडतो. दाभोळ खाडी ७० किलोमीटर लांब असून तिचा वाशिष्ठी नदीशी संगम होतो. या खाडीकिनारी कांदळवनाच्या विविध प्रजाती आहेत. यामध्ये प्रामुख्याने समुद्री काळा बगळा, ढोर बगळा, राखी बगळा, खरबा बगळा, मध्यम बगळा, कवड्या खंड्या असे पक्षी सापडतात.
रत्नागिरीपासून अंदाजे ७० किमी अंतरावर अणसुऱ्याची खाडी, जैवविविधतेने अतिशय समृद्ध, दलदल जमीन आणि खारफुटींकरिता विशेषत: तिचा उत्तर किनारा प्रसिद्ध आहे. कांदळ आणि कॅण्डेलिया कॅण्डल प्रजातीच्या कांदळवनाचे वृक्ष या खाडीत आढळतात. या खाडी किनाऱ्यांवर वसलेल्या गावांमध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समितींची स्थापना केली आहे. त्यामधून उपजीविकेच्या योजना सुरू केल्या असून त्यात प्रामुख्याने खेकडा पालन, कालवे पालन आणि जिताडा पालनासारखे प्रकल्प राबवले आहेत. ही खाडी जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित व्हावी,शिवाय महत्त्वाच्या किनारी आणि सागरी जैवविविधता क्षेत्रांच्या सूचीमध्ये सामील व्हावी याकरिता स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. रत्नागिरी शहराजवळील समुद्राला मिळणारी काजळी नदी उर्फ भाट्याची खाडी या भागामध्येही कांदळवनांची बेटं आहेत. भाट्ये पुलापासून काही अंतरावर खाडीच्या मधोमध एक मोठे बेट आहे. तेथे विविध प्रकारचे पक्षी वास्तव्य करून आहेत. सायंकाळच्यावेळी पक्ष्यांचा सुरू असलेला किलबिलाट पर्यटकांसाठी पर्वणीच ठरतो.
''खाडीच्या किनाऱ्यावरील भागांना पर्यटनाची जोड देऊन एकात्मिक आराखडा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक खाडीकिनारी कांदळवनं आहेत. त्या-त्या भागांचे वैशिष्ट्य असलेले काही घटकही आहेत. त्याचे जतन करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करायला हवेत.''
- राजीव लिमये, पर्यटन निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.