Shivsena
Shivsena sakal
कोकण

सिंधुदुर्गात शिवसेना विरुध्द शिवसेना राजकिय लढाई

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात गेले दहा दिवस राजकीय रणकंदन माजले आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्याने राज्य सरकार कोसळले.

ओरोस - शिवसेनेच्या बंडाळीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा बसला आहे. माजी राज्यमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर शिवसेनेच्या बंडखोरांना मिळाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना असे राजकीय वातावरण तापले आहे. यापूर्वी जिल्ह्यात झालेली राजकीय आंदोलने ही केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या बाजूने किंवा त्यांच्या विरोधात झालेली आहेत. प्रत्येक राजकीय आंदोलनात राणे केंद्रबिंदू होते. यावेळी प्रथमच वेगळी स्थिती आहे.

महाराष्ट्रात गेले दहा दिवस राजकीय रणकंदन माजले आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्याने राज्य सरकार कोसळले. या बंडात सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर सुद्धा सहभागी झाले आहेत. यामुळे सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापले आहे.

बंडखोर शिंदे गटाने आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी शिवसेनेला वाचविण्यासाठी बंड केल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर सिंधुदुर्गातील शिवसेनेने आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले. त्यासाठी प्रत्येक तालुकावार समर्थनार्थ रॅली काढली. आमदार केसरकर यांचे होम पीच असलेल्या सावंतवाडीमध्ये शक्ती प्रदर्शन करीत मोर्चा काढला. केसरकर यांनी बंडाळी केली असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची अद्याप हकालपट्टी केलेली नाही. त्यामुळे ते अजून शिवसेनेत आहेत. परिणामी जिल्ह्यात सध्या सुरू असलेले राजकीय वाद हे शिवसेना विरुद्ध शिवसेना असे सुरू असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

केंद्रीयमंत्री राणे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर आतापर्यंत त्यांच्या भोवताली जिल्ह्याचे राजकारण फिरताना दिसले आहे. कधी त्यांच्या समर्थनासाठी तर कधी त्यांना विरोध म्हणून हे राजकारण चालले आहे. विशेषतः जिल्ह्यात झालेली राजकीय आंदोलने ही राणे यांना केंद्र बिंदू मानून झाली आहेत. राणे कोणत्याही पक्षात गेले तरी त्या पक्षाच्या विरोधापेक्षा राणे यांना विरोध म्हणून आंदोलने केली जायची. यात प्रामुख्याने शिवसेना आघाडीवर होती. राणेंच्या विरोधात झालेल्या आंदोलनात शिवसेनेच्या आंदोलनांची संख्या सर्वाधिक आहे; मात्र आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वादात राणे केंद्रबिंदू नाहीत तर शिवसेनेचे विद्यमान आमदार केसरकर आहेत. सध्या सुरू असलेली रस्त्यावरची लढाई ही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच म्हणावी लागेल.

जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्याच शिवसेनेचे आमदार केसरकर यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यांचे बॅनर फाडले. हीच शिवसेना केसरकर जिल्ह्यात दाखल झाल्यावर तेवढीच आक्रमक राहणार का? हे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण त्यांचे आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे समर्थक सध्या कुंपणावर आहेत. राज्यात सत्ता बदलली तर ते केव्हाही उडी मारू शकतात. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थिर झाल्यानंतर कोणती परिस्थिती राहते, यावरून नेमके कोण उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत, हे स्पष्ट होणार आहे.

दोन्ही बाजूने सावधगिरी

मंत्री पदासाठी आमदार केसरकर शिंदे गटात गेले. त्यांना पक्षांतर करताना दहशतवाद दिसतो, अशाप्रकारची टीका त्यांच्या विरोधात करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांनी केसरकरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली; मात्र टीका करताना सावधगिरी बाळगली आहे. आमदार केसरकर यांनी सुद्धा आरोप करताना केवळ खासदार संजय राऊत यांना टार्गेट केले आहे. पक्षप्रमुख असो अथवा जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या विरोधात भाष्य केलेले नाही. यावरून दोन्ही बाजूने सावधगिरी बाळगली असल्याचे स्पष्ट होत आहे.

राणेंबाबतही भूमिका सौम्य

केंद्रीयमंत्री नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या सहकार्याने आमदार दीपक केसरकर राष्ट्रवादीतून प्रथम आमदार बनले. त्यानंतर त्यांच्यात बिनसले. केसरकर यांनी दहशतवादाचा मुद्दा अधोरेखित करीत राणे यांना विरोध करीत रान उठविले. त्यामुळे २०२४ चा निवडणुकीत शिवसेनेचे लोकसभा उमेदवार विनायक राऊत यांना वातावरण पोषक झाले. त्यामुळे २०१४ चा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करीत केसरकर यांनी शिवबंधन बांधले. त्यावेळी ते शिवसेनेतून निवडून आले. यानंतर राणे आणि केसरकर यांचे कधी जमले नाही. केसरकर यांनी राणे यांच्यावर नेहमी जहाल टीका केली; मात्र बंडखोरी केल्यानंतर केसरकर हे राणे यांच्याबाबत बोलताना सौम्य भाषा वापरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT