जंगलातील शिकरीसाठी
बनवलेले २० गावठी बॉम्ब जप्त
पालगड तिठा येथील प्रकार; संशयित पोलिसांच्या जाळ्यात
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १६ ः पालगड तिठा (ता. दापोली) येथे जंगली श्वापदाच्या शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या २० गावठी बॉम्ब पोलिसांनी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. गावठी बॉम्बची विक्री करण्यासाठी येणाऱ्या संशयितालाही ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून हे खाकी रंगाचे गावठी बॉम्ब, दुचाकी आणि अन्य वस्तू असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रमेश वसंत पवार (वय ५०, रा. जामगे-नवानगर, ता. दापोली) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १५) सव्वाचारच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल रमेश बांगर यांना गावठी बॉम्ब विक्रीसाठी आणले जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी, खेड राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली एक पोलिस पथक तयार करण्यात आले व पालगड येथील तिठ्याच्या १०० मीटर अंतरावर असणाऱ्या शिवराज ढाब्यानजीक दोन पंचांसोबत जाऊन सापळा रचला होता. अर्ध्या तासानंतर संशयित दुचाकीवरून आला व रस्त्याच्या कडेला येऊन थांबला. संशय आल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याची चौकशी केली. त्याने आपले नाव रमेश पवार असे सांगितले. त्याची व त्याच्या गाडीची झडती घेण्यात आली. गाडीच्या डीक्कीमध्ये एक पिवळ्या रंगाची पिशवी आढळली. त्यात एका प्लास्टिकच्या निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये २० खाकी रंगाचे गावठी बॉम्बसदृश स्फोटक पदार्थ मिळून आले. हे बॉम्ब जंगली श्वापदांच्या शिकारीसाठी बनवले असल्याचा संशय आहे.
रमेश पवार याच्या झडतीमध्ये मिळालेले स्फोटक पदार्थ व दुचाकी (एमएच ०८, एटी १४१०) असा ४५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतला. बॉम्बशोध व नाशपथक यांना पाचारण करण्यात आले. बॉम्ब शोध व नाशपथकामार्फत स्फोटक पदार्थाची तपासणी केली असता हे गावठी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले.
संशयित रमेश पवार आपल्या ताब्यात गावठी बॉम्बसदृश स्फोटक पदार्थ मानवी जीवितास व प्राण्यांच्या जीवितास धोका पोहोचेल या हेतूने स्वतःकडे बाळगल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी-खेड राजेंद्र मुणगेकर, बाणकोट सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल रमेश बांगर, पोलिस हेडकॉन्स्टेबल एम. एच. केतकर, पोलिस कॉन्स्टेबल व्ही. आर. पाटील, मंडणगड पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल एस. आर. घाडगे यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.