४ (सदर ः पान ६ साठी)
--------------
- rat१५p१.jpg -
२३M१६२६४
जे. डी. पराडकर
अर्थबोध करणारी चिन्ह !
------
चिन्ह म्हणजे एकप्रकारची सांकेतिक भाषाच म्हटली पाहिजे. अक्षरांचा वापर सुरु होण्याआधी पासून चिन्हांचा वापर केला जातो. मानवी जीवनात चिन्हांचे महत्व खूप मोठे आहे. चिन्हांचा शोध आणि त्यामागील शास्त्रीय महत्व अचंबित करणारं ठरतं. चिन्हातही अनेक प्रकार आहेत. दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी चिन्हं, संस्कृतीचे दर्शन घडविणारी, दिशादर्शक, मांगल्याचे प्रतिक असलेली, अर्थबोध होणारी चिन्ह. हिंदूस्थानी संस्कृती जगाच्या पाठीवर महान समजली जाते , ती याच कारणांमुळे. चिन्हांचा शोध गरजेतून लागला. चिन्हांची निर्मिती करताना केलेला विचार हा केवळ श्रध्देला नव्हे तर , शास्त्राला धरुन होता याची प्रचिती ही चिन्ह पाहिल्यावर येते.
- जे . डी . पराडकर
--------
बालवयात प्रत्येकाचा या चिन्हांजवळ संबध येतो . शाळा म्हटली की, चिन्ह ओघानं आलीच. बालवयात ज्याला गणितातील या चिन्हांचा अर्थ अचूक उलगडला त्याच्या आयुष्याचं गणित सहजगत्या सुटल्याची उदाहरणं पाहायला मिळतात . गणितात बेरजेच्या चिन्हांचे महत्वं ज्यांना उलगडले त्यांना कधी वजाबाकी करावी लागली नाही. बेरजेचं चिन्ह म्हणजेच काय तर, आत्मविश्वास, जिद्द आणि प्रामाणिकपणा. ज्यांना हि त्रिसूत्री साधली त्यांच्या वाट्याला वजाचिन्ह कधी आलेच नाही. चिन्हांची निर्मिती करणारे महान कलाकार असले पाहिजेत . चिन्हातून अर्थबोध करताना त्याचा आकार, प्रमाणबद्धता, रंगसंगती आणि यातून साधलं जाणारं त्यांचं सांकेतिक महत्त्व प्रदर्शित करायचं म्हणजे केवढी कल्पकता हवी? चौफेर विचार करण्याची क्षमता असणाऱ्या चिन्ह निर्मितीच्या कलाकारांनी कोणतं वेगळं शिक्षण न घेता आपल्या संस्कृतीला अनमोल असा ठेवा बहाल केला आहे. यातील अनेक चिन्हे आपण नित्यनेमाने वापरत असतो, पण त्याच्या निर्मिती मागचा उद्देश कधी फारसा उलगडून बघत नाही. या सर्व गोष्टींचा विचार केला तर एक निश्चित आहे ''जुनं ते सोनं’. प्राचिन परंपरा आणि संस्कृतीचा वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात अभ्यास केला तर, त्याचे खरे अर्थ उलगडत जातात. याकडे डोळस श्रध्दा ठेवत पाहिलं तर, त्याचे आपल्या जवळ असणारं नातं देखिल उमगतं. आपली वैचारिक पातळी उंचावणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. सकारात्मक दृष्टीने जीवनप्रवासाला सुरुवात करणाऱ्यांना चिन्हांचाच काय आयुष्याचाही अर्थ सहजपणे उलगडतो.
माणसाच्या राहणीमानावर खूप काही अवलंबून असतं. वेश साधा असला तरी चालतो, पण तो निटनेटका हवा. तसा नसेल तर, ती व्यक्तीच एक चिन्ह ठरते. येथे चिन्हाचा अर्थ अव्यवस्थितपणाशी निगडीत आहे. असे अनुभव बहुतेक जणांना नित्य जीवनात येत असतात. छोट्या आकारात मोठा अर्थबोध करण्याचं काम चिन्ह करत असतात. ग्रामीण भागातून चिन्हांचं महत्व खूप मोठं आहे. आदिवासी समाजात शिक्षण नसणारी मंडळी वर्षानुवर्षे सण - समारंभाच्या काळात तसेच आपल्या झोपड्यांवर शुभ चिन्ह काढत आली आहेत. त्यांना लिहीता वाचता आले नाही तरी, त्यांनी काढलेल्या शुभसूचक चिन्हांचा अर्थबोध प्रसंगी सुशिक्षितांनाही होत नाही. आदिवासी मंडळींनी या शुभ सूचक चिन्हांच्या जोरावर सातासमुद्रापार प्रसिद्धी मिळविली आहे. आदिवासींची कला हा अनेकांच्या अभ्यासाचा विषय बनला. आपल्या संस्कृतीत रांगोळी कलेला मोठं महत्व आहे. रांगोळीमध्येही अनेक शुभसूचक चिन्ह काढली जातात. ग्रामीण भागात घर-अंगण सारवल्यानंतर प्रथम शुभसूचक रांगोळी काढली जाते. शुभ कार्याप्रसंगी प्रथम आंब्याचा टाळा घरात, मांडवात लावण्याला जेवढं महत्वं आहे तेवढंच महत्वं अंगण सारवल्यानंतर रांगोळी टाकण्याला आहे. चैत्र महिना आणि रांगोळी यांचं तर पूर्वापार अतुट नातं आहे. चैत्र महिन्यात गौरीला माहेरी आणण्याची प्रथा आहे. चैत्रात आलेली गौर, एक महिना म्हणजे अक्षय्य तृतीये पर्यंत माहेरी वास्तव्यास असते. या गौरीचे स्वागत करण्यासाठी सारवलेल्या अंगणात जी रांगोळी काढली जाते तिला '' चैत्रांगण '' असे म्हणतात. या चैत्रांगणाच्या रांगोळीत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ५१ शुभसूचक चिन्ह असतात. अंगणातील छोट्याशा जागेत विशीष्ट आकारात साकारल्या जाणाऱ्या चैत्रांगणाच्या रांगोळीत असणारी ५१ चिन्हे पाहिल्यानंतर त्याचा अर्थबोध करणंही अवघड जाईल. गौर येताना आपल्या सोबत काय काय आणते त्याची ५१ चिन्हे ही जणू प्रतिकेच समजायला हवीत. संस्कृती आणि त्यामागील शास्त्राचा अर्थ उलगडायचा झाला तर कागदांचे रिम कमी पडतील. मात्र आपल्या पूर्वजांनी हे सर्व प्रतिके आणि चिन्हे यांच्या माध्यमातून खूप छोट्या जागेत चैत्रांगणाच्या रांगोळीतून दाखवून दिलंय. ही रांगोळी पाहिल्यानंतर आपलं केवळ बाह्य मनच नव्हे तर, अंतर्मनही सहज प्रसन्न होवून जाईल. चैत्र गौरीच्या आगमनानंतर घरोघरी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. याप्रसंगी गौरीच्या आराशीसाठी अनेक प्रतिकं आणि चिन्ह मांडली जातात.
स्वस्तिक, ओम, कलश यासारखी चिन्ह घरोघरी दिसत असतात. प्रत्येकाला याचा अर्थबोध झाला नाही तरी, या चिन्हांची केलेली सेवा आणि प्रार्थना त्याचे योग्य फळ देत असते. आपली प्राचीन संस्कृती महान आहेच पण बदलत्या काळातही नवंनवीन सांकेतिक चिन्हांनी आपलं महत्वं वेळोवेळी अधोरेखित केलंय. मनात अभ्यास करण्याची इच्छा आणि सजगता असेल तर, चिन्हांचा अर्थ लावणं नक्कीच अवघड नाही. पुरातन काळातील मंदीरामधील शिल्पकला, स्तंभ, विरगळ ही सारी कला, चिन्हे आणि प्रतिकांच्या माध्यमातून अर्थबोध करणारी सांकेतिक भाषाच म्हटली पाहिजे. कोकणातील कातळ शिल्पात नकाशांसह विविध चिन्हे आढळून येतात. ही पुरातन कातळकला म्हणजे प्रतिभावान कलाकारांच्या कल्पकतेचे सर्वोत्तम मनुने आहेत. आपल्या आजूबाजूला अशी अनेक चिन्हे आणि प्रतिके असतात जिज्ञासेच्या माध्यमातून आपण याचा अर्थही जाणू शकतो, गरज असते ती आपल्यात चौकसपणा असण्याची.
( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.