07312
जबाबदार अधिकाऱ्यांना बडतर्फ करा
मंदार शिरसाटः ‘राजकोट’प्रकरणी आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ः भाजपच्या नेत्यांनी मोदींना दाखवण्यासाठी शिवछत्रपतींशी केलेली गद्दारी उघड पडली आहे. सर्जेकोट येथे उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. अशी घटना घडण्यासाठी निष्काळजीपणा दाखविणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी दिला आहे.
पत्रकात शिरसाट यांनी म्हटले आहे की, सर्जेकोट येथे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये घाईगर्दीत शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्यात आला. नौदल दिनासाठी येणाऱ्या पंतप्रधानांना दाखविण्यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी चमकीगिरी केली आणि गडबडीने पुतळा उभारला. या पुतळ्याचे काम अत्यंत निकृष्ट करण्यात आले. पुतळ्याच्या अंतर्भागात लोखंडाचा लवलेशही नव्हता. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रकल्पाचे सगळे श्रेय घेतले. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालवणवासीयांचे जगणे देखील सरकारने मुश्किल करून टाकले होते. आज त्या सगळ्या कामाची पोलखोल झाली आहे. भाजपने केलेल्या सगळ्याच कामांची अशीच अवस्था आहे. घाई गडबडीने उभारलेल्या राम मंदिराला गळती लागली आहे.
संसदेच्या नव्या इमारतीला गळती लागली आहे. ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फ्लाय ओव्हर कोसळून पडत आहेत. रेल्वेगाड्यांचे डबे घसरत आहेत. अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम निकृष्ट करून संबंधितांनी महाराजांशीच गद्दारी केली आहे. यासारखे दुसरे पाप नाही. जे लोक शिवछत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करू शकतात, ते जगात कुणालाही फसवू शकतात, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे भाजपला हद्दपार केल्याशिवाय महाराजांना न्याय मिळणार नाही, अशी आमची भावना असल्याचे म्हटले आहे.
हा पुतळा उभारतानाच स्थानिकांनी त्याच्या निकृष्टतेची कल्पना संबंधितांना दिली होती; मात्र भाजपने नेहमीच्या पद्धतीने सगळ्यांना उडवून लावले. या पुतळ्याला जे साहित्य वापरले होते, त्याच्या दर्जाबाबत स्थानिकांनी बरेच प्रश्न उपस्थित केले होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हाकेच्या अंतरावर सिंधुदुर्ग किल्ला गेली चारशे वर्षे उभा असताना त्या किल्ल्याच्या जनकाच्या पुतळा एक वर्षाच्या आत कोसळतो, हे दुर्दैवी आहे. याची जबाबदारी लवकर निश्चित व्हायला हवी. सर्जेकोट येथे घडलेल्या या प्रकाराची संपूर्ण तपासणी होऊन अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अन्यथा युवासेना तीव्र आंदोलन करील, असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख शिरसाट यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.